आमदार निलेश लंकेंचे आमरण उपोषण अखेर मागे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 10, 2022

आमदार निलेश लंकेंचे आमरण उपोषण अखेर मागे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन.. विरोधी पक्षनेते अजित पवारांची विनंती...

आमदार निलेश लंकेंचे आमरण उपोषण अखेर मागे. 


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर-पाथर्डी-शेवगाव रस्ता, नगर-राहुरी-कोपरगाव रस्ता, नगर-मिरजगाव ते चापडगाव टेंभुर्णी रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विनंतीनंतर चौथ्या दिवशी आमदार लंके यांनी उपोषण मागे घेतले. सामाजिक प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी उपोषणाला बसतात मात्र हे प्रश्न सुटले पाहिजे, देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रश्नांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून नगर जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही आमदार निलेश लंके यांना दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनंती केल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी चार दिवस सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले.

आज राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आमदार निलेश लंके यांची यावेळी भेट घेतली. उपोषणाच्या संदर्भातली सर्व माहिती त्यांनी लंके यांच्याकडून घेतली. यावेळी अजित पवार म्हणाले की, लोकप्रतिनिधी हे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्याच पद्धतीने नगर जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी आमदार लंके यांनी येथे उपोषण सुरू केले. या सर्व प्रश्नांच्या संदर्भातील विषय केंद्राच्या कडील असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आता फोनवरून मी स्वतः बोलणे केले असून आमदार लंके सुद्धा त्यांच्याशी बोलले आहेत.

नगर जिल्ह्यातील या तिन्ही रस्त्यांच्या संदर्भातली कामे तात्काळ मार्गी लागतील व निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन गडकरी यांनी दिले असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 2016 सालापासून या पाथर्डी रस्त्याचे काम झाले नाही, ज्या ठेकेदाराला हे काम दिले त्यांनी ते पूर्ण केले नाही. त्यानंतर दोन ठेकेदार या ठिकाणी नियुक्त केले पण त्यांनी अशाच पद्धतीने कामे केली आता देशमुख या ठेकेदाराला हे काम देण्यात आलेले आहे असे पवार यांनी सांगून त्यांचे काम मला माहित आहे असेही ते म्हणाले. या सर्व बाबीच्या संदर्भात नॅशनल हायवेचे अधिकारी व मंत्री गडकरी यांचे सुद्धा आता फोनवरून बोलणे झाले आहे. गडकरी यांनी आठ दिवसानंतर मी पुन्हा आढावा घेतो असे सांगितले आहे. मी सुद्धा या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. श्रीगोंदा येथील उड्डाणपुलाचे काम 28 फेब्रुवारी पर्यंत होईल अशी ग्वाही देण्यात आलेले आहे तसेच नगर पाथर्डी या महामार्गाचे काम 31 मार्च 2023 अखेरीला पूर्ण केले जाईल असे आश्वासन येथील अधिकार्‍यांनी लेखी स्वरूपामध्ये दिले आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. मी सुद्धा नॅशनल हायवेच्या राज्यातील कामांचा सातत्याने आढावा घेता.े यापुढे सुद्धा नगर जिल्ह्यातील या कामांचा आढावा घेतला जाईल व ही कामे कशा पद्धतीने मार्गी लागतील याचा सुद्धा पाठपुरावा करेल असेही ते म्हणाले.  तर नगर शिर्डी या महामार्गाचे काम सुद्धा पूर्णत्वाला जाणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे .फेब्रुवारी पर्यंत हे काम सुरू होईल ही कामे लगेच होणार नाहीत यासाठी वेळ लागणार आहे हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. कामे थांबणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता व लेखी आश्वासन दिल्यानंतर मी आमदार लंके यांना व त्यांच्या सहकार्‍यांना उपोषण थांबवण्याची विनंती केलेली आहे व त्यांनी त्याला मान्यता दिली असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले तसेच या रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने  होईल याचा सुद्धा पाठपुरावा केला जाईल असेही ते म्हणाले. येथील प्रशासनाला सुद्धा त्यांनी कामाच्या संदर्भामध्ये देखरेख करून कामे मार्गी लावावेत असा सूचनाही दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना आमदार निलेश लंके यांनी चार दिवसापासून तीन रस्त्यांच्या प्रश्नासाठी माझ्याबरोबर जे उपोषणाला बसले होते. मंत्री नितीन गडकरी यांनी ही कामे मार्गी लावले जातील असे मला आत्ता सांगितले आहे तसेच ते सुद्धा या कामाचा पाठपुरावा करून आढावा घेणार आहेत. राज्याचे विरोधी पक्ष नेते व आमचे नेते अजित पवार यांनी विनंती केल्याप्रमाणे आपण उपोषण थांबवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपोषणाच्या कालच्या दिवशी राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी लंके यांची भेट घेऊन या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली. सध्या जे काही दबावाचे राजकारण या ठिकाणी चालू आहे तो दबाव नसून एक प्रकारे दहशत आहे. जर यांना पालक होता येत नसेल तर काय उपयोग आता अशांना जाग आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना आगामी काळामध्ये एकत्र येऊन लढा द्यावा लागेल असेही ते यावेळी म्हणाले. प्रशासनाने कसे वागावे या संदर्भामध्ये काही नियमावली केलेली होती पण आता हे सर्व नियम एक प्रकारे यांनी धाब्यावर बसवले आहेत असेच म्हणावे लागेल प्रशासनाचा वापर जर सत्ताधारी अशा पद्धतीने करणार असतील तर त्यालाही आता उत्तर देण्याची वेळ आली आहे असा इशाराही थोरात यांनी यावेळी दिला.

काल रात्री उशिराने आमदार रोहित पवार यांनी निलेश लंके यांची भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याच वेळेला त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन प्रशासनाच्या संदर्भातील माहिती त्यांनी यावेळी घेतली या भेटीनंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी आमदार निलेश लंके यांची रात्री उशिराने भेट घेऊन त्यांना या रस्त्यांच्या कामाबाबतची सद्यस्थिती व माहिती दिली व या कामासंदर्भात मी निश्चितपणे लक्ष घालेल व ती कामे करून घेईल असे आश्वासन दिले मात्र लंके यांनी जोपर्यंत काम सुरू होणार नाही तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनश्याम शेलार, पंचायत समिती सभापती क्षितिज घुले, उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, शिवशंकर राजळे, आधी सह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.No comments:

Post a Comment