अतिक्रमण दूर करा; अन्यथा आंदोलन! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

अतिक्रमण दूर करा; अन्यथा आंदोलन!

 अतिक्रमण दूर करा; अन्यथा आंदोलन!

महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहराची ओळख असलेले कापड बाजार, गंजबाजार, शहाजी रोड, नवी पेठ, मोची गल्ली ही बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रात नावाजली जाते. नगरचा कापड बाजार तर पूर्वीपासून राज्यात वेगळे स्थान मिळवून आहे. मात्र गेल्या काही वर्षात बाजारपेठेला ग्रहण लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण बाजारपेठेचा परिसर अतिक्रमण व समस्यामुक्त करणे गरजेचे असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव देडगावकर, सेक्रेटरी किरण व्होरा उपस्थित होते. नगरची बाजारपेठ गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांचा सामना करीत असून प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास व्यापारी आंदोलन करण्याच्या मनस्थितीत असल्याचे देडगांवकर यांनी सांगितले.

महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक जाग येईल तेव्हा बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवते. मात्र अनेकदा पथक येण्याची टीप फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांना आधीच मिळते. त्यामुळे ते आधीच गाशा गुंडाळतात. अनेक वेळा मनपाची अतिक्रमण विरोधी पथकाची पाठ फिरताच अवघ्या काही मिनिटात विक्रेते पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करतात. अनेक वेळा मनपाचे पथक बुधवारी बाजारपेठ बंद असलेला दिवस निवडून त्या दिवशी दिवसभर बाजारपेठ तैनात राहते. त्या दिवशी बाजार,  बाजारातील बहुतांश दुकाने बंद असतात, विक्रेतेही नसतात, त्या दिवशी कारवाई करण्यातून नेमके काय साध्य होते? हा मुळातच विचार करण्यायोग्य प्रश्नच आहे.महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे व रस्त्यावर अवैद्य रित्या व्यवसाय करणारे विक्रेते यांच्यातील पाठशिवणीचा खेळ आता सर्वांनाच ज्ञात झालेला आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण स्वतः जिल्हाधिकारी तथा मनपाचे आयुक्त म्हणून काम करताना अतिशय ठसा उमटवणारे काम करून सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेत आहात. आपल्या कारभारामुळे मनपा प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता आली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपले एम जी रोड व्यापरी मर्चंटस् असोसिएशन तर्फे अभिनंदन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपण आता प्राधान्यक्रमाने नगर शहरातील बाजारपेठेचा अनेक वर्षांपासून कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी पावले उचलावीत अशी आमची आग्रहाची विनंती आहे.आपण दीर्घकालीन नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी केल्यास बाजारपेठेतील रस्ते मोकळे होण्याबरोबरच व्यापार्यांना या रस्त्यावरील विक्रेत्यामुळे होणारा त्रासही कमी होईल. सध्या संपूर्ण बाजारपेठेतील रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ग्राहकांना बाजारपेठेत येऊन खरेदी करण्याची इच्छा असली तरी वाहतूक कोंडी, रस्त्यावरील विक्रेत्यांची आरेरावी त्यामुळे ते उपनगरांमध्येच खरेदी उरकून घेतात. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर होत आहे. अनेक दुकानदार, व्यावसायिकांची मोठी गुंतवणूक करून बाजारपेठेत जागा घेतल्या आहेत. शोरूम थाटल्यावर मोठा खर्च केलेला आहे. परंतु, बाजारपेठेत ग्राहक येत नसल्याने व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ ओस पडू लागली तर शहराचा विकास कसा साधता येऊ शकेल. बाजारपेठेतील दुकानांमध्ये हजारो सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होतो. ग्राहक नसल्यास व्यावसायिकांनाही अशाप्रकारे रोजगार देणे शक्य होणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून बाजारपेठेचा श्वास कोंडला गेला आहे. याबाबत वेळोवेळी विविध व्यासपीठावरून आवाजही उठवण्यात आला आहे. महानगरपालिका महिन्या-दोन महिन्यातून एक दिवस कारवाई फार्स करते. परंतु, त्यात सातत्य नसल्याने रस्त्यावरील विक्रेत्यांना त्याचेही बळी राहिलेले नाही. अनेकदा या रस्त्यावरील विक्रेत्यांकडून बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना दमदाटी ही केली जाते. कोट्यवधीची गुंतवणूक करून उभे केलेले शोरूम शोरूम समोरच मांडून विकणारे विक्रेते असे अतिशय विदारक चित्र बाजारपेठेत पाहायला मिळते. त्यामुळे आज अनेक दुकानदार व्यावसायिक नवीन गुंतवणूक करण्यास धजावत नाहीत. काहींनी सावेडी केडगाव सारख्या उपनगरांमध्ये स्वतंत्र शाखा सुरु करण्यास सुरुवात केली आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात शहराचे मुख्य बाजारपेठ नावापुरती करण्याची शक्यता आहे. हे चित्र बदलण्यासाठी धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी होणे आपल्याकडून अपेक्षित आहे.पुढील टप्प्यात पोलिस अधीक्षकांसह शहराचे आमदार, खासदार, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनाही बाजारपेठेतील समस्येशी अवगत करून परिस्थिती सुधारण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे देडगांवकर आणि व्होरा यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here