मनाई आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

मनाई आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली !

 मनाई आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली !

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिकरित्या सण, उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही मनसेने मनाई आदेश झुगारून दहीहंडी साजरी केली. मुंबईसह ठाण्यात मनसैनिकांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी साजरी करणार्‍या काही मनसेसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्यावर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दहीहंडी फोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज पहाटेच दादरमध्ये मनसेने दहीहंडी फोडून जल्लोष केला. मानखुर्दमध्येही मनसेने दहीहंडी उत्सव साजरा केला. मनसेचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग अध्यक्ष रवी गवस यांनी केले होते. मुलुंड, वरळीनाका आणि मलबार हिल येथेही मनसेने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला.
दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले आहेत. या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. मनसे विद्यार्थी सेनेने लक्ष्मी पार्क, वर्तकनगर येथे दहीहंडी उभारत चार थराची हंडी फोडली. गोविंदांनी कोरोनाचे निर्बंध झुगारत ही हंडी फोडून मनसेचा झेंडा फडकवला. तर मनसेने नौपाडा येथील कार्यालयासमोर एक थराची हंडी फोडली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ही दहीहंडी फोडली. कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी पूजाअर्चा करत मनसेच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेली दहीहंडी फोडण्यात आली. 


No comments:

Post a Comment