टाळेबंदीत कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कंपनीत रुजू करण्याचे आश्वासन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

टाळेबंदीत कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कंपनीत रुजू करण्याचे आश्वासन

 टाळेबंदीत कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कंपनीत रुजू करण्याचे आश्वासन

छावा संघटनेच्या आंदोलनाला यश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कामगारांचे शोषण करुन त्यांना किमान वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या लाभापासून वंचित ठेवणार्या एमआयडिसी येथील कंपन्या व संबंधित कामगार ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेने केलेल्या उपोषणाला यश आले आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात कंपनीचे ठेकेदार व उपोषण कर्त्यांची बैठक झाली. यामध्ये कंपनीच्या ठेकेदाराने कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कंपनीत कामावर रुजू करण्याचे आश्वासन दिले. तर किमान वेतनच्या प्रश्नासंदर्भात तसेच इतर कामगार कायद्याबाबत सरकारी कामगार अधिकारी यांच्या मार्फत कंपनीचे निरीक्षण करुन कारवाई करण्याचे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्याने उपोषण सोडण्यात आले. यावेळी ठेकेदार नवनाथ ढाकणे, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे शेख मॅडम, बोरसे, प्रकाश भोसले, बोरसे, छावा संघटनेचे रावसाहेब काळे, महेश काळे, महेश गुंजकर, संतोष देठे, सागर गजघाट, आप्पा अनबोले आदी उपस्थित होते.
एमआयडीसीमधील काही कंपनीतील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात छावा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात गुरुवार दि.5 ऑगस्ट रोजी उपोषण सुरु केले होते. एमआयडीसी मधील के 4 कायनेटिक इंजिनिअरिंग लि. युनिट 2, सिध्दी फोर्ज प्रा. लि. युनिट-2, सिध्दी सीएनसी प्रा.लि. व इंडो मेटा फोर्ज प्रा.लि. या कंपनीतील ठेकेदार कामगारांना किमान वेतन व भविष्य निर्वाह निधीचा लाभ देत नाही. कंपनी व्यवस्थापन ठेकेदाराशी संगनमत करून कामगारांवर अन्याय करत आहे. बारा तास ड्यूटी करूनही कामगारांना लाभ दिला जात नाही. कामगारांना किमान वेतन नियमाप्रमाणे दिले जात नसून, कामगारांची फसवणूक सुरु आहे. टाळेबंदीनंतर अनेक कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. कामगारांचे शोषण थांबवून त्यांना किमान वेतन व भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळावा, त्यांचे शोषण करणार्या कंपनी व्यवस्थापन व कामगार ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकित कामगारांचा प्रश्न सोडविण्यात आला असल्याची माहिती छावा संघटनेचे रावसाहेब काळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment