एकीचं माणुसकीचं दर्शन घडते माझ्या वाहिरा गावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

एकीचं माणुसकीचं दर्शन घडते माझ्या वाहिरा गावी

 एकीचं माणुसकीचं दर्शन घडते माझ्या वाहिरा गावी

बीडपासुन 120 किलोमीटर अंतरावर व नगरपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेलं. आष्टी तालुक्यातील माझं गाव श्रीक्षेत्र वाहिरा. तिन्ही बाजूंनी टेकडी व मध्यभागी गाव. ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख. श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही वाहिरा भूमी.वाहिरे ग्राम संभूतं अविंध कुल भास्करम् श्र योगसंग्राम निर्माता तं नमामि महंमदम्श्रश्र संत शेख महंमद महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी यावर समाजप्रबोधन केले. अनेक अभंग ग्रंथ रचले. एकेकाळी वैभव संपन्न असणारे गाव. शेख महंमद महाराजांचे विचार विसरून गेल होत. ज्या मनुष्याने,समाजाने, गावाने चांगले विचार सोडून दिले. त्यालाही कोणी विचारत नाही. अशीच परिस्थिती आमच्या गावची झाली होती. दुर्लक्षितच झालं होतं. गावातील तरुण वर्ग उद्योग, व्यवसाय, नोकरीसाठी बाहेर पडला. बाहेरचं जग आणि आपलं गाव यांच्याशी तुलना करू लागला. आपलं गावही सुंदर असावं. अगदी स्वप्नातल्या गावा सारखचं. प्रत्येकाला वाटायचे गावासाठी काहीतरी करावे. गावात राजकारण टोकाला गेले होते. व्यसनाचे प्रमाण वाढलेलं होतं. गावातील दोन तीन गटांमध्ये राजकारण आणि गोंधळ होता. गावच्या जत्रेत गोंधळ ठरलेला . काहींच्या हातात काठ्या असायच्या.कधी वाद होईल सांगता येत नव्हते. दारू पिऊन धिंगाणा घालणारी तरुणाई.याने गावाचे नाव खराब झालेले होते. परंतु होतकरू, सुशिक्षित तरुणाईने हे बदललं पाहिजे. यासाठी पुढाकार घेतला. काही तरुण एकत्र आले आणि ग्रामविकास ग्रुपची स्थापना झाली. स्वखर्चाने गावात वृक्षारोपण लागवड केली. पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबविली. परंतु त्यालाही मर्यादा होत्या. याने  एकत्र येण्याची सुरुवात झाली होती..
दुष्काळ हा गावाच्या पाचवीला पुजलेला होता. पाऊस पडला तरी पाणी वाहून जायचे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी नसायचे. तीन वर्षापूर्वी गावाने पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला. गावाने एकीचं दर्शन घडवलं. अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवलं. तन-मन-धनाने सर्वांनी झोकून दिलं. दुष्काळाला हरवलं. आज गायरानात हजारो झाडे आहेत. गावाच्या परिसरात झाडांची संख्या वाढत आहे.पाणी अडवल्यामुळे परिसर हिरवागार झाला.  
एकत्र आल्यानंतर बदल होऊ शकतो हा विश्वास पटला
गावाच्या पश्चिमेला टेकडीवर संत शेख महंमद महाराज समाधी मंदिर परिसर दुर्लक्षितच होता. शेख महंमद महाराजांच्या मातोश्री फुलाईमाता यांच्या नावे उद्यान उभा करण्याचे आवाहन केले. गावातील व पंचक्रोशीतील सर्वांनी लाखोंची देणगी देऊन आज तेथे टुमदार उद्यान उभे आहे. आलेल्या भाविक भक्तांचे उद्यान लक्ष वेधून घेत आहे. दर्शनानंतर आलेले भाविक त्या उद्यानात रमत आहेत. बालगोपाळ खेळत आहेत. असे छोटे-मोठे कितीतरी कार्यक्रम गाव एकत्र येऊन पार पडत आहे. गरजवंताला मदत करून माणुसकीचे दर्शन घडवत आहे.
दीड वर्षापूर्वीची घटना गावातील एका तरुणाचा कॅन्सरने मृत्यू झाला. आजारपणात घरातील सर्व पुंजी संपलेली होती. अशा वेळेस खरी मदतीची गरज असते. आम्ही दशक्रिया विधी दिनी आवाहन केले. सव्वा लाख रुपये त्याच वेळी जमा झाले. माणुसकी जिवंत आहे . गावाने दाखवून दिले होते.
अशीच घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली. गावातील बाळू क्षीरसागर या तरुणाला कोरोनाची लागण झाली. लाखो रुपये खर्च झाला. कोरोना बरा झाला परंतु म्युकर मायकोसिस या आजाराने ग्रासले. आता खर्च करण्यासाठी एक रुपया ही शिल्लक नव्हता. त्याचा मोठा भाऊ गणेश क्षीरसागर याने  सत्य परिस्थिती गावातील ग्रुपवर टाकली. गावातील तरुणांनी जमेल तशी मदत केली. वाहिरा गावा शेजारील घोंगडेवाडी निमगाव बोडखा , पारोडी, निमगाव येथील तरुणांनीही मदत केली. काहींनी उसने पैसे घेतले आणि या तरुणाच्या खात्यावर टाकले. दोन दिवसात दोन लक्ष रुपये जमा झाले. त्या तरुणाला आर्थिक मदत तर केलीच परंतु एक मोठा मानसिक आधार मिळाला. माझ्या पाठीमागे माझा गाव आहे ही भावना तयार झाली. हेच बळ जगण्यासाठी ऊर्जा, प्रेरणा देते.
गावात छोट्या मोठ्या घटना घडतात तेव्हा सारा गाव एकत्र येतो. प्रत्येक जण जमेल तशी मदत करतो. गाव तुझ्या पाठीमागे आहे. ही भावनाच किती मोठी असते ना ! गावातील प्रशासनात असणारी माणसं सर्वतोपरी झटत आहेत. वेळ काढून गावात येऊन नवनवीन संकल्पना मांडत आहेत. मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी येत्या काळात मुलांसाठी ग्रंथालय सुरू होत आहे. ज्याला जमेल तसे प्रत्येक जण मदतीचा हात पुढे करत आहे.सर्व राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून कार्य करत आहेत.
शेख महंमद महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी जो संदेश दिला. समाज जागृती केली.ती याच वाहिरा भूमीतून. आज तीच भूमी एकीच, माणुसकीचं दर्शन जगाला घडवत आहे. शेख महंमद महाराजांचा अभंग हेच सांगतो.
       ऐसे केले या गोपाळे । नाही सोवळे ओवळे ॥
       काटे केतकीच्या झाडा । आंत जन्मला केवडा ॥
      फणसा अंगी काटे । आत अमृताचे साठे ॥
       नारळ वरूता कठिण । परी अंतरी जीवन ॥
     शेख महंमद अविंध।  त्यांचे हृदयी गोविंद ॥
माणुसकी हा एकच धर्म आहे. येथे सोवळे ओवळे नाही, याचाच प्रत्यय आज प्रत्येक कार्याच्या वेळी येत आहे. कसलाही भेदभाव नाही. कोणाविषयी द्वेषभावना नाही.
सगळे गावाच्या कार्यासाठी एक होतात. माणुसकीचं दर्शन घडवितात. मला खरचं अभिमान वाटतो की या पवित्र भूमीत माझा जन्म झाला . तसा प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो. परंतु प्रत्येकाची एक जबाबदारीही असते. ती पार पाडली की गावं सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येक कार्याची सुरुवात स्वतःपासून करा.
माणुसकी जिवंत आहे
ती जपायला शिका.
संवेदनशील आहे माणसं
मन ओळखायला शिका.
एकीचं बळ मोठे
ती टिकायला शिका.
मानवता हाच खरा धर्म
तो पाळायला शिका.
तुम्हीच खरे शिल्पकार
स्वतःला जाणायला शिका..
किसन आटोळे सर
वाहिरा, ता. आष्टी 9404639537

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here