पुढील दहा वर्षात तुमचे जगभर फॅन्स असतील...- अवधुत गुप्ते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

पुढील दहा वर्षात तुमचे जगभर फॅन्स असतील...- अवधुत गुप्ते

 पुढील दहा वर्षात तुमचे जगभर फॅन्स असतील...- अवधुत गुप्ते

अहमदनगरच्या सन्मिता शिंदे ठरल्या महाराष्ट्राच्या महागायीका...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः सुर नवा ध्यास नवा या कलर्स मराठी वाहिनी वरील कार्यक्रमात महाराष्ट्रातून हजारो गायिका सहभागी झाल्या होत्या. त्यातील 16 स्पर्धकांची निवड करून ही  गायन स्पर्धा वाहिनी वर सुरू झाली.महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून निवडलेल्या या स्पर्धकांनी चुरशीची लढत देत. श्रोत्यांचे मनोरंजन केले.
16 स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी परीक्षकांनी 6 स्पर्धक निवडले त्यात नगरच्या सन्मिता शिंदे यांची निवड करण्यात आली. सन्मिता यांनी गायलेल्या रुनुझुणू रूनुझुणू रे भ्रमरा, बोलावा विठ्ठल  पहावा विठ्ठल, हे अभंग श्रोत्यांच्या विशेष लक्षात राहतील.अभंग,भक्ती संगीत या सन्मिता यांच्या जमेच्या बाजू आहेत. या अगोदर झी टॉकीज या वहिनी वरून सादर केलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील मोगरा फुलला या कार्यक्रमातून  सन्मिता घराघरा पर्यंत पोहोचल्या होत्या. अभंग भक्तिगीत या सोबतच गझल, लावणी, लोकगीत,असे विविध गीत प्रकार गात सन्मिता यांनी स्पर्धेत आपली विशेष ओळख निर्माण केली.त्यांनी गायलेल्या शुक्राची चांदणी या लावणीला श्रोत्यांची पसंती मिळाली.आपण गायलेल्या लावणीत पावित्र्य जाणवले असे म्हणत परीक्षक महेश काळे यांनी त्यांचे कौतुक केले. तर येणार्‍या काळात सन्मिता तुम्ही तुमच्या गायन शैलीने एक वेगळं वलय निर्माण कराल,पुढील दहा वर्षात तुमचे जगभर फॅन्स असतील असे म्हणत परीक्षक अवधुत गुप्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सन्मिता यांनी सुरवातीपासूनच  गायना साठी अवघड असणार्‍या गीतांची निवड केलेली पहायला मिळाली.उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या,वाटा वाटा वाटा ग,सखी ग मुरली मनोहर, या गीतांचे उत्तम सादरीकरण करत त्यांनी सर्वांची वाहवा मिळवली.
अंतिम स्पर्धेत परीक्षकांच्या गुणांसोबत श्रोत्यांची मते अपेक्षित होती. श्रोत्यांनी मतदान करणे अपेक्षित होते.नगरची स्पर्धक अंतिम स्पर्धेत विजयी ठरावी यासाठी सर्व नगर करानी प्रयत्न केले.ग्रामीण भागातूनही उदंड प्रतिसाद मिळाला.अनेक राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांनी सन्मिता यांना मतदान करण्याचे आवाहन केले. अनेक तरुणांनी समाज माध्यमातून प्रचाराची धुरा सांभाळली.
सन्मिता या  गणेश शिंदे यांच्या पत्नी आहेत.गणेश शिंदे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय व्याख्याते आहेत. त्यांच्या व्याख्यानांचा एक वेगळा चाहता वर्ग राज्यभर आहे.  राज्यातील अनेक मान्यवरांनी सन्मिता यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.अहमदनगर मधील पारगाव भातोडी सन्मिता यांचे मूळ गाव आहे.निकाल कळताच पारगाव येथे तरुणांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
सहकार, ग्रामविकास, कला, साहित्य क्रीडा अशा अनेक क्षेत्रात आजवर नगर ने राज्यासाठी आदर्श निर्माण केले आहेत.आज मानाची कट्यार मिळवत व महागायीका हा किताब मिळवत. सन्मिता यांनीही या निमित्ताने वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सन्मिता यांचे यश नगर करांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment