ना. थोरातांची किरण काळेंच्या पाठीवर कौतुकाची थाप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

ना. थोरातांची किरण काळेंच्या पाठीवर कौतुकाची थाप

 ना. थोरातांची किरण काळेंच्या पाठीवर कौतुकाची थाप

शहर जिल्हा काँग्रेसची ऑनलाईन आढावा बैठक संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
कोरोना संकटामुळे ओढवलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये नगरकरांना शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या मदत कार्याबद्दल शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पाठीवर महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी कौतुकाची थाप दिली आहे. शहर जिल्हा काँग्रेसची नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ना. थोरात यांनी काळे यांचे कौतुक केले.
ना. थोरात यांनी शहरातील काँग्रेस पदाधिकार्‍यांशी ऑनलाईन आढावा बैठकीच्या माध्यमातून मुंबईतून संवाद साधला. जिल्हाध्यक्ष किरण काळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीला आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, महिला काँग्रेसच्या प्रदेश महासचिव उत्कर्षा रुपवते, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष सय्यद खलील, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा कौसर खान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, क्रीडा शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे, शहर जिल्हा सहसचिव नीता बर्वे आदींसह पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदाधिकार्‍यांना बरोबर घेत लॉकडाउनच्या कालावधीमध्ये नगर शहरात काँग्रेसच्या माध्यमातून लोकांसाठी केलेल्या कार्याचा आढावा ना.बाळासाहेब थोरात यांना यावेळी ऑनलाईन बैठकीत सादर करण्यात आला. काँग्रेसच्यावतीने नगर शहरामध्ये गरजू लोकांना किरणा किटचे वाटप करण्यात आले. मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शहरात काँग्रेसच्या वतीने चोवीस तास सेवा देणारी कोविड वॉर रूम चालविण्यात आली आहे. अद्यापही वॉर रूमचे काम सुरू आहे. या माध्यमातून कोरोना रुग्णांना आयसीयु बेड, व्हेंटिलेटरचे बेड, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे. विलगीकरण सेंटरमध्ये प्रवेश मिळवून देणे या बाबत मदत करण्यात आली आहे. त्याचबरोबर पत्रकार आणि पोलीस बांधवांना कोविड किटचे वाटप करण्यात आले असून यामध्ये फेसशील्ड, हात मोजे, मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. किरण काळे यांनी पुढाकार घेत ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून डाळ मंडई आणि आडते बाजार सुरू करण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून यशस्वी पुढाकार घेतला. यावेळी ना.थोरात यांनी सांगितले की नगर शहरातील नागरिकांबरोबरच व्यापार्‍यांच्या देखील पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे.
मध्यंतरी मनपा मध्ये मुक्कामी राहत किरण काळे यांच्यासह मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, अनंतराव गारदे, फारुक शेख, खलील सय्यद यांनी केलेल्या यशस्वी आंदोलनामुळे मनपाला ऑक्सिजन निर्मिती त्याचबरोबर ऑक्सिजन बेडसाठीच्या निविदा प्रसिद्ध कराव्या लागल्या. त्या निविदांना प्रतिसाद मिळाला असून ठेकेदारांनी निविदा देखील सादर केल्या आहेत. संभाव्य तिसर्‍या लाटेमध्ये याचा निश्चितपणे नगरकरांना फायदा होणार आहे. काँग्रेसच्या आंदोलनामुळेच मनपाला हे पाऊल उचलावे लागले. काँग्रेसच्या यशस्वी आंदोलनाबद्दल बाळासाहेब थोरात यांनी काळे आणि पदाधिकार्‍यांचे यावेळी कौतुक केले.

बूथ हॉस्पिटलला ना. थोरातांकडून रुग्णवाहिका भेट
  मध्यंतरी ना. बाळासाहेब थोरात यांनी बुथ हॉस्पिटलला भेट दिली होती. यावेळी शहर काँग्रेसने बूथ हॉस्पिटलच्या मागणीवरून ना.थोरात यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्या संदर्भात विनंती केली होती. ना. थोरात यांनी याची दखल घेत बूथ हॉस्पिटलला एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. नुकतेच या रुग्णवाहिकेचे आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी समारंभात हस्तांतरण करण्यात आले असून बुध हॉस्पिटलने कोरोना संकट काळामध्ये नगर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची केलेल्या सेवेबद्दल ना. थोरात यांनी बूथचे कौतुक केले आहे. रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉस्पिटलचे संचालक डॉ.देवदान कळकुंबे, जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ना.थोरात यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here