काँग्रेसच्या दणक्यानंतर तोफखाना पो. स्टे. चौक ते तारकपुर चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 26, 2023

काँग्रेसच्या दणक्यानंतर तोफखाना पो. स्टे. चौक ते तारकपुर चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात.

 काँग्रेसच्या दणक्यानंतर तोफखाना पो. स्टे. चौक ते तारकपुर चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात.

गुणवत्ता पडताळणी डीडी दाखल होण्यापूर्वीच काम उरकण्याचा घाट.


अहमदनगर :
झोपडी कॅन्टीन ते गंगा उद्यान चौकाच्या निकृष्ट कामाविरुद्ध काँग्रेसने आंदोलन केले होते. काँग्रेसच्या या दणक्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे. तोफखाना पोलीस स्टेशन चौक ते तारकपूर चौकापर्यंतचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. त्याचे देयक देखील अदा करण्यात आले होते. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाला या कामाच्या गुणवत्ता पडताळणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते वर्गणी करून पडताळणी खर्चाचा डीडी लवकरच देणार असल्याचे सांगितले होते. मात्र काँग्रेसचा डीडी मिळण्याच्या आधीच तोफखाना पोलीस स्टेशन चौकापासून ते तारकपूर चौका पर्यंतच्या रस्त्याचे राहिलेले कार्पेटचे काम उरकून घेण्याचा घाट घातला गेला असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 
दर्जेदार रस्ते व्हावेत, निकृष्ट काम करणारे भ्रष्टाचारी तुरुंगात जावेत यासाठी शहरात काँग्रेसने उभ्या केलेल्या जनआंदोलनाचे हे यश असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. आज सकाळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडिवाला, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे, युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ आदींनी या कामाची पाहणी केली. सुमारे रुपये दीड कोटींचे हे काम आहे. 
काळे म्हणाले की, ठेकेदार, मनपा अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी संगनमत करत या रस्त्याचे कार्पेटचे काम न करताच काम फायनल केले होते. मात्र सध्या शहरात काँग्रेसच्या वतीने रस्त्यांच्या निकृष्ट कामांचा भांडाफोड जोरदार सुरू आहे. प्रत्येक कामात ७० % भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे बाजारपेठेतील एका रस्त्याच्या निकृष्ट कामावर देखील काँग्रेसने या संदर्भात मध्यरात्री रस्त्यावर घोषवाक्य लिहीत आंदोलन केले होते. 
त्यानंतर गंगा उद्यान चौक ते झोपडी कॅन्टीन या रस्त्यासाठी सुद्धा काँग्रेसने आंदोलन करत गंगा उद्यान चौक ते तारकपूर या ज्या अर्ध्या भागाचे काम झाले आहे त्यासाठी गुणवत्ता पडताळणी करिता कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून डीडी मनपाला देण्याचे कळविले होते. त्या संदर्भात सोमवारी काँग्रेस शिष्टमंडळ मनपा आयुक्तांची भेट घेऊन डीडी सुपूर्द करणार होते. मात्र याची कुणकुण लागताच मनपा व ठेकेदाराने या कामाच्या कार्पेटच्या राहिलेल्या कामाला सुरुवात केली आहे. 
काळे म्हणाले की, आज आम्ही शहरात, राज्यात, देशात सत्तेत नाही. मात्र विरोधी पक्ष या नात्याने सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारावर अंकुश ठेवणे ही आमची जनतेच्या प्रती असणारी बांधिलकी आहे. आज काँग्रेस वगळता जवळपास सर्वच पक्षांचे लागेबंधे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर नेतृत्वाशी आहेत. मात्र काँग्रेसशी केवळ जनतेशी बांधिलकी असून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक आणि शहर विकास हेच आमचे ध्येय आहे.

No comments:

Post a Comment