विसर्जन मिरवणुकीला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 10, 2022

विसर्जन मिरवणुकीला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 विसर्जन मिरवणुकीला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. डीजेच्या दणदणात गणपती बाप्पांना निरोप.

शिंदे-ठाकरे गटात नंबर वरून वाद; पोलिसांच्या मध्यस्तीने टळला अनर्थ.




नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेली दोन वर्ष कोरोना काळातील निर्बंधामुळे गणेश उत्सव साजरा न करता आल्याने यावर्षी मात्र नगरकरांनी मोठ्या उत्साहाने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. डीजे च्या दणदणाटात गुलाल उधळत “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” च्या घोषात गणेश भक्तांनी बाप्पांकडे पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली. विसर्जन मिरवणुकीत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पोलीस यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली. श्री विशाल गणपतीची मिरवणूक संपल्यानंतर मानाच्या बारा मंडळांची मिरवणूक मात्र रेंगाळली होती. तर यावर्षी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर अस्तित्वात आलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये नंबर लावण्यावरून किरकोळ वादावादी ने मात्र विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र मिरवणुकीतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात झालेल्या कुरघोड्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
दरवर्षी निवडणूक मार्गावर 14 नंबर हा शहर शिवसेना या नावाने शिवसेना सहभाग घेत असते. मात्र यावर्षी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी याबाबत दावा केल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. तरीही दाळमंडई मध्ये 13 नंबरला अचानक शिंदे गटाचे मंडळ आल्याने याला शिवसेनेच्या काही नेत्यांनी विरोध केल्यानंतर जवळपास एक दीड तास डाळ मंडईतच दोन्ही मंडळ उभे करण्यात आले होते. अखेर उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेला शिंदे गटाच्या पुढे जाऊ दिल्यानंतर मिरवणुकीत सुरुवात झाली.
अहमदनगर शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे गणेश विसर्जन शुक्रवारी रात्री पार पडली दरवर्षीप्रमाणे अहमदनगर शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपती बरोबर सहाच्या ठोक्याला दिल्लीगेट वेशीच्या बाहेर पडला. विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची आरती करण्यात आली होती. दोन वर्षानंतर आलेल्या गणेश उत्सवाला या वर्षी मोठा उत्साह जाणवत होता.श्री विशाल गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अहमदनगर शहरासह आसपासच्या गावातील नागरिकांनी नगर शहरातील रस्त्यांवर गर्दी केल्याने दोन वर्षानंतर अहमदनगर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर महिला तरुण तरुणी आबालवृद्ध लहान मुले कुटुंबासह आल्याने मोठी गर्दी दिसून आली. मात्र कालची मिरवणूक अत्यंत रेंगाळलेल्या परिस्थितीत होती गणपती मंडळांमध्ये मोठमोठे अंतर असल्यामुळे मिरवणूक पाहायला आलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. मानाच्या गणपतीचा एक नंबरचा गणपती नवी पेठ मध्ये असताना दुसरा नंबर चा गणपती हा थेट अर्बन बँकेजवळ तर बाकीचे सर्व गणपती कापड बाजारातच रेंगाळले होते. अखेर बाराच्या ठोक्याला मिरवणूक थांबवण्यात आली. मात्र अनेक मंडळ हे कापड बाजाराच्या आसपासच असल्याने नेता सुभाष चौक ,नवी पेठ मध्ये थांबलेल्या नागरिकांना या मंडळांच्या मिरवणूक पाहायला मिळाल्या नाहीत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता मात्र एकाही मंडळाला पोलिसांनी पुढे नेण्याबाबत बळजबरी न केल्याने मिरवणूक मोठ्या प्रमाणात रेंगाळली होती.
सायंकाळी 4 वाजता रामचंद्र खुंट परिसरातून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. पहिले मानाचे 12 गणेश मंडळे झाल्यावर 13व्या क्रमांकावर शिवसेनेतील ठाकरे गटाला सहभागी करण्यात आले. तर शिंदे गटाला नवीन सहभाग म्हणून सर्वात शेवटी स्थान देण्यात आले होते. मिरवणूक आडते बाजार परिसरात येताच शिंदे गटाने आपला गणपती व डिजेचा ट्रॅक्टर 12 मानाच्या गणपतींनंतर घुसविला. त्यामुळे ठाकरे गटाच्या आधी शिंदे गटाचा डिजे दणदणाट करू लागला. त्यामुळे शिंदे गट व ठाकरे गटात वाद सुरू होणार तोच पोलिसांना दोन्ही गटांच्या मध्ये सुरक्षा कवच उभे करत वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. आडते बाजारातून ही मिरवणूक डाळ मंडईत दाखल झाली. मात्र त्याच वेळी शिवसेनेनेही आपला डाव टाकला. मानाच्या गणपतीतील शेवटची तीन गणेश मंडळेंपैकी दोन गणेश मंडळे ही शिवसेना नगरसेवकांची आहेत. यात समझोता गणेश मंडळ शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम व नगरसेविका सुरेखा कदम यांचे आहे. तर निलकमल गणेश मंडळ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे आहे. या मंडळांनी जागेवर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गटाच्या डिजे पुढे ठाकरे गटाची दोन मंडळे व मागे ठाकरे गटाचा डिजे अशी स्थिती निर्माण झाली. दोन तास ही गणेश मंडळे एकाच जागी उभी होती. अखेर शिंदे गटाने मागे जाण्याचा निर्णय घेतल्यावर समझोता व निलकमल गणेश मंडळे पुढे गेले आणि वादावर पडदा पडला.

No comments:

Post a Comment