आणीबाणीमुळे लोकांना लोकशाहीचे महत्व कळले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

आणीबाणीमुळे लोकांना लोकशाहीचे महत्व कळले

 आणीबाणीमुळे लोकांना लोकशाहीचे महत्व कळले

ज 25 जून, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज 46 वर्ष पूर्ण झाली. बरोबर 46 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू झाली. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द करून त्यांना पुढील सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांनी 1971 च्या लोकसभा निवडणुकीत गैरव्यवहार केला असा आरोप करून खटला दाखल केला होता या खटल्याच्या निकाल 12 जूनला लागला. या निकालानंतर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने त्यांनी पंतप्रधानपद सोडावे अशी मागणी होऊ लागली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सुट्टीच्या काळातील न्यायाधीश व्ही. आर कृष्ण अय्यर यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिला मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत इंदिराजींना पंतप्रधान पदावर राहण्यास मुभा दिली. हा निर्णय आल्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी 25 जून 1975 च्या  रात्री देशात आणीबाणी लागू केली. आणीबाणीच्या मसुद्यावर तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी  रात्री बारा वाजता स्वाक्षरी केली. आणीबाणी लागू झाल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या हातात अनिर्बंध सत्ता आली. माध्यमांची मुस्कटदाबी सुरू झाली. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, चौधरी चरणसिंग, मोरारजी देसाई, नानाजी देशमुख, मधु दंडवते, रामकृष्ण हेगडे, सिखंदर बख्त, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान यांच्यासह अनेक मोठे नेते तसेच पत्रकारांना मिसा कायद्याखाली तुरुंगात डांबण्यात आले. आणीबाणीच्या 21 महिन्यांच्या कालावधीत 11 लाख लोकांना तुरुंगवास भोगावा लागला. सक्तीची नसबंदी आणि झोपडपट्टी हटवून शहरे सुशोभित करण्याच्या मोहिमेत लोकांवर जुलूम जबरदस्ती करण्यात येऊ लागले. त्यामुळे देशभर भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले. सुरवातीला दहशतीत असणारे नागरिक या अन्यायाविरुद्ध नंतर रस्त्यांवर उतरू लागले. सामाजिक कार्यकर्ते, नेते, अभिनेते, कलाकार, बुद्धीवादी लोक, साहित्यिक असे सारे लोक आणीबाणीच्या विरोधात एकवटले. सर्व स्तरातून आणीबाणीला विरोध होऊ लागला. संपूर्ण देश आणीबाणीच्या विरोधात एकवटल्याचे पाहून  इंदिरा गांधी यांनी आणीबाणी सैल करून 1977 साली लोकसभेच्या  निवडणुका घेतल्या. या निवडणुकीत इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा दारुण पराभव झाला. विरोधी पक्ष असलेल्या  जनता पार्टीचे सरकार आले. मोरारजी देसाई हे पंतप्रधान बनले. पण या सरकारमध्ये कमालीचा अंतर्विरोध होता. हाती आलेली सत्ता या विरोधी पक्षांना टिकवता आली नाही. पुढील निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या. आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळे पर्व म्हणून ओळखली जाते. 46 वर्षांपूर्वी घडलेल्या या दिवसातील घडामोडींनी देशाला लोकशाहिवरील श्रध्येचे महत्त्व काय आहे याची जाणीव करून दिली. भारताच्या इतिहासातील या घटनेची आठवण म्हणजे कोणाला चांगले वाईट ठरवणे नसून लोकशाहीची ताकद व सामर्थ्य यांचे स्मरण होय.
- श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे, 9922546295

No comments:

Post a Comment