शहर ‘अहमदनगर’ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

शहर ‘अहमदनगर’ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे!

 शहर ‘अहमदनगर’ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे!

आज अहमदनगर शहराचा 531 वा स्थापना दिवस; चांदबिबी पुन्हा शहरात आली तर ?

जेंव्हा आपण अहमदनगर शहराच्या वैभवशाली इतिहासाची आजच्या वर्तमानाशी तुलना करतो तेंव्हा घोर निराशा पदरी पडते. इतिहास आपल्याला दिव्य वाटू लागतो. कोणे एके काळी जागतिक कीर्तीचे हे शहर सद्यस्थितीत आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आपल्या मागून नाशिक, औरंगाबाद इत्यादी शहरे पुढे निघून गेली आणि आपण होतो त्यापेक्षाही मागे जात आहोत असे एकूण चित्र दिसते. पूर्वी अहमदनगरच्या विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असे, आज अहमदनगरच्या सुशिक्षित आणि होतकरू तरुणांवर पोटापाण्यासाठी शहर सोडण्याची वेळ आली आहे. रोजगारासाठीच्या स्थलांतराचे प्रमाण वाढले असून भविष्यात आपले शहर पेन्शनरचे शहर होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. स्थापना दिवस फक्त इव्हेंट म्हणून साजरा करण्याचा दिवस नसून आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा देखील दिवस असतो. इतिहासाचे सोडा, गेल्या अनेक वर्षात अहमदनगरने काय प्रगती केली याचा आढावा घेतल्यास निराशाच हाती येते. शाश्वत विकासाच्या दृष्टीने कोणती उल्लेखनीय कामे झाली? काय महत्त्वपूर्ण बदल आणि विकास घडला?  आजही चाँदबीबी पुन्हा शहरात आली तर तिला काहीच बदल दिसणार नाही असे नगरकर नेहमीच विनोदाने सांगतात. वास्तविक पाहता आपल्याकडे विकासाची परिभाषाच  विचित्र आहे. कोणी विकासाला प्रक्रिया समजते तर कोणी रस्त्याच्या मजबुतीकरणालाआणि डांबरीकरणाला विकास समजते. एकतर कागदोपत्री किंवा माध्यमातून फोटो सेशन द्वारे विकास होत आहे. वास्तविक विकास गायब आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या पुढार्यांना जनतेला सोशल मिडीयाच्या माध्यमातून आभासी प्रगतीचे स्वप्न दाखविण्याचा गंभीर आजार झाला की काय असे वाटते.

शहरातील आरोग्य व्यवस्थेचे पितळ करोनामुळे उघडे पडले आहे. मनपाच्या एमआर मशीनला सुरवात करण्याचा योग करोना काळात देखील आला नाही. महापालिकेची रक्तपेढी ऑक्सिजनवर आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे सिटी स्कॅन नेहमीच आजारी असते. अनेक वेळा सिव्हिल हॉस्पिटलला ऑक्सिजन प्रकल्पाचे पैसे येऊन देखील त्यांनी हलगर्जीपणा मुळे हा प्रकल्प केला नाही आणि पैसे परत पाठविले. आम्ही या प्रकल्पासाठी अनेक वेळा आंदोलन केले. आज जर तो प्रकल्प चालू असता तर निश्चितच तर ऑक्सिजनसाठी नगरकरांची धावपळ झाली नसती. काही मृत्यू वाचविता आले असते. शहरातील प्रदूषणाची समस्या देखील गंभीर होत चालली आहे प्रदूषण विभागाकडे प्रदूषणाची माहिती नाही. तर मग इलाज तरी कसा होणार?


॥ आर्कीटेक्ट अर्शद शेख ॥
अहमदनगर ः आज अहमदनगर शहराचा 531 वा स्थापना दिवस आहे.  सालाबादप्रमाणे आपण हा दिवस उत्साहाने साजरा करतो आणि वैभवशाली इतिहासात रमतो. ’अहमद’चा अर्थ ज्याची अत्याधिक स्तुती केली जाते आणि नगर म्हणजे शहर. अर्थात अहमदनगर म्हणजे अत्याधिक स्तुतीस पात्र असे शहर जेंव्हा या शहराचे निर्माण पूर्ण झाले तेव्हा पाहता पाहता शहराच्या सौंदर्याची आणि नियोजनबध्दतेची चर्चा फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात होऊ लागली. तत्कालीन जगाच्या सर्वात सुंदर अशा कैरो आणि बगदाद या शहराबरोबर आपल्या अहमदनगरची तुलना होऊ लागली. जगाच्या अप्रतिम शहरात अहमदनगरची गणना होऊ लागली. अहमदनगरने वास्तवात आपले नाव सार्थ करुन दाखविले. निजामशहाच्या राज्याची राजधानी असलेले हे शहर फक्त राजकीय दृष्ट्याच महत्त्वपूर्ण नव्हते तर संरक्षण, शिक्षण, पर्यटन, पर्यावरण कला-संस्कृती आणि शहर विकासाच्या दृष्टीने देखील सुप्रसिद्ध ठिकाण होते. हा झाला अहमदनगर शहाराचा देदिप्यमान इतिहास. दर वर्षी स्थापना दिवसाला आपण इतिहासाची आठवण करुन घटकाभर तरी आनंदित झाल्याशिवाय राहत नाही.

विकास करण्यापूर्वी त्याची दशा आणि दिशा निर्धारित करावी लागते. त्याचे दीर्घकालीन सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित असते. प्राथमिकता ठरवावी लागते. परंतु शहराला कोणतेच नियोजन असल्याचे आढळत नाही आणि म्हणून इंग्रजी म्हणीप्रमाणे ऋरळश्रळपस ीें श्रिरप ळी श्रिरपळपस ीें षरळश्र. नियोजन करण्यामध्ये अपयशी होतात ते वास्तविक पाहता अपयशाचे नियोजन करीत असतात. जवळपास हीच गत आपली झाली म्हणून गेल्या दहा वर्षात शहरातील दोनतीन देखील उल्लेखनीय काम दृष्टीस येत नाही. सातशे कोटीचे बजेट असलेली महापालिका एवढ्या प्रचंड पैशाचे करते तरी काय? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो आहे. पाणी कुठं मुरतय हे कोण पाहणार?  नवनीतभाई बार्शीकर यांनी ज्या विकास योजना राबविल्या त्यानंतर विकासाचा आढावा घेतल्यास शहराच्या विकासाला पक्षघात झाला की काय याची शंका येते. कोट्यवधी रुपयांचा फेज-2 सारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प तीन पंचवार्षिक योजना पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. पैसा उपलब्ध असताना फेज 2ला दहा वर्षे उशीर का झाला? याचे उत्तर कोण देणार की नाही? विलंब झाल्याने लोकांना उपभोग घेता आला नाही एवढेच नाही, तर त्याचा खर्च देखील प्रचंड प्रमाणात वाढला आहे.  राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या हलगर्जीमुळे झालेल्या या नुकसानीला जबाबदार कोण? फेज-2 च्या अंतर्गत मुकूंदनगरची पाण्याची टाकी दहा वर्षापासून पाण्याची वाट पाहून म्हतारी झाली. अहमदनगरच्या पुरातत्त्व विभागाने त्याला ऐतिहासिक वास्तू म्हणून जाहीर करावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. महत्त्वकांक्षी अमृत योजना, भुयारी गटार योजनची देखील गत या पेक्षा वेगळी नाही. नियोजनशून्य शहरात आधी रस्ते केले जातात आणि त्यानंतर गटारी आणि पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी तेच रस्ते उखडून टाकले जातात. इंजिनियरींगच्या विद्यार्थासाठी निश्चितच हे नवीन प्रयोग ठरतील. एका दिवसात रस्ते करण्याचा प्रताप देखील आपल्याकडेच होताना दिसतो. रस्त्याच्या गुणवत्तापेक्षा त्याच्यावर मारलेेले पांढरे पट्टेच जास्त चमकतात.
शहराचा सांडपाणी प्रकल्प अनेक वर्षापासून खराब झाल्यामुळे प्रदूषणाचा कोणताही विचार न करता किंवा  कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी सीना नदीत सोडले जात आहे. शहरातील काही बिल्डरांनी तर  अधिकार्यांशी संगनमत करून चक्क नालेच गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. प्रशासन मूग गिळून गप्प आहे. अहमदनगर हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे उत्कृष्ट पर्यटन शहर होऊ शकेल. परंतु या संदर्भात काहीच प्रगती झालेली नाही. कोणत्याच वास्तूंचा जीर्णोद्धार झाला नाही की पर्यटकांना तिथे पोहचण्याची सुविधा करण्यात आली नाही. ऐतिहासीक भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाची योजना अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. त्याकडे पाहायला कोणाला वेळ नाही. पर्यटन विकास हा आपल्या अग्रक्रमाचा भागच नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर होऊन अनेक वर्ष झाली. मिळालेल्या निधीतून जर उपकेंद्राची प्रशासकीय इमारत आणि इतर महत्त्वपूर्ण इमारती बांधून उपकेंद्र कार्यान्वित करण्याऐवजी प्रशासनाने सर्व निधी जागेच्या कंपाऊंडवर खर्ची घालण्यात आला. सध्या कंपाऊंड वॉल जवळपास साठ एकर जमिनीचे संरक्षण करण्यात व्यस्त आहे. शहराच्या इतर शासकीय  शाळांची अवस्था देखील दयनीय आहे. कोणतीही नवीन इमारत न बांधणार्या प्रशासनाने चालू स्थितीत असलेले नेहरू मार्केट जमीनदोस्त केले. त्याची दहावी पुण्यतिथी होऊन देखील नवीन वास्तूनिर्मितीला मुहूर्त लाभत नाही. भाजी मार्केट साठी जागा नसल्यामुळे जागो जागी भाजीविक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करीत आहेत. शहरातील तथाकथित 70 उद्याने फक्त अहमदनगरच्या विकास आराखड्याची शोभा वाढवताना दिसतात. ऐतिहासिक म्युन्सिपल कौंन्सील हॉल जळून दहा वर्षे झाली तरी पुनर्निर्मितीच्या दृष्टीने काहीच हालचाल दिसत नाही.
अहमदनगरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार्या अहमदनगर-पुणे शटल ट्रेनचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. शहराच्या सामाजिक संघटना गेल्या दहा वर्षापासून सातत्याने या विषयाचा पाठपुरावा आणि त्यासाठी आंदोलने करीत आहे.विकासाचा व्यापक अर्थ नागरिकांना उत्कृष्ट नागरी सेवा सुविधा देऊन त्यांचे जगणे सुसह्य करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे आहे. रोजगार निर्मिती, उत्कृष्ट शिक्षण व आरोग्यसेवा, प्रदूषण मुक्त पर्यावरण प्रदान करणे या विकासाच्या संकल्पना आहे.आशा परिस्थितीत  अहमदनगर शहाराचा विकास झाला हो! असे आपण कोणत्या तोंडाने म्हणणार? एवढे असून देखील अहमदनगर विकासाच्या प्रगती पथावर आहे असेच वाटत असेल तर अशा आभासी विकासाला आमचा कोटी कोटी प्रणाम!
परंतु वास्तविकता यापेक्षा भिन्न असेल तर निश्चितच अहमदनगर हे शहर  अर्थात ज्याची अत्याधिक  स्तुती केली जाते ते शहर बनण्याची शहरवासीय आतुरतेने वाट पाहत आहे.

No comments:

Post a Comment