आमदार, मनपा सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे शहर व्हेंटिलेटरवर गेल्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचा आरोप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

आमदार, मनपा सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे शहर व्हेंटिलेटरवर गेल्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचा आरोप

 आमदार, मनपा सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे शहर व्हेंटिलेटरवर गेल्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचा आरोप 



नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसह आमदारांवर सडकून टीका केली असून केवळ सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे नगर शहरातील हजारो लोकांना आज आरोग्य आणीबाणीला सामोरे जावे लागत असून यांच्यामुळेच शहर व्हेंटिलेटरवर गेल्याचा आरोप केला आहे. 

काळे म्हणाले की, विद्यमान आमदार ज्यांच्या नेतृत्वाखाली मनपामध्ये भाजप, राष्ट्रवादीची सत्ता आहे, त्यांची नागरिकांप्रती असणारी अनास्था व असंवेदनशीलतेमुळे मनपाने जबाबदारी पूर्णतः झटकली असून ही महामारी एक वर्षापासून सुरू असून देखील शहरामध्ये कोणतीही आरोग्यविषयक यंत्रणा ते उभी करू शकलेले नाहीत. 

आमदार हे केवळ फोटोसेशन मध्ये व्यस्त आहेत. ते कोणताही रिझल्ट देऊ शकलेले नाहीत. जिल्हा प्रशासनावर संतापण्या ऐवजी मनपा प्रशासना कडून काम करून घेण्यासाठी पुढे यावे असा खोचक सल्ला काळे यांनी आमदारांना दिला आहे. नागरिकांना दिलासा मिळण्याची दृष्टीने काँग्रेस मनपाला सर्वतोपरी सहकार्य करेल हेही सांगण्यास काळे विसरलेले नाहीत.

किरण काळे म्हणाले की, एका रुग्णाला खाजगी रुग्णालयामध्ये जावे लागल्यास सरासरी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च येतो. एका कुटुंबात चार सदस्य आहेत असे गृहीत धरले तरी नव्या स्ट्रेन प्रमाणे एका व्यक्तीस बाधा झाल्यास घरातील सर्व व्यक्तींना बाधा होते असे निरीक्षणात आले आहे. त्यामुळे एका कुटुंबाचा खाजगी रुग्णालयातील खर्च हा साधारणतः सहा ते आठ लाख रुपयांच्या घरात जातो आहे. लॉकडाऊन मुळे रोजगार बंद असताना सर्वसामान्य नागरिक, गोरगरीबांना हा खर्च कोणत्याही परिस्थितीमध्ये परवडणारा नाही. प्रत्येक नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये एवढा मोठा खर्च करून आरोग्य सुविधा मिळवू शकत नाही. 

शहरातील नागरिक कर भरतात. परंतु त्या बदल्यात नागरिकांना आरोग्य सुविधा देणारे मनपाचे एकही सुसज्ज रुग्णालय नाही. राज्यातील इतर महानगरपालिकांची स्वतःची अद्यावत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असून हॉस्पिटल्स अद्यावत आहेत याकडे काळे यांनी लक्ष वेधले आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये नगर शहरासाठी १००० बेडचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभे करण्याची मागणी केली आहे. ना.थोरात यांनी मनपा आयुक्तांना याबाबत तातडीने चाचपणी करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीनंतर काळे यांनी आमदारांवर टीका केली आहे.

No comments:

Post a Comment