पारनेर तालुक्यातील अवैध व्यवसायांसह वाळू तस्करांवर कारवाई करावी. मनसेचे पारनेर शहराध्यक्ष वसिम राजे यांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

पारनेर तालुक्यातील अवैध व्यवसायांसह वाळू तस्करांवर कारवाई करावी. मनसेचे पारनेर शहराध्यक्ष वसिम राजे यांची मागणी

 पारनेर तालुक्यातील अवैध व्यवसायांसह वाळू तस्करांवर कारवाई करावी.

मनसेचे पारनेर शहराध्यक्ष वसिम राजे यांची मागणी

निर्बंधांच्या अंमलबजावणीत दुजाभाव; सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली- वसीम राजे यांचा आरोप



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर:करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू असतानाही पारनेर तालुक्यात अवैध मद्यविक्रीसह इतर अवैध व्यवसाय अनिर्बंधपणे सुरू आहेत.पारनेर व सुपे पोलिसांच्या हेतूपुरस्सर दुर्लक्षामुळे सुरू असलेले अवैध व्यवसायांवर कारवाई करावी.अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मक्लेष आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

             पारनेर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांमार्फत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी केवळ सर्वसामान्य नागरिक, किराणा दुकानदार,भाजी,फळे,दूध,अंडी विक्रेत्यांवर जाचक पध्दतीने केली जात आहे.करोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ते आवश्यक आहे.मात्र दुसरीकडे पारनेर व सुपे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.दारु,गांजा,गुटखा,मावा सहजपणे उपलब्ध होत आहे.तालुक्यात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे.मुळा,कुकडी,हंगा नदीपात्रासह इतर नद्या,नाल्यांमधून सुमारे २५० ते ३०० गाड्यांमधून अहोरात्र वाळू उपसा सुरू आहे.वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे.असे गंभीर आरोप वसिम राजे यांनी निवेदनात केले आहेत.

         तालुक्यातील पळशी येथे वाळूच्या वाहनाने चिरडल्याने एकाचा मृत्यू झाला.वाळू वाहनांचे अपघात नित्याचे झाले आहेत.भरधाव वेगाने जाणाऱ्या विनाक्रमांकांच्या वाळू वाहनांची तालुक्यातील विविध रस्त्यांवर दहशत निर्माण झाली आहे.सुपे व पारनेर पोलिस अवैध व्यवसायांसह वाळू तस्करीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत.असा आरोप करतानाच या गोष्टींना आळा घालावा अशी मागणी वसिम राजे यांनी पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

               सर्वसामान्य नागरिक, भाजीपाला,फळे,दूध विक्रेते दहशतीखाली तर अवैध मद्यविक्रेते, वाळूतस्कर मोकाट असे चित्र तालुक्यात आहे.करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करताना पोलिसांकडून दुजाभाव केला जात असल्याने पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे.या असंतोषाची परिणिती पारनेरच्या भाजी बाजारात पोलिस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यात झाली.ही बाब जिल्हा पोलीस दलाच्या दृष्टीने लांच्छनास्पद असल्याचे वसिम राजे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.पोलीस दलाबाबत निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी.अन्यथा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मक्लेष आंदोलन करण्यात येईल असा इशारा वसिम राजे यांनी निवेदनात दिला आहे.

No comments:

Post a Comment