माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचा अभिमान ः सिद्दम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचा अभिमान ः सिद्दम

 माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचा अभिमान  ः सिद्दम

श्री मार्कंडेय विद्यालयाच्यावतीने कोरोनायोध्दे ठरलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात शाळेचा पहिला दिवस कोरोनाच्या संकटकाळात कोरोनायोध्दे ठरलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करुन साजरा करण्यात आला.
शाळेतील अनेक माजी विद्यार्थी पोलीस, डॉक्टर, परिचारिका, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावून सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शाळेच्या वतीने त्यांचा शाळेच्या पहिल्या दिवशी आगळ्या-वेगळ्या पध्दतीने गौरव करण्यात आला.
गांधी मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक शरद क्यादर, उपाध्यक्ष विलास पेद्राम, सचिव रत्ना बल्लाळ, विश्वस्त शंकर सामलेटी, विश्वस्त राजू म्याना, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक रामदिन, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा, शिक्षक प्रतिनिधी प्रा. भानुदास बेरड, ज्येष्ठ अध्यापिका निता गायकवाड, उच्च माध्य. चे सन्मवयक प्रा. शिवाजी विधाते, ग्रंथपाल विष्णु रंगा, प्रा. संतोष यादव आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, शहरासह जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असताना कोरोना योध्दांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. शाळेचे माजी विद्यार्थी विविध पदावर कार्यरत असून, या कोरोनाच्या संकटात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शाळेने अनेक विद्यार्थी घडवले असून, माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचा अभिमान वाटत आहे. या कार्याचा सन्मान म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांचा गौरव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ संचालक शरद क्यादर यांनी माजी विद्यार्थी शाळेचे भूषण आहे. शाळेतून अनेक गुणवंत व प्रतिभावंत विद्यार्थी घडत आहे. माजी विद्यार्थ्यांचे कार्य पाहून संस्था चालक व शिक्षकांनाही अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक दिपक रामदिन यांनी शाळेची गुणवत्ता व कोरोना परिस्थितीतही विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ऑनलाईन शिक्षणाची माहिती दिली. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी अजय म्याना, दिपक गुंडू, श्रीनिवास  इपलपेल्ली, शुभम बुरा, योगेश ताटी, सागर बोगा, गणेश लयचेट्टी, श्रीनिवास बुर्गुल, सुमित इपलपेल्ली, योगेश म्याकल, डॉ. विक्रम डिडवानिया, राहूल गुंडू, राजू सुद्रिक, योगेश हराळे, वाजिद शेख यांचा कोरोना योध्दे म्हणून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष यादव यांनी केले. अजय म्याना, योगेश ताटी व डॉ. विक्रम डिडवानिया यांनी सत्काराला उत्तर देताना कोरोना काळात आलेले अनुभव विशद केले.

No comments:

Post a Comment