तात्यासाहेबांचं समृद्ध आयुष्य रंगतारा ग्रंथात साहित्य रुपाने मांडले ः प्रा. डॉ. निमसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

तात्यासाहेबांचं समृद्ध आयुष्य रंगतारा ग्रंथात साहित्य रुपाने मांडले ः प्रा. डॉ. निमसे

 तात्यासाहेबांचं समृद्ध आयुष्य रंगतारा ग्रंथात साहित्य रुपाने मांडले ः प्रा. डॉ. निमसे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः माणसाने आयुष्यात जगताना दूरदृष्टी व सामाजिक दृष्टिकोन ठेवून जगले पाहिजे प्रा.रंगनाथ भापकर यांचे समृद्ध आयुष्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या आयुष्याचा समग्र जीवनपट त्यांच्या पत्नी सौ. तारका भापकर यांनी रंगतारा या ग्रंथातून मांडला असल्याचे प्रतिपादन लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी केले.
गणराज प्रकाशन अहमदनगर यांनी मराठी भाषा सप्ताहानिमित्त विविध साहित्यिक उपक्रम आयोजित केले. या अंतर्गत नुकताच प्रा. रंगनाथ भापकर तथा तात्यासाहेब यांच्या संघर्षमय हृदयस्पर्शी जीवन कार्यावर आधारित व सौ.तारका भापकर लिखित रंगतारा चरित्र ग्रंथ व इंजी.मंगेश भापकर संपादित तात्यासाहेब ग्रंथ प्रकाशन सोहळा कोहिनूर मंगल कार्यालयात प्रा. रंगनाथ भापकर यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभ कार्यक्रमात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व लेखिका सौ.तारका भापकर यांनी केले. माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सिने गीतकार बाबासाहेब सौदागर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, साहित्य परिषदेचे चंद्रकांत पालवे, प्राचार्य अशोक दोडके, जिल्हा मराठा संस्थेचे संस्था अधीक्षक मोडवे भाऊसाहेब, दत्तापाटील नारळे, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, नारायणगाव येथील मानसोपचार तज्ञ डॉ. घाडगे पाटील, सत्कारमूर्ती रंगनाथ भापकर, सौ.तारका भापकर, मंगेश भापकर, प्रकाशक ग.ल. भगत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी कुलगुरू  निमसे म्हणाले की, माणसानं कष्टाळू सेवाभावी व संवेदनशील असले पाहिजे. तात्यासाहेबांच जीवन पुढील पिढ्यांना निश्चित दीपस्तंभासारखे आहे .त्यांच्या जीवन कार्या वरील हे दोन्ही ग्रंथ निश्चित चरित्र साहित्य प्रकारात भर घालणारे आहेत.गणराज प्रकाशनाचे काम साहित्य क्षेत्रात प्रभावी पणे चालू असून अनेक साहित्यिकांना उभं करण्याचं काम प्रकाशनाने केले. मराठी भाषा दिन व विज्ञान दिन यांचा समन्वय घडला की निश्चित भविष्यात चांगल्या साहित्यकृती घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सेवानिवृत्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने रंगनाथ भापकर यांचा गौरव समितीच्या वतीने व रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गणराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या रंगतारा व तात्यासाहेब या पुस्तकांचा पुस्तक प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी इंजिनीयर मंगेश भापकर, सत्कारमूर्ती तात्यासाहेब  भापकर, डॉ. स्नेहल घाडगे, दत्तापाटील नारळे, चंद्रकांत पालवे, प्राचार्य अशोक दोडके आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
ज्येष्ठ साहित्यिक बाबासाहेब सौदागर म्हणाले की, मराठी भाषा संवर्धनासाठी गणराज प्रकाशन अविरतपणे कार्यरत आहे नवोदितांना लिहित करणेसाठी साहित्यकृती निर्माण करणं तरल व भावस्पर्शी ग्रंथ आज प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.तात्यासाहेब यांच समृद्ध आयुष्य ते जगले त्यांचा तो जीवनपट सर्वांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर म्हणाले की, माणसानं संवेदनशील मनांना आयुष्य जगले की त्याची प्रचिती येते. तात्यासाहेब हे खरे अभिनय संपन्न जीवन जगले. सर्व क्षेत्रात उत्तुंग काम करणारा नेतृत्व संपन्न कर्तृत्व म्हणजे तात्यासाहेब आहेत. हा सर्व त्यांच्या हृदयस्पर्शी रोमहर्षक जीवनपट त्यांच्या ग्रंथातून उलगडला आहे. तात्यासाहेब आयुष्याच्या रंगमंचावर यशस्वी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले. आभार प्रकाशक ग.ल. भगत यांनी मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम अटी शर्तीचे काटेकोर पालन करत सदर कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here