खावटी व इतर कर्जाची शंभर टक्के वसुली करा ः प्रशांत गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

खावटी व इतर कर्जाची शंभर टक्के वसुली करा ः प्रशांत गायकवाड

 खावटी व इतर कर्जाची शंभर टक्के वसुली करा ः प्रशांत गायकवाड

पारनेर येथे वसुली बैठक संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः जिल्हा बँकेमार्फत वितरीत करण्यात आलेेले खावटी तसेच इतर कर्जाची मार्च अखेर शंभर टक्के वसुली करण्याच्या सुचना बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी बँक अधिकारी व सेवा संस्थांच्या सचिवांच्या बैठकीत केली.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, बँकेचे अध्यक्ष उदयराव शेळके यांच्या सुचनेनुसार तालुक्यातील अधिकारी तसेच सचिवांची बैठक घेण्यात आली असून ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात,शंकरराव गडाख,प्राजक्ता तनपुरे व इतर नेते मंडळी यांनी आपल्या तालुक्याला मोठी जबाबदारी दिल्याने तालुक्याची वसुली शंभर टक्के करून जिल्हयात आपले वेगळेपण जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कर्जाची वसुली हे कोणा एकट्याचे काम नाही. त्यामुळे सर्वानी सामुहिक प्रयत्न करून आपले उद्दिष्ट पुर्ण करायचे आहे. आपण वसुली केली तर शेतकरी वर्गाला पुन्हा कर्जाचे वितरण करता येईल. शेतकरी वर्गाला अधिकच्या सुविधा देता येतील. बँकेचे अध्यक्ष तसेच संचालक मंडळ शेतकर्‍यांसाठी अधिकच्या योजना राबविण्याच्या तयारीत आहेत. सेवा संस्था तसेच सचिवांसाठीही योजना राबविण्याचे नियोजन आहे. राज्यातील आघाडी सरकारचे आपल्या बँकेला भक्कम पाठबळ आहे. आ. नीलेश लंके यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध योजना बँकेमार्फत राबविण्याचेही नव्या संचालक मंडळाचे धोरण असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
सेवा संस्थांसाठी एक विशेष संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याचे सव्हर जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत असेल. त्यामुळे सेवा संस्थांच्या कारभाराची माहीती दररोज मिळण्यास मदत होणार आहे. जिल्हयात 300 ठिकाणी मायक्रो एटीएम बसविण्यात येऊन ग्राहकांना सुविधा देण्यात येणार आहेत. सेवा संस्था विविध व्यवसाय करू शकतात. तशा पद्धतीचे धोरण अवलंबून शेतीपुरक व्यवसायांना चालना देण्यासाठीही जिल्हा बँक पुढाकार घेणार आहे. नाबार्ड, केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजना सेवा संस्थांमार्फत राबवून या संस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे गायकवाड म्हणाले.
तालुक्यात 33 कोटी रूपयांचे खावटी कर्ज वितरण करण्यात आले आहे. ते कर्ज मुद्दल तसेच व्याजासह शंभर टक्केे वसुल झालेच पाहिजे. त्याबरोबरच इतर कर्ज सेवा संस्था पातळीवर 90 ते 95 टक्के तर बँक पातळीवर 100 टक्के वसुल झाले पाहिजे यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. आपल्या बँकेचे नाव आशिया खंंडामध्ये घेतले जाते. आता आपली बँक इतर सर्वच आघाडयांवर राज्यात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले.
या बैठकीस बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, सहाय्यक निबंधक सुखदेव सुर्यवंशी, वसुली अधिकारी जे ए देशमुख, शेतीकर्ज व्यवस्थापक ए सी बर्डे, तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके, विशेष वसुली अधिकारी बबन शेलार, कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर लाळगे यांच्यासह विविध शाखांचे शाखाधिकारी, सचिव यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment