नवी पिढी म्हणजे देशाची संपत्ती ः प.पू. अण्णासाहेब मोरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

नवी पिढी म्हणजे देशाची संपत्ती ः प.पू. अण्णासाहेब मोरे

 नवी पिढी म्हणजे देशाची संपत्ती ः प.पू. अण्णासाहेब मोरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नवी पिढी म्हणजे देशाची संपत्ती असून या पिढीवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृती यासाठी परिपूर्ण असून दिडोंरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवामार्गात याच माध्यमातूनच संस्कार घडविले जातात, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर श्री गुरूपीठचे पिठाधिश्वर प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित प्रशासकीय नियोजन व ग्रामअभियान सक्षमीकरण मेळावा नंदनवन लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. मोरे बोलत होते. सेवामार्गातील 18 विभागातील कार्याबाबत यावेळी त्यांनी माहिती दिली.ते पुढे म्हणाले की, आज नव्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्मिक मार्ग अतिशय महत्वाचा असून यासाठी मूल्यशिक्षण विभाग अतिशय व्यापकदृष्ट्या कार्य करीत आहे. आजकाल मुलींचे विवाह करणे सोपे झाले असून मुलांचा प्रश्न अवघड झाला आहे. कोरोना काळात कमीत कमी लोकांमध्ये विवाह लावण्याची पध्दत यशस्वी झाली असून अल्प खर्चात विवाह कार्यक्रम करणे काळाची गरज बनली आहे. यामध्ये ऋणानुबंध महत्वाचे असून अवाजवी खर्च टाळून समाजात एक वेगळा संदेश देणे महत्वाचे आहे. यावर सेवामार्गातील विवाह संस्कार विभागाद्वारे त्र्यंबकेश्वर, दिंडोरी येथे प्रशिक्षण दिले जाते.कृषी क्षेत्राविषयी श्री. मोरे म्हणाले की, कृषी विभागाअंतर्गत महाराष्ट्रातील 1100 गावे दत्तक घेऊन पारंपारिक सेंद्रिय शेती, माती परिक्षण, पाणी परिक्षण आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. सेवामार्गाद्वारे 40 वर्षे कृषी मेळावे घेण्यात येत होते, परंतु आता कृषी महोत्सव भरविणे, थेट बांधावर पोहोचून शेतकर्यांना धोरणात्मक मार्गदर्शन करणे यावर भर देण्यात येत आहे. शेती क्षेत्रावर 55 लघूउद्योग आधारित असून त्यातील महत्वाचा दुग्ध व्यवसाय आहे. जनावरांची काळजी, गोठ्यांची रचना आदि विषयांमध्ये शेतकर्यांना माहिती देण्यात येत आहे.आरोग्य क्षेत्राविषयी श्री. मोरे म्हणाले की, कोरोना महामारीवर रामबाण उपाय स्वयंपाक घरातील मसाल्याचा डबा हाच असून हळद, मिरी, तुळशीपत्रे यात अतिशय प्रभावशाली आहेत. शेतीशास्त्रातून आरोग्य अबाधित राखणे अतिशय महत्वाचे असून सेंद्रिय उत्पादित शेतीमाल बाजारात आणणे, हाच यावर उपाय आहे. डेन्मार्क, स्वीडन येथून आयात झालेल्या जर्शी जनावरांमुळे शारिरीक व्याधींचे प्रमाण वाढत असून देशी गायींचे संवर्धन करून शेण, गोमूत्र, दूध, तूप, पंचगव्य आदिंचा वापर करणे गरजेचे आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश खेमनर यांनीे केले. सूत्रसंचालन गणेश पर्वत यांनी तर आभार डॉ. शुभांगी शेडाळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment