सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करोना काळातही बाळंतपण सुरळीत होऊ शकते - डॉ. अमोल जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करोना काळातही बाळंतपण सुरळीत होऊ शकते - डॉ. अमोल जाधव

 सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करोना काळातही बाळंतपण सुरळीत होऊ शकते - डॉ. अमोल जाधव

जागतिक आरोग्य दिनानिमित्त सरस्वती हॉस्पिटलमध्ये करोनाकाळ व गरोदरपणा विषयावर मार्गदर्शन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोना महामारी मुळे आरोग्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलला आहे. आज करोनावर रामबाण औषध नसले तरी लसीकरण व योग्य काळजी घेतल्यास करोनाला आपण नक्कीच थोपवू शकतो. या काळात महिला वर्गातून सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला तो गरोदरपणाचा. या काळात गरोदरपणा योग्य राहील का असे नेहमी विचारले जाते. करोना काळात गर्भधारणा राहील्यास घाबरून न जाता थोडी काळजी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले तर बाळंतपण उत्तम रीतीने होऊ शकते. यासाठी योग्य आहार, हलका व्यायाम व सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा असे आवाहन स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अमोल जाधव यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त  माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी कोविड काळातील गरोदरपणा या विषयावर आरोग्य मार्गदर्शन व जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. जाधव बोलत होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास रेडिओलॉजीस्ट डॉ. शितल तांदळे, आहारतज्ज्ञ डॉ. आदिती पानसंबळ यांच्यासह महिला रूग्ण, स्टाफ उपस्थित होता.
डॉ.जाधव पुढे म्हणाले की, सरस्वती हॉस्पिटलमध्ये करोना काळात सर्व काळजी घेऊन गरोदर मातांना सेवा दिली आहे. गरोदरपणात योग्य काळजी घेतली तर करोनाला लांब ठेवता येऊ शकत. या काळात गरोदरमातांनी कोणत्याही कारणास्तव घाबरून न जाता काही शंका वाटल्यास लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधावा. घरीच राहून समतोल आहार, पुरेशी विश्रांती, हलके व्यायाम प्रकार, ध्यानधारणा करावी. हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी येताना पुरेसं सोशल डिस्टन्सिंग राखणे, सॅनिटाजरचा वापर केला पाहिजे.  किरकोळ लक्षणं आढळली तरी मनाने औषध घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डिलिव्हरी नंतरही बाळ व मातेने घरात स्वतंत्र रहावे. कपडे, भांडे वेगळे वापरावेत. सगळी काळजी घेऊनही करोनाची बाधा झाली तरी  अजिबात घाबरून न जाता योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत. वेळीच चांगले उपचार मिळाले तर तुम्ही नक्कीच करोनामुक्त होऊ शकता. गरोदरपणात महिलांमध्ये निसर्गाकडूनच वेगळी ताकद निर्माण होते.त्यामुळे कोविड काळात गरोदरपणाबाबत सकारात्मक रहायला पाहिजे. रेडिओलॉजीस्ट डॉ. शितल तांदळे म्हणाल्या की, गरोदरपणात ठराविक अंतराने सोनोग्राफी करावी लागते. यासाठी सोनोग्राफी रूममध्ये नियमित सॅनिटायजेशन केलं जातं. एकीची तपासणी झाल्यानंतर रूम सॅनिटायज करूनच दुसर्या महिलेची तपासणी केली जाते. त्यामुळे गरोदर मातांनी निःशंक राहून सोनोग्राफी करावी. आहारतज्ज्ञ डॉ. आदिती पानसंबळ म्हणाल्या की, करोना काळात समतोल, पौष्टिक आहाराचे महत्त्व वाढले आहे. गर्भाची सुयोग्य वाढ होण्यासाठी तसेच मातेचही आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात पौष्टिक घटकांचा समावेश आवर्जून केला पाहिजे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार योग्य प्रमाणात घेतल्यास करोनालाही थोपवणे शक्य आहे. करोनाचे निदान झाले तरी सकस आहार घेणे महत्त्वाचे असते. या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी महिला रुग्णांच्या आरोग्य विषयक विविध शंकांचे निरसन केले.

No comments:

Post a Comment