आमच्या दबावामुळेच तिप्पट करवाढीचा प्रस्ताव गुंडाळावा लागला, काँग्रेसचा दावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

आमच्या दबावामुळेच तिप्पट करवाढीचा प्रस्ताव गुंडाळावा लागला, काँग्रेसचा दावा

 आमच्या दबावामुळेच तिप्पट करवाढीचा प्रस्ताव गुंडाळावा लागला, काँग्रेसचा दावा

मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन, सर्वेक्षणा ऐवजी खड्डे, पिण्याच्या पाण्याच्या दुरावस्थेचे जीआयएसद्वारे सर्वेक्षण करा, काँग्रेसचा खोचक सल्ला


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः काल झालेल्या महासभेमध्ये जीआयएस प्रणालीद्वारे मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकन, सर्वेक्षणाचा विषय ठेवण्यात आला होता. त्याच बरोबर तिप्पट करवाढ करण्याचा देखील घाट घातला होता. मनपाच्या या भूमिकेला काँग्रेसने तीव्र विरोध करत नगर शहरामध्ये नागरिकांच्या 1 लाख सह्यांची मोहीम सावेडीच्या प्रभाग 1 मधून दोन दिवसांपूर्वी सुरू केली होती. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळेच मनपा पदाधिकारी, नगरसेवकांना करवाढीचा प्रस्तावाला विरोध करत तो गुंडाळावा लागला, असा दावा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
काळे यांनी याबाबत म्हटले आहे की, मनपा कंगाल झाली आहे. कर संकलनातून गोळा होणार्‍या पैशांवर विकासकामांच्या नावाखाली डल्ला मारण्याची प्रथा रुजली आहे. शहरातली कामे दर्जेदार होत नाहीत. त्यांच्याकडे ठेकेदारांना द्यायला पैसे सुद्धा राहिलेले नाहीत. मनपा दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे मनपाला नगरकरांवर तिप्पट करवाढ लादायाची होती. महासभेत या प्रस्तावाला विरोध न केल्यास मनपा पदाधिकारी, शहराचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्या दारावरती निषेधाची पत्रिके चिटकविण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. मात्र आता हा करवाढीचा गाशा यांनी गुंडाळल्यामुळे काँग्रेसने यांच्या दारावर निषेध पत्रके चिटकवण्याचे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसने तिप्पट करवाढी बाबतीमध्ये अत्यंत आक्रमक भूमिका घेत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केल्यामुळे करवाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्याची नामुष्की मनपा पुढार्यांवर आली असल्याचा दावा काळे यांनी केला आहे. मनपाने मालमत्तांचे जीआयएस प्रणालीद्वारे मॅपिंग करत सर्वेक्षण करून नव्याने मोजमाप घेण्याबाबत काल ठराव मंजूर केला आहे. याच कामासाठी यापूर्वी नेमलेल्या मे. स्ट्रेसालाईट कंपनी प्रकरणाची चौकशी आधी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ लवकरच मनपा आयुक्तांची भेट घेणार आहे.
किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने आरोप करताना म्हटले आहे की, करवाढीचा प्रस्ताव फेटाळला असा ठराव जरी आज मनपा महासभेने केला असला तरी देखील जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून पुनर्मूल्यांकन, सर्व्हेक्षण  करण्याचा ठराव पालिकेने संमत करून सामान्य नगरकरांचे आजचे मरण उद्यावर ढकलले आहे. हे जीआयएस मॅपिंग झाल्यानंतर नगरकरांवर भविष्यात तिप्पट करवाढ लादण्याचा घाट मनपाचे पुढारी घालणार आहेत. हा त्यांचा छुपा अजेंडा ते राबवत आहेत.
काँग्रेसची मागणी आहे की, मनपाला जीआयएस प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन आणि सर्वेक्षण करायचेच असेल तर ते या शहरातील हजारो खड्ड्यांचे, पिण्याच्या पाण्याची दुरावस्था, शहरातील नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा यांचे करा. सर्व नगरकरांना खड्ड्यात घालून यांना मात्र लोकांच्या प्रामाणिकपणे कष्ट करून कमविलेल्या खाजगी प्रॉपर्ट्या मोजायच्या आहेत. कोणत्याही प्रकारची नागरी सुविधा देऊ न शकणार्‍या यांना लोकांच्या घरांचे वासे मोजण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असा घणाघाती आरोप काळे यांनी केले आहे. करवाढ तात्पुरती नाकरून ती जीआयएस मॅपिंग करून भविष्यात करण्याचा मनपा सत्ताधार्‍यांचा छुपा डाव आहे. मनपा पुढार्‍यांच्या नगरकरांची दिशाभूल करण्याच्या खेळाला नगरकर भूलणार नाहीत. मनपा पुढार्‍यांनी हा गैरसमज आहे, अफवा आहेत असे म्हणून आपल्या तुघलकी कारभारावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रकार केला आहे.

No comments:

Post a Comment