आले हो आले.. गणपती बाप्पा आले. सगळीकडे उत्साहाची उधळण... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

आले हो आले.. गणपती बाप्पा आले. सगळीकडे उत्साहाची उधळण...

 आले हो आले.. गणपती बाप्पा आले. सगळीकडे उत्साहाची उधळण...

ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन !
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषा.. गुलालाचा वर्षाव..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सकाळपासून पावसाने दिलेली उघडीप.. गेल्या आठ दिवसांपासून रुसलेल्या सूर्यनारायणाने दिलेले दर्शन.. त्याचे हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन.. हिरवीगार झालेली झाडे.. या सार्‍या आनंददायी वातावरणात आज घरोघरी गणरायाचे आगमन झालेगणपती बाप्पा म्हटला की कुणाच्याही अंगात उत्साह संचारतो. दहा दिवस सुरू राहणार्‍या या उत्सवात आबालवृद्ध भक्तीने न्हाऊन निघतात. व्याख्यानमाला, कीर्तने, प्रवचने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा माहोल यापूर्वी अनेक गणेश मंडळांमध्ये असायचा. अनेक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रोज हजारो जणांची गर्दी व्हायची. या सार्‍याला फाटा देत गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे अगदी साधेपणाने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी अजून तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे उत्सवाला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परवानगी आहे. नगर शहरात सकाळपासूनच बाजारपेठेतून घरोघरी वाजत-गाजत गणेश मूर्ती नेल्या जात होत्या. लहान मुलांच्या गळात अडकवलेला ताशा, त्याचा होणारा निनाद, गणपती बाप्पा मोरयाची घोषणा आणि अधूनमधून गुलालांची उधळण यामुळे शहराचा नूर पालटला होता.
नगर शहरातील सर्वच भागात सकाळपासून गणपती बाप्पांच्या उत्सवाची लगबग होती. घरोघरी गणेशाच्या मूर्तींचे आगमन सुरू होते. लहान मुलांनी गणपती बाप्पा मोरया असे नाव लिहलेल्या टोप्या घातल्या होत्या. अनेकांनी भगव्या रंगाच्या पट्ट्या डोक्याला बांधल्या होत्या. कुणी आपल्या दुचाकीवर, तर कुणी चारचाकीतून बाप्पांना घरी नेत होते. आता इथून पुढील दहा दिवस हा गणरंग असाच दिवसेंदिवस बहरणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह राज्यभरात ला मिळत आहे. मुंबई, पुणे, ओरगाबाद, नाशिक, सोलापुर, बीड, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. पुढील दहा दिवस या विद्येच्या देवाची मनोभावे सेवा केली जाणार आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमनाची पूर्व तयारी सुरु आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना राज्यभरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणपतींचं मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी घातली गेली आहे. तर पुण्यातली जमावबंदी मागे घेण्यात आली आहे. मुंबईतील गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची, लालबागच्या राजाची आणि तेजुकाया गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी बाप्पाची विधीवत पूजा करण्यात आली. मात्र यंदाही कोरोनामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून मुंबईतील परळ, अंधेरी, बोरिवलीसह अनेक शहरांत घरगुती बाप्पाचे आगमन होत आहे. कोरोनामुळे यंदाही पुण्यातील पाच मानाच्या गणपती मंडळातील गणेशोत्सवाचा उत्साह आनंद साधेपणाने साजरा करण्यात येईल. त्यामुळे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी , तांबडी जोगेश्वरी श्री तुळशीबाग, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, केसरीवाडा अशा गणपती मंडळातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेआधीच्या मिरवणुका निघणार नाहीत. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता घेता येणार आहे.

No comments:

Post a Comment