अनामप्रेममध्ये दिव्यांग बांधवांसह शिवजयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

अनामप्रेममध्ये दिव्यांग बांधवांसह शिवजयंती साजरी

 अनामप्रेममध्ये दिव्यांग बांधवांसह शिवजयंती साजरी

मुस्लिम समाज व हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुस्लिम समाज व हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अनामप्रेम संस्थेत अंध, अपंग, मुकबधीर व दिव्यांग बांधवांसह शिवजयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. अनामप्रेममधील दिव्यांगांना फेटे बांधून सोलापूरी चादरी, ब्लँकेट व खाऊचे वाटप करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी करुन शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी सर्वधर्म समभावाची प्रचिती देऊन शिवरायांवरचे प्रेम व्यक्त केले.
प्रारंभी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, अनामप्रेमचे अजित कुलकर्णी, जुनेद शेख, अकलाख शेख, डॉ.रिजवान अहमद, हामजा चुडीवाला, नईम सरदार, समीर मन्यार, सरफराज चुडीवाला, नवेद शेख, रमीज शेख, समीर शेख आदी समाजबांधव उपस्थित होते.प्रास्ताविकात शैलेश बातुलवार यांनी स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेत समाजातील अंध, अपंग, मुकबधीर व दिव्यांगांना प्रवाहात आनण्यासाठी सुरु असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. विजयसिंह होलम यांनी दरवर्षी शिवजयंतीच्या मिरवणुकीत मुस्लिम समाज व प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले जाते. यावर्षी दिव्यांगांसह शिवजयंती साजरी करुन त्यांना आधार देण्याचे कार्य करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अजित कुलकर्णी यांनी दिव्यांग बांधवांना फेटे बांधून व सहकार्य करुन शिवजयंती आनंद द्विगुणीत केला असल्याचे सांगितले. सुदाम देशमुख यांनी मुस्लिम समाज बांधवांनी शिवाजी महाराजांची सामाजिक उपक्रमाने साजरी केलेली शिवजयंती प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले.
रफिक मुन्शी म्हणाले की, शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नव्हते. सर्व समाज व अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. समता व बंधुत्वाची मुल्ये त्यांनी रुजवली. मुस्लिम मावळ्यांसाठी रायगडावर त्यांनी मशिद बांधली. तर अनेक महत्त्वाची जबाबदारी मुस्लिम मावळ्यांवर सोपवली. जातीयवादी शक्तींशी लढा देण्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेऊन त्यांच्या विचारांनी मार्गक्रमण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment