ध्वजदिन निधी संकलनासाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवावा ः जिल्हाधिकारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 21, 2022

ध्वजदिन निधी संकलनासाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवावा ः जिल्हाधिकारी

 सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ

ध्वजदिन निधी संकलनासाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवावा ः जिल्हाधिकारी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या समर्पणामुळेच देशाच्या सुरक्षितेबरोबरच अखंडता अबाधित आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवत येत्या 31 मार्चपर्यंत 5 कोटी रुपयांचे उद्दिष्टल पूर्ण करुन अहमदनगर जिल्हा संपुर्ण राज्यात निधी संकलनामध्ये अग्रेसर रहावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी  व्यक्त केली.
महासैनिक संकुल येथे आज सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा शुभारंभ डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कर्नल एस.सी. चिब्बर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पल्लवी निर्मळ, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, मोहन नातू आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करा
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, देशसीमेवर खडा पहारा देणार्‍या सैनिकांमुळे आपण सुरक्षित जीवन जगत असतो. लष्करातील जवान आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असतात.  
या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी ध्वजनिधी संकलनातून सर्वसामान्यांना उपलब्ध होत असते. जिल्ह्यात अनेक मोठ-मोठी देवस्थाने असुन त्यांच्याकडे असलेल्या निधीचा जनकल्याणासाठी उपयोग करण्यात येतो. या देवस्थानांबरोबरच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसह सर्वसामान्य नागरिकांनी या ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी यावेळी केले.
अधिकचा निधी वेळेआधी संकलित करण्यासाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवावा.
सैनिकांच्या कुटूंबियांचे शासकीय कामकाजासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात अमृत जवान अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले असल्याचे सांगत ध्वजदिन निधीचा विनियोग सैनिकांच्या कुटूंबियांच्या कल्याणासाठी व आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी करण्यात येतो. शासनाने जिल्ह्याला दिलेले ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करण्यात येतात.  परंतू  या उद्दिष्टापेक्षा अधिकच्या निधीचे संकलन दिलेल्या वेळेच्या आधी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.
विशेष पंधरवड्यातून सैनिकांचे प्रश्न निकाली काढा
जिल्ह्यात सैनिकांच्या कुटूंबियांचे अनेक प्रश्न प्रशासनाकडे प्रलंबित असतात. या प्रश्नांचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी प्रत्येक विभागाने सेवा पंधरवड्याप्रमाणे सैनिकांच्या कुटूंबियांसाठी विशेष पंधरवड्याचे आयोजन करुन त्यांच्या अडी-अडचणी तसेच प्रश्न निकाली काढावेत. त्याचबरोबर सैनिककल्याण विभागाने जनता दरबारच्या माध्यमातून सैनिकांच्या अडी-अडचणी दूर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे म्हणाले की, सैनिकांच्या त्याग, समर्पणामुळे आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित असून त्यांच्यामुळेच आपण शांतीपूर्ण जीवन जगत आहोत. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असुन या ध्वजदिन निधीस सर्वांनी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कर्नल श्री. चिब्बर म्हणाले, ध्वजदिन निधीस जिल्हा वासियांनी दिलेल्या मदतीमुळेच उद्दिष्टपूर्ती करणे शक्य झाले असुन यापुढेही प्रत्येकाने या निधीस यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पल्लवी निर्मळ म्हणाल्या, सन 2021 मध्ये शासनाने ध्वजदिन निधीचे 1 कोटी 84 लक्ष 98 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हाधिकार्‍यांनी या ध्वजदिन निधीस भरीव मदत करण्याच्या आवाहनास जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, विविध संस्थांनी भरभरुन प्रतिसाद दिला असुन या सर्वांच्या सहकार्यामुळे तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचे संकलन करण्यात यश प्राप्त झाले असल्याचे सांगत सशस्त्र सेना ध्वजदिनाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमात माजी सैनिक पाल्यांनी दहावी व बारावी परिक्षेत, विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा प्रशिस्तीपत्र व धनादेश देऊन तसेच सन 2021 मध्ये ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या शासकीय कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  यावेळी शहीद मित्रमंडळाचे अध्यक्ष मोहन नरहरी नातू यांच्यातर्फे शहीद जवानांच्या  कुटूंबाला 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्लवनाने करण्यात आली. यावेळी शहीद जवानांना उपस्थित मान्यवरांसह उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्धता बाळगून श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार अंकुश हांडे यांनी मानले. कार्यक्रमास वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, माजी सैनिक यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment