अजित पवार भाजपासोबत जाणार? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 17, 2023

अजित पवार भाजपासोबत जाणार?

 अजित पवार भाजपासोबत जाणार?

सोशल मीडियातील चर्चेमुळे चर्चेला उधाण.


कर्जत :
राज्यात राजकारणात उलट सुलट घटनांना वेग आला असून या चर्चानी राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून त्याचा परिणाम तालुक्याच्या राजकारणावर काय होऊ शकतो याबाबत तालुक्यात जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा सरिपाटावरील सोंगट्या कधी कसा रंग बदलतील याचा नेम राहिलेला नाही. न्यायालयाचा निर्णय आला व 16 आमदार अपात्र झाले तर या प्रश्नाला उत्तर म्हणून सर्व जण कामाला लागले आहेत. भाजपाने आपला बी प्लॅन तयार ठेवत राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच गळाला लावले असून त्याचे बरोबर 35 ते 40 आमदार जाणार व अजित पवार मुख्यमंत्री होणार या बातमीने सर्वत्र खळबळ माजली आहे. अनेक बड्या प्रसिध्दी माध्यमातून यावर वार्तांकन होत असताना असे झाले तर आपल्या तालुक्याचे राजकारण कसे असेल यावर लोक उत्सुकतेने चर्चा करत आहेत.
कर्जत जामखेड मतदार संघात भाजपाचे गेली 25 वर्षाचे व माजी मंत्री प्रा राम शिंदे चे दहा वर्षाचे वर्चस्व उलथून टाकत राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी जोरदार धक्का देत विजय मिळवला, यानंतर दोन वर्ष अत्यंत शांत राहून प्रा राम शिंदे यांनी राजकारणाचा उलटफेर व त्याचे परिणाम याचा अनुभव घेतला व  लोकांना ही घेऊ दिला यानंतर  अडीच वर्ष होत असताना भाजपाने त्यांना विधान परिषदेत आमदार केले व याच वेळी राज्यात अविश्वसनीय राजकीय खेळ होऊन सरकार ही आले. आ. शिंदे पुन्हा जोमाने सक्रिय झाले, मधल्या काळात मतदार संघातील पक्षात बरीच पडझड झाली होती अनेक जण सोईच्या राजकारणासाठी पक्ष सोडून गेले होते व राहिलेल्या पैकी अनेकांनी गपपडी ची गोळी घेतली होती. यासर्वाचे अवलोकन आ. राम शिंदे यांनी केले होते. सत्ता येताच शिंदे अँक्टिव्ह मोड मध्ये आले शिल्लक कार्यकर्त्यामध्ये उत्साह आला व तालुक्यात सुरू झाला राजकीय संघर्ष, दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप, श्रेयवाद, पत्रकबाजी, सोशल मीडिया वॉर व बरेच काहीचा खेळ. सद्या या सर्व बाबी कडे जनता उघड्या डोळ्याने पाहत असताना राष्ट्रवादी व भाजपाचे ठराविक कार्यकर्ते जोमात असले तरी काँग्रेस शिवसेनेचे दोन्ही गट व मित्र पक्ष मात्र कोमात गेले आहेत काय हे चित्र पाहावयास मिळत आहे.
याकाळातच ग्राम पंचायत निवडणुकीतून भाजपने आपली ताकद जास्त असल्याचा दावा तर केलाच पण काँग्रेसच्या बड्या नेत्याला गळाला लावत पक्ष प्रवेश घडवून आणला. यामुळे पक्षाची ताकद वाढेल, कार्यकर्त्यांना बळ मिळेल, राष्ट्रवादी विरुद्ध अधिक सक्षमपणे लढता येईल असे भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले पण एक महिना होऊन ही अद्याप कर्जत मधील माजी जी. प. सदस्य प्रवीण घुले कुठेच व कोणत्याच आघाडीवर सक्रिय झाल्याचे दिसत नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये चलबिचल सुरू झाली असतानाच राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत राज्यात जर राष्ट्रवादीत एक गट भाजपाबरोबर गेला तर तालुक्याचे राजकारण कसे असेल असे प्रश्न अनेकांना पडू लागले असून अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत.
राज्यात राजकारण पुन्हा अनपेक्षित बदल झाला तर या 35-40 आमदारांमध्ये कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार असतील का या प्रश्नाचेच उत्तर अनेकांना सापडत नाही, पण पुढील वाटचालीचा विचार करता आ. रोहित पवार या गटात सामील असतील तर तालुक्याचे राजकीय चित्र कसे असेल व जर सहभागी झाले नाहीत उर्वरित आमदारांमध्ये राहिले तर त्याचे बरोबर कोण कोण असतील अजित पवार यांच्या बरोबर कोण कोण जातील या अत्यंत मजेशीर चर्चा झडत आहेत. कारण सध्या राष्ट्रवादीत हि सर्व आलबेल आहे असे नाही. मात्र आ. रोहित पवार यांचा थेट जन सामान्याशी असलेला संपर्क, नेत्याशीवाय झटणारी यंत्रणा, मतदार संघात राबविल्या गेलेल्या अनेक उपक्रमातून घराघरात दिलेला लाभ विकासाच्या दृष्टीने व्हिजन ठेऊन सुरू असलेल्या कामामुळे पक्षात तरी अनेक जण इच्छा असून ही
सद्या तरी काहीच उलटसुलट करू शकत नाहीत, मात्र राज्यात काही राजकीय उलथापालथी झाली तर या माध्यमातून अनेकांना आपली अडचण दूर करता येऊ शकते. त्यामुळे असे कोण कोण आहेत?  कोण कोठे जाऊ शकतात, यामुळे पुन्हा भाजपात कुणाची अडचण होऊ शकते, जर आ. रोहित पवार सत्तेत गेले तर एकाच वेळी सत्तेतील दोन आमदार मतदार संघाला मिळतील पण मग विधानसभेत हा मतदार संघ कोणाला मिळेल, असे अनेक प्रश्न उभे राहत असताना कार्यकर्त्यांच्या, तालुकास्तरीय समजल्या जाणार्‍या काही नेत्याच्या अडचणी वाढणार आहेत. आ. प्रा. राम शिंदे यांना मात्र अशा परिस्थितीत काही फरक पडेल असे वाटत नाही. दावे प्रतिदाव्याशिवाय मतदार संघात खूपच टोकाची भूमिका या दोन्ही आमदारांनी घेतल्याचे दिसत नाही, त्यामुळे यदा कदाचीत उद्याच्या काळात एकाच मंचावर मांडीला मांडी लावून बसत जोरदार भाषण बाजी करताना,व एकमेकांचे गोडवे गाताना जर आ. रोहित पवार व आ. राम शिंदे दिसले तर कोणाला ही आश्चर्य वाटायला नको. अशा प्रसंगी आज एकमेकांवर तुटून पडणारे काय करतील हे पाहण्याची लोकांना उत्सुकता आहे व यावर जोरदार भाष्य नागरिक करताना दिसत आहेत.
विद्यमान उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटेच्या शपथविधीच्या अनुभवातून यावेळी सर्व बाबी अत्यंत बारकाईने तपासून हाताळणार आहेत. या निर्णयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा निर्णय काय असेल हे पाहतानाच
महत्वकांक्षी असलेले आ. रोहित पवार यांची भूमिका राज्यस्तरीय राजकारणात, पक्षात अत्यंत महत्वाची ठरणार आहे यावर ही नागरिक विविध तर्क लावताना दिसत आहेत.
सद्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून मतदार संघावर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखविण्यासाठी दोन्ही आमदार मोठी ताकद लावणार आहेत या निवडणुकीत कोण कोणावर कशी टीका करतात व निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याचे राजकारण कसे व कोणते मोड घेणार या पार्श्वभूमीवर जनतेचे विशेष लक्ष सर्वावरच राहणार आहे.

No comments:

Post a Comment