मामाच्या मुलीची हत्या करणाऱ्या भाच्या बरोबर घडले असे काही.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 2, 2023

मामाच्या मुलीची हत्या करणाऱ्या भाच्या बरोबर घडले असे काही..

अल्पवयीन मुली बरोबरचे प्रेम संबंध मामाला सांगेल या भीतीने.

मामाच्या मुलीची हत्या करणार्‍या भाच्यास जन्मठेपेची शिक्षा.


नेवासा -
अल्पवयीन मुलीशी असलेले प्रेम संबंध मामास सांगेन या भीतीमुळे मामाच्या मुलीचीच हत्या करणार्‍या आप्पासाहेब नानासाहेब थोरात (आगरानांदूर ता पैठण जि औरंगाबाद) या भाच्यास नेवासा येथील विशेष न्यायालयाने जन्मठेप, सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी हा निकाल दिला.
मामाकडे शिक्षणासाठी असलेल्या युवकाने त्याचे अल्पवयीन मुलीशी असलेले प्रेमसंबंध त्याच्या मामाच्या मुलीने पाहिल्याने ती त्याबाबत मामाला सांगेल या भीतीने त्याने या मुलीचा खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी नेवासा तालुक्यातील गावात घडली होती. या प्रकरणी त्याच्यावर विनयभंग, हत्येसह बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, नेवासा तालुक्यातील एका गावात मामाकडे आरोपी अप्पासाहेब नानासाहेब थोरात (रा. आगारनांदूर ता. पैठण जि. औरंगाबाद) (त्यावेळचे वय 19) हा आयटीआयचे शिक्षण घेण्यासाठी आलेला होता. शिक्षण घेत असताना तो मामाच्या घरी रहात असताना तेथून जवळच राहणार्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रेमसंबंध प्रस्थापित करू पाहत होता. त्याने अल्पवयीन मुलीला बळजबरीने तिचे इच्छेविरुध्द प्रेमात पाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तिच्या घरामागे करताना मामाच्या लहान मुलीने बघितले. आरोपी घरी आल्यानंतर मामाच्या लहान मुलीने त्याला सांगितले की मी तुझे नाव वडीलांना म्हणजे आरोपीचे मामाला सांगेल. तेव्हा आरोपीचे तथाकथित प्रेमाबाबत मामाला समजले तर मामा रागवेल, कायमचे काढून देईल व त्याला अल्पवयीन पिडीत मुलीशी भेटता येणार नाही. म्हणून आरोपीने मामाच्या लहान मुलीचा कायमचा काटा काढून प्रेमातील अडसर दूर करण्याचे ठरविले.
दि. 20 जून 2020 रोजी रात्री आरोपीचा मामा, मामी, मामाचा मुलगा शेतात झोपण्यासाठी गेले. आरोपी अप्पासाहेब हा घरासमोर झोपला. मामाच्या दोन्ही मुली घरामध्ये अभ्यास करुन आतून दरवाज्याची कडी लावुन झोपल्या. रात्री बाराच्या सुमारास आरोपी अप्पासाहेब याने बाहेरुन हात घालुन आतून लावलेली कडी उघडून आत गेला. कडीचा आवाज ऐकून मामाची मोठी मुलगी जागी झाली. आरोपीने रग उचलून मामाच्या लहान मुलीच्या तोंडावर टाकला. मोठ्या मुलीला तो म्हणाला की, जर ओरडलीस कोणाला सांगितलेस तर तुलाही असच जिवे ठार मारील अशी धमकी दिली. आरोपीने मामाच्या लहान मुलीच्या छातीवर बसून दोन्ही हाताने रग तिचे तोंडावर जोरात दाबून धरुन तिचा श्वास बंद पाडून तिस ठास मारले. सकाळी मयताचे आई-वडील शेतातून आले. आरोपी अप्पासाहेब याने तिला सापबिप चावला असेल म्हणून ती उठत नसेल असे सांगितले. तेव्हा शेजारी पाजारी नातेवाईक जमा होउन त्यांनी मयतास ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे नेले. तेथील डॉक्टरांनी तिच्या मुत्यूवर संशय व्यक्त करुन तपासणीसाठी सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे पाठविले. तज्ञ डॉक्टरांनी प्रेताचे शवविच्छेदन करून मयतास कारण छातीवर कशाने तरी दाब टाकुन श्वासोच्छवास बंद पडुन मुत्यू असा अभिप्राय दिला. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी करुन आरोपी विरुध्द दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी नेवासा येथील विशेष न्यायालयासमोर झाली.
खटल्यात सरकार पक्षातर्फे महत्वाचे 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मयताची मोठी बहीण, तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयापुढे आलेले साक्षीपुरावे तसेच विशेष सरकारी वकील देवा काळे यांनी सरकार पक्षाच्या वतीने केलेला युक्तीवाद व सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालय यांचे सादर केलेले महत्वपूर्ण न्यायनिवाडे विशेष न्यायालयाने ग्राहय धरुन आरोपीस दोषी ठरविले. विशेष न्यायालयाने आरोपी अप्पासाहेब नानासाहेब थोरात यास भा.द.वि कलम 302 नुसार जन्मठेप तसेच 5 हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी तसेच बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम, कलम 7 नुसार तसेच भा.द.वि. कलम 354 नुसार 3 वर्ष सश्राम कारावास व 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 9 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. देवा काळे यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष हजारे, हवालदार राजू काळे, पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर, महिला पोलीस कान्स्टेबल ज्योती नवगिरे, हवालदार जयवंत तोडमल यांनी विशेष सहकार्य केले.

No comments:

Post a Comment