मोबाईल टॉवरचा परवाना रद्द करण्यासाठी नागरिकांचा लोककर्क विरोधी सत्याग्रह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

मोबाईल टॉवरचा परवाना रद्द करण्यासाठी नागरिकांचा लोककर्क विरोधी सत्याग्रह

 मोबाईल टॉवरचा परवाना रद्द करण्यासाठी नागरिकांचा लोककर्क विरोधी सत्याग्रह

धर्माधिकारी मळा येथील फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम थांबविण्याची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील धर्माधिकारी मळा येथे पुन्हा सुरु करण्यात आलेले फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने लोककर्क विरोधी सत्याग्रह केला. तर पंपिंग स्टेशन ते प्रेमदान चौक रस्त्याचे नामांतर कॅन्सर मोबाईल टॉवर मार्ग करण्यात आले. अनाधिकृत टॉवरकडे डोळेझाक करणार्या व आर्थिक हित साधून परवानगी दिल्याचा आरोप करुन महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात अ‍ॅड. कारभारी गवळी, वर्षा गवळी, माधवी दांगट, लता बोरा, प्रकाश हजारे, डॉ. अनिल बोरा, अभय मेहेत्रे, गोरक्षनाथ दांगट, ताराबाई तांबे, भाऊसाहेब वैद्य, वैष्णवी पवार, मिनल गोरे आदी सहभागी झाले होते.
एप्रिलमध्ये टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भितीने स्थानिक नागरिकांनी मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध दर्शवून रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्याने महापालिका प्रशासनाने सदर काम तात्पुरत्या स्वरुपात बंद पाडले. मात्र संबंधित जागा मालकाने महापालिकेकडून परवानगी घेऊन पुन्हा टॉवर उभारणीचे काम सुरु केले आहे. फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे पाचशे मीटर अंतरावरील नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने स्थानिक नागरिकांचा या टॉवरला विरोध आहे. मोबाईल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भाडे मिळणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता टॉवर उभारले जात आहे. फाईव्ह जी मोबाईल टॉवरमुळे कर्करोग, ब्रेन ट्युमर होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांना देखील याचे दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनाने सिध्द झाले आहे. तरी महापालिका प्रशासनाचे अधिकारी आर्थिक हितासाठी लोकवस्तीमध्ये अशा टॉवरला परवानगी देत  असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाचा अंधाधुंदी कारभार सुरु असून, पैसे घेऊन सर्व नियम धाब्यावर बसविण्याचे प्रकार सुरु आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता महापालिकेने बांधकामाचा परवाना दिला आहे. मॉबाईल टॉवर मधून निर्माण होणारे विद्युत चुंबकीय लहरी नागरिकांच्या आरोग्यास घातक असल्याने सदर मोबाईल टॉवरचा परवाना रद्द करुन काम थांबवावे. अन्यथा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अ‍ॅड. गवळी यांनी नागरिकांच्या वतीने दिला आहे. महापालिकेने लोकवस्ती मध्ये उभे राहत असलेल्या फाईव्ह जी मोबाईल टॉवरची दिलेली परवानगी रद्द करुन सदर काम थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले असून, निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.

No comments:

Post a Comment