शेतकर्‍यांचे डोळे लागले आभाळाकडे अन् काळीज इवल्याशा बिजात ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

शेतकर्‍यांचे डोळे लागले आभाळाकडे अन् काळीज इवल्याशा बिजात !

 शेतकर्‍यांचे डोळे लागले आभाळाकडे अन् काळीज इवल्याशा बिजात !

आज  तरी येईल पाऊस उद्या तरी पडेल म्हणून शेतकरी राजा एक एक दिवस काढत आहे.. पण मेघराजा असा अचानक तू गेलास कुठे?


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तालुक्यात आतापर्यंत फारच कमी  पाऊस पडला आहे. मृग व आद्रा नक्षत्रातील पावसाची ही सरासरी  अपेक्षित होती तेवढी अद्यापही नाही.
सध्या पाऊस सार्वत्रिक नाही. कुठे धुवाधार पडतो, तर कुठे शेतजमिनीचा वरचा पापुद्राही भिजत नाही. शुक्रवारी दुपारी नेवासा शहराच्या आजूबाजूच्या गावशिवारात थोड्या प्रमाणात  पाऊस बरसला. तर भानसहिवरा, प्रवरासंगम परिसरात पावसाचा एकही थेंबही पडला नाही.
हवामान खात्याणे यंदा चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला. तर ग्रह -नक्षत्रे चांगला पाऊस घेऊन येणार असे योग असल्याने जवळपास सर्वच शेतकर्‍याची पेरणी झाली. सध्या ही परिस्थिती पाहायला मिळते......
 कुठे बियाण्यांचे अंकुर जमिनीवर आलेत, तर कुठे पावसाअभावी कोमेजून गेले. सूर्याने आद्रा नक्षत्रात प्रवेश केला. परंतु पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.  
पावसामुळे जमिनीच्या वर तरारून आलेल्या रोपट्यांचे सिंचन कसे होणार? या रोपांची वाढ कशी होणार? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. कोरोनाचा आर्थिक कणा मोडणारा काळ, विक्री अभावी शेतमाल घरातच, तर कुठे शेतमाल विक्रीचा पैसा कधी मिळणार याचीच चिंता. पीक कर्ज नाही, घरातील सोन्याचे किडूकमिडूक विकून कशीबशी पेरणी केली, तर निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीनची उगवण झाली नाही. दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांच्या समोर तोंड वासून उभे झाले. शेतकर्‍यांच्या या संक्रमण काळात पावसाने साथ दिली नाही तर शेतकर्‍यांचा कणा मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. खरे तर, आता शेतकर्‍यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. कधी काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ भरून येते, परंतु पाऊस आणणारे हे ढग वार्‍यासवे कुठे पसार होतात ते कळत नाही. आर्द्रा नक्षत्रातील पाऊस व ढगांचा लपंडाव सारखा सुरू आहे. खरे पाहता शेती व शेतकर्‍यांचे जीवन पावसाच्या ऋतुचक्रावर अवलंबून आहे. पावसाने दडी मारली की शेतकर्‍यांचे हात कपाळावर व डोळे आभाळाकडे लागतात. हवामान बदलामुळे दरवर्षी सारखीच परिस्थिती पहावयास मिळते. पाऊस वेळेत आणि पुरेसा आला तर पिकांची वाढ जोमाने होते. पावसाच्या नऊ नक्षत्रांनी साथ दिली तर उत्पन्नात भरभराट होऊन शेतीत समृद्धीचे गाणे सारेजण गाऊ लागतात. मात्र पुरेशा पावसाअभावी पिके मोडली तर, शेतकर्‍यांचा पाठीचा कणा मोडतो. बदलत्या निसर्गचक्रात मान्सूनही आपली ’चाल’ बदलत असल्याने शेतकरी मात्र गलितगात्र झालेला पाहावयास मिळतो. सध्या पिकांच्या कोवळ्या रोपट्यांना पाऊससरींची नितांत आवश्यकता आहे. पावसाची ही गरज भागली तर पिके जोमात वाढण्याची व पुढे भरघोस उत्पादनातून समृद्धीची वाट सुखद होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी पावसाची आबादानी पिकांनी पहावी, अशी शेतकर्‍यांची आभाळातील काळ्याकुट्ट ढगांना विनवणी आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here