रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रभावी धोरण आणणे गरजेचे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रभावी धोरण आणणे गरजेचे

 रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रभावी धोरण आणणे गरजेचे

सिद्धी फाऊंडेशनचे मनोज छाजेड आणि ललित शिंगवी यांचे मत

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सध्या कोरोना रुग्णांची संख्या भीतीदायक पद्धतीने वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, लॉकडाऊन हा त्यावरील उपाय नसून रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी सरकार पातळीवर प्रभावी धोरण आणणे गरजेचे आहे. जमावबंदी हा त्यासाठी एक महत्वाचा पर्याय असू शकतो, असे मत सिद्धी फाऊंडेशन चे मनोज छाजेड आणि ललित शिंगवी (जैन) यांनी व्यक्त केले आहे.
   सगळे व्यवहार अनिर्बंधपणे चालू नयेत आणि पूर्णपणे लॉकडाऊनदेखील असू नये असे सांगून छाजेड म्हणाले की, सरकारने मध्यम मार्गाचा विचार केला पाहिजे. जेणेकरुन व्यवसाय चालू राहतील, आर्थिक घडी विस्कटणार नाही आणि कोरोनादेखील नियंत्रित राहील. पण, सध्याची परिस्थिती आणि रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात काय होऊ शकेल, याची कल्पनादेखील चिंता वाढवणारी आहे. म्हणूनच, तातडीने उपाय करायला हवेत.
रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यासोबतच प्लाझ्माची देखील गरज वाढली आहे. सिद्धी फाउंडेशन तर्फे गेल्या काही महिन्यात राम बांगड यांच्या रक्ताचे नाते ट्रस्टच्या माध्यमातून प्लाझ्मा दानासाठी प्रयत्न केले होते.
   सध्या असलेली रुग्णांची संख्या आणि प्लाझ्मा ची गरज पाहता त्यात फारच मोठी तफावत पडल्याचे सांगून मनोज छाजेड आणि ललित शिंगवी म्हणाले की, प्लाझ्मा हा फक्त पूर्वी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांकडूनच घेता येतो. आम्ही अशा रुग्णांकडे सतत पाठपुरावा करुन अनेकांना प्लाझ्मा मिळवून दिला. पण, सध्या प्लाझ्माचा तुटवडा पडत आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी आपणहून पुढाकार घ्यायला हवा. तरच, आपण अनेकांचा प्राण वाचवू शकू. लोकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवणे, नियमांचे पालन करणे आणि रुग्णांना मदत करणे, याच माध्यमातून कोरोनाला अटकाव करु शकतो.

No comments:

Post a Comment