सीना नदी पुलाची उंची वाढवा.. अन्यथा आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 21, 2022

सीना नदी पुलाची उंची वाढवा.. अन्यथा आंदोलन.

 सीना नदी पुलाची उंची वाढवा.. अन्यथा आंदोलन.

शिवसेना नगरसेवक शाम नळकांडे यांचा इशारा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः परतीच्या पावसाने उडविलेल्या हाहाकाराने सीना नदीने रुद्र रूप धारण केले असून काल सायंकाळी सीना नदीच्या वेगाने वाहत असलेल्या पाण्यात विशाल देवतरसे  (वय 35 रा. कुंभार गल्ली) हा युवक वाहून गेला आहे. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून या युवकाचा शोध सुरू असून या प्रभागातील शिवसेना नगरसेवक शाम नळकांडे यांनी प्रशासनाला या पुलाची उंची त्वरित वाढवा नाही तर यासाठी मोठे आंदोलन उभारू असा इशारा दिला आहे. महापालिका आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, पोलीस, तसेच स्थानिक नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हा तरुण कल्याण रोडवरून नगरच्या दिशेने येत होता. परंतु दिवसभर पडलेल्या पावसाने सीना नदीला मोठा पूर आला. कल्याण रोडवरील अमरधामजवळील पूल पाण्याखाली गेल्याने सकाळपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद होती. दुपारी पाऊस थांबला, मात्र नदीला प्रचंड पाणी असल्याने दोन्ही बाजूचे प्रवासी पुलापर्यंत येऊन मागे फिरत होते. अशातच सायंकाळी सहाच्या दरम्यान विशाल देवतरसे हा तरुण पुलावरून चालत अमरधामच्या दिशेने येत असताना पुराच्या पाण्यांचा अंदाज न आल्याने तो पुलावरून जात असतानाच वाहून गेला.
मागील दोन दिवसांपासून नगर शहर व नगर तालुक्याच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. त्यामुळे काल सकाळपासून नगर कल्याण रोडवर पुलावरील वाहतूक बंद होती दरम्यान गुरुवारी सायंकाळी विशाल देवतरसे तरुण या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एक व्हिडिओ ही समोर आला असून पोलीस त्याची खात्री करीत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या नदीला पूर आल्याची ही पाचवी घटना आहे.
यावेळी नगरसेवक शाम नळकांडे यांनी पुलावर प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना पुराच्या पाण्यात उतरू नका असे आवाहन केले. यावेळी मीडियासमोर नळकांडे यांनी या पुलाची उंची त्वरित वाढवा अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला. महापौर रोहिणी ताई शेंडगे यांचे नेतृत्वाखाली एक शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी यांना सिना नदी पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात निवेदन देणार असल्याचे यावेळी नळकांडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment