काँग्रेसची नगर शहरासाठी १००० रुग्ण क्षमतेचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारण्याची मनपाकडे महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

काँग्रेसची नगर शहरासाठी १००० रुग्ण क्षमतेचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारण्याची मनपाकडे महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत मागणी

 काँग्रेसची नगर शहरासाठी १००० रुग्ण क्षमतेचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारण्याची मनपाकडे महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत मागणी ; ना.बाळासाहेब थोरात यांचे मनपा आयुक्तांना चाचपणी करण्याचे आदेशनगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी : नगर शहरामध्ये कोरोनाचे दररोज सुमारे ८०० ते ९०० रुग्ण सापडत आहेत. मागील दोन महिन्यांमध्ये शहरामध्ये हजारो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. शेकडो मृत्यू झाले आहेत. शहरातील सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब लोकांसाठी मनपाने तातडीने जम्बो ऑक्सीजन कोविड सेंटर उभारण्याची मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या कोरोना आढावा बैठकीत केली आहे. ना.थोरात यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना तातडीने याबाबत चाचपणी करण्याचे आदेश बैठकीत दिले आहेत. 

यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सिव्हिल सर्जन डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अन्न व प्रशासन उपायुक्त कातकडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, जेष्ठ नेते दीप चव्हाण, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, जाहीद शेख आदी उपस्थित होते. 

एमआयडीसीतील वखार महामंडळ तसेच मोठ्या प्रमाणात जागा असणाऱ्या ठिकाणांचा शोध घेण्याच्या सूचना ना.थोरात यांनी मनपा आयुक्तांना बैठकीत केली. एमआयडीसीमध्ये असणाऱ्या ऑक्सीजन प्लांट मधून ऑक्सिजनचा पुरवठा सहजपणे होऊ शकतो. त्यामुळे या प्लांट जवळच शक्यतो जागा शोधण्यास प्राधान्य द्यावे अशी सूचना ना. थोरातांनी बैठकीत केली आहे. 

किरण काळे म्हणाले की, भविष्यातील वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा विचार करता ऑक्सिजन बेडचा तुटवडा लक्षात घेत नगर शहरामध्ये १००० ऑक्सिजन बेडची क्षमता असणाऱ्या जम्बो कोविड सेंटरची तातडीने उभारणी करण्यात यावी. अत्यवस्थ होणार्‍या कोरोना रुग्णांसाठी या सेंटरमध्ये किमान २०० व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात यावी. 

रेमेडीसेवर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. या ठिकाणच्या सर्व सुविधा या नागरिकांसाठी विनामूल्य करण्यात याव्यात. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सातत्यपूर्ण राहील यासाठी मनपाने देखील स्वतःचा स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट याठिकाणी उभा करावा अशी मागणी काळे यांनी बैठकीत केली. 

किरण काळे म्हणाले की, सरकारी आरोग्य यंत्रणा म्हणून नगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरिबांना जिल्हा शासकीय रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. मुळतः ही व्यवस्था ग्रामीण जिल्ह्यासाठी निर्माण केलेली आहे.शहरासाठी मनपा ही स्थानिक स्वराज्य संस्था असून त्यांची शहरातील नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा उभी करण्याची प्राथमिक जबाबदारी आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या धर्तीवर नगर शहरातील नागरिकांसाठी मनपाचा स्वतंत्र कोरोना मदत व नियंत्रण कक्ष तातडीने स्थापन करण्यात यावा. हा कक्ष २४ तास कार्यान्वयित असावा. या कक्षात विविध विभागांची निर्मिती करून त्या विभागांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. सदर अधिकारी आणि या कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक नागरिकांसाठी तातडीने जाहीर करण्यात यावे, अशी मागणी काळे यांनी बैठकीत काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्तांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment