दहावी निकालाबाबत बोर्डाची मूल्यमापन कार्यपद्धती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 14, 2021

दहावी निकालाबाबत बोर्डाची मूल्यमापन कार्यपद्धती

 दहावी निकालाबाबत बोर्डाची मूल्यमापन कार्यपद्धती

मुख्याध्यापक व शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण: निकालासाठी वेळापत्रक जाहिर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा दहावी साठी मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात तयारी सुरू आहे.एस.एस.सी बोर्ड वेळापत्रक तयार केले असून मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या साठी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत मंडळाच्या युट्युब चॅनेल वरून गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा रद्द केल्यामुळे परीक्षेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक, प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. दहावीसाठी मूल्यमापन कार्यपद्धतीचा तपशील बोर्डाने जाहीर केला आहे.
सोमवार दि.10 जून रोजी मुख्याध्यापक व शिक्षकांना मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून दि.11 ते 20 जून अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे. विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे. वर्गशिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून निकाल शाळेचा निकाल समितीकडे सादर करणे. दि. 12 ते 24 जून अखेर वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षण व नियमन करून प्रमाणित करणे. दि. 21 ते 30 जून अखेर मुख्याध्यापकाने निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरणे. दि. 25 ते 30 जून अखेर मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात जमा करणे. दि. 3 जुलै पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा निकालाबाबत विभागीय मंडळ व राज्य मंडळ स्तरावरील प्रक्रिया सुरू होणार आहे. शासन निर्णय व मंडळाने  परिपत्रकाद्वारे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे दिलेली कार्यपद्धती व सूचना याबाबत वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी. विद्यार्थ्यांना गुणदान करताना शासन निर्णयातील सर्व तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे. नियमित विद्यार्थी (विषयनिहाय), पूर्व परीक्षार्थी (विद्यार्थीनिहाय) ,खाजगी विद्यार्थी (विषयनिहाय) , तुरळक विषय घेऊन प्रविष्ट झालेले विद्यार्थी (विद्यार्थीनिहाय) यासाठी मंडळाने निकाल कसा करावयाचा याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार तसेच तरतुदीनुसार देय असलेल्या अन्य गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यात येईल. त्यानंतर मंडळाचे उत्तीर्णबाबतचे सर्व निकष विचारात घेऊन निकाल जाहीर करून गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येईल, असे ही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी काढलेल्या परिपत्रकातील आदेशामध्ये म्हटले आहे.
मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही.....
दहावीचे विषय शिक्षक, वर्ग शिक्षक, पर्यवेक्षक यंत्रणांची बैठक घेऊन शासन निर्णयाचे वाचन करावे. त्यातील निकस व कार्यपद्धती समजावून घेऊन मुख्याध्यापकांनी सर्वकष चर्चा करावी. सर्व शंकाचे निरसन करावे. मंडळाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्प्याचे कामकाज वेळेत पूर्ण करावे. मंडळाकडे परीक्षेसाठी आवेदनपत्र भरून नोंदणी केलेल्या व मंडळाचे बैठक क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात यावे. नियमित विद्यार्थ्याप्रमाणे पुर्नर परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांच्या बाबतीत संबंधित विषय शिक्षक वर्गशिक्षक यांच्याकडून मूल्यमापना बाबत कार्यवाही करून घेण्यात यावी. समितीने प्रमाणित केलेला निकाल मंडळाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार संगणक प्रणालीमध्ये नोंदवावा.
शाळा स्तरावर निकाल समिती..
माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सात सदस्यांची निकाल समिती गठीत करावी. समितीने दहावीला अध्यापन केलेल्या सर्व विशेष शिक्षकांची व वर्गशिक्षकांची बैठक घेऊन शासन निर्णयातील तरतुदीनुसार मूल्यमापनाची कार्य पद्धती स्पष्ट करावी. तसेच सर्व शंकाचे निरसन करून व वेळोवेळी मार्गदर्शन करावे. वर्गशिक्षकांनी तयार केलेल्या विद्यार्थी  निहाय संकलित निकालाचे परिक्षण व नियमन समितीमार्फत करण्यात यावे. समितीने शासन निर्णयातील निकषानुसार निकालाचे परिक्षण व नियमन अभिलेख, कागदपत्राच्या आधारे करून विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अचूक असल्याची खात्री करून निकाल स्वाक्षरीसह दोन प्रतीत प्रमाणेच करावा. समितीने प्रमाणित केलेला निकाल संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करावा.
गुणदान प्रक्रियेत स्पष्टता
* यामध्ये विद्यार्थ्याच्या इयत्ता नववी आणि दहावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. इयत्ता नववीच्या गुणांचे 50 पैकी रूपांतर केले जाणार आहे.
* तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आत्तापर्यंत शाळेत इयत्ता दहावीच्या घेतलेल्या ऑनलाइन किंवा अन्य परीक्षांचे 30 पैकी गुणांचे रूपांतर करण्यात येणार आहे.
* मात्र अनेक शाळांनी वर्षभरात विद्यार्थ्याच्या कोणत्याच परीक्षा घेतल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे गुण देणे शाळांना अशक्य झाले आहे. त्यामुळे शिक्षकांसह शाळा प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाला होता.
* मात्र राज्य सरकारच्या परिपत्रकांमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रथम सत्र व सराव परीक्षा घेणे शक्य झाले नसल्यास दहावीच्या अभ्यासक्रमावर घेतलेल्या सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्पाला विषयनिहाय दिलेल्या गुणांचे 30 पैकी गुणात रूपांतर करण्यास सांगितले आहे.
* याचा फायदा घेत शाळांकडून आता दररोज विद्यार्थ्यांची एका विषयाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
* अनेक शाळांनी आता विद्यार्थ्यांना व्हिडिओकॉल च्या माध्यमातून रोज एका विषयाची असाईमेंट लिहायला देत आहेत.
* हि असाईमेंट कॅमेरासमोर लिहायची असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत आहे. ज्या  अनुदानित शाळांनी परीक्षा घेतल्या नाहीत. त्यांनी विद्यार्थ्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून असाईमेंट  लिहायला दिल्या असून,  त्या तातडीने सोडून देण्यास सांगितले आहे. परीणामी दहावी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला लागलेले दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here