सर्व समावेशक योगी प्राध्यापक खासेराव शितोळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

सर्व समावेशक योगी प्राध्यापक खासेराव शितोळे.

सर्व समावेशक योगी प्राध्यापक खासेराव शितोळे.


प्रा
ध्यापक खासेराव शितोळे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज.अहदनगर या आमच्या कॉलेजचे त्यावेळचे प्राचार्य. दिल्ली गेट पासून लाल टाकीपर्यंत जाताना मुलांच्या गर्दीत गजबजलेली एक भव्य वास्तू. माझ्या कॉलेजचा मला अगदी मनापासून अभिमान आहे, कारण ती संस्था आता जिल्हा किंवा राज्यापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण भारतातील एक अग्रमानांची संस्था आहे. मोठे मोठे नेते, विचारवंत, अभ्यासक ,उद्योजक इथेच घडले. चित्रपट सृष्टीला नवीन आयाम देणारे दिग्दर्शक सुद्धा इथलेच .आज कॉलेज बाहेरून जाताना उर अभिमानाने भरतो. इतक्या मोठ्या संस्थेत आपण शिकलो, याचा गर्व वाटतो. धर्माचा गर्व, जातीचा गर्व ,पक्षाचा गर्व बाळगण्यापेक्षा आपण आपल्या शाळेचा ,कॉलेजचा ,विद्यापीठाचा, गुरूंचा गर्व बाळगला तर आपल्या पुढचे सर्वच प्रश्न मिटतील. त्यांच्याकडून फक्त ज्ञानदानाचच कार्य होत असतं .अजून पर्यंत तरी फुटीचे ज्ञान शालेय पुस्तकातून दिले जात नाही.

या कॉलेज शेजारीच ’वैतागवाडी’ नामक एक मजूर वस्ती  आहे . मी तिथलाच. वैतागवाडीचं महात्म्य सांगतो .आमच्या घराच्या मागे लगेचच ख्रिश्चन समाज भूमी आहे, त्यामागे बोहरी समाजाची व बाजूला गवळी समाज ,मातंग समाज यांची स्मशानभूमी . डाव्या हाताला सिव्हिल हॉस्पिटल .समोरच्या बाजूला जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत आणि आमच्या उजव्या हाताला कॉलेज. वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही एकदम योग्य गुरूच्या ठिकाणी राहत होतो. कशालाच कुंपण नव्हतं. डाव्या हाताला जन्म होता उजव्या हाताला शिक्षण होतं . समोर जगण्यासाठी , पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणार्‍या शिक्षण सेवकांची वस्ती . मागे होते जीवनाचे अंतिम सत्य. जीवनाच्या प्रत्येकच अवस्थेच्या अंगा खांद्यावर खेळत आम्ही लहानाचे मोठे झालो. कॉलेजच्या इतक्या जवळ राहून सुद्धा त्यात ऍडमिशन घेण्याचे भाग्य प्रत्येकाच्या नशिबी नव्हत. कॉलेजमध्ये प्रवेश घेणारी माझी बहीण ती या गल्लीतली पहिली मुलगी. नंतर बर्‍याच वर्षांनी माझा नंबर लागला ,कारण मध्ये एक भाऊ होता .त्याच्यासाठी सुद्धा दहावीची भिंत भेदच राहिली. ऍडमिशन घेता येत नव्हतं म्हणून आम्ही कॉलेजचे नाही असं नव्हतं. शौचालयापासून दिवसभराच्या प्रत्येक गरजेसाठी आम्ही कॉलेजवरच अवलंबून होतो. कॉलेज परिसरामध्येच अगदी अलीकडच्या बाजूला शौचालय होतं. पुढे तुडुंब भरलेली पाण्याची विहीर. खेळायला उघडे वर्ग. क्रिकेटची बॅट तर शाळेच्या लाकडी बाकड्याची करावी लागे. बॉल विकत घेण्यासाठी स्मशानभूमीतला लोखंडी होली क्रॉस. तो तोडून नाव मिटवण्यासाठी जाळून गार करून भंगारवाल्याला विकावा लागायचा .इतक्या महागड्या बॅट  बॉलवर कोणीच खेळले नसेल .ते भाग्य आम्हालाच.

सांगायचा मुद्दा की कॉलेजला न जाता वर्गात न बसता आम्ही सर्वच त्या कॉलेजचे लहानपणापासून विद्यार्थी होतो .सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत. आमच्या काळात फक्त दोन प्राचार्य झाले असे मला आठवते त्यापैकी एक शितोळे सर .आम्ही आमच्या वडिलांपेक्षा त्यांना जास्त भीत होतो.

सरांचा दबदबाच तसा होता. माणूस एकदम शिस्तीचा.  सगळ्यांच्या अगोदर येऊन ऑफिसमध्ये बसणारा. साडेसात ची बेल वाजली की, ऑफिसच्या बाहेर येऊन संपूर्ण इमारतीला चक्कर मारणारा .एकटाच. उशिरा येण्याची हिम्मत  ना प्राध्यापकांची विद्यार्थ्यांची . विद्यार्थी संख्या हजारच्या वर शिक्षक संख्या ही कमी नाही.

वेळच्या अगोदर आवारात गप्पा मारत बसलेले सर्व एक मिनिटात आत. सरांचा टायमिंगच अफलातून होता.

अगोदर गजबजलेला ,क्षणात रिकामा. जो तो आपल्या वर्गात .सर एकटे चक्कर मारायचे. ते बाहेर पडल्यावर जी पळापळ उडायची ते पाहून जंगलात वाघ आल्यावर बाकी जनावरांची कशी पळापळ होते. ‘चिते की चाल बाज की नजर’ आम्ही कॉलेजलाच अनुभवली. सगळ्या कॉलेजला चक्कर मारून ते शेवटी गेटमध्ये दोन्ही कमरेवर हात ठेवून उभे राहायचे. त्यांची ही मुद्रा आम्ही रोजच पाहिली, तिची कॉपी पंढरपूर येथे आहे .आता आम्ही सगळे भाविक त्यांच्या दर्शनासाठी तिथेच जातो .

माझं कॉलेजला ऍडमिशन झालं. आमचा एकांकिका करणारा मित्रांचा एक ग्रुप होता .*गट* म्हणत नाही.  तो शब्द आता बदनाम झालाय. कुठलीशी आमची एकांकिका एका राज्यस्तरीय स्पर्धेत पहिली आली होती .आम्ही खूप आनंदी होतो. आपल्या मुळे,कॉलेजचे ही नाव झालं , असं आम्हाला वाटायचं .प्रत्येक दिव्याला वाटतंच  की सूर्याला प्रकाश आम्ही दिलाय .कॉलेजच्या चौकात, वाजत गाजत गुलाल उधळला व नंतर शिस्तीत शांतपणे सरांच्या केबिनला गेलो .सरांनी आम्हा सर्वांचे मन भरून कौतुक केले .आम्हा सगळ्यांची अस्थेवाईक पणे विचारपूस केली. त्यावेळी त्यांचा जो स्वर होता तो ऐकून मला वाटलं सर असे सुद्धा बोलतात ? नारळाच्या आतल्या थंडगार गोडव्याची चव आम्हाला त्यावेळी जाणवली. असा अनुभव आम्हाला रोजच प्रत्येकालाच यायला लागला .कोणा प्राध्यापकाची काही अडचण असो, सर हजर .स्वच्छता रक्षकाची घरची काही अडचण असो, सर हजर. प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारा माणूस त्यांच्यात होता. आम्हा विद्यार्थ्यांसाठी तर दिवस रात्र ऑफिसचे दरवाजे उघडे होते .फक्त तुमची अडचण खरी पाहिजे.

हळूहळू आमच्या लक्षात आलं की  आम्ही त्यांना जेवढे घाबरतो त्यापेक्षा जास्त त्यांचा आदर करत होतो. ते भीतीने आमच्या फक्त डोक्यातच नाही तर आदराने मनात सुद्धा होते. ‘प्रशासक असावा तर असा’  याला म्हणतात शंभर टक्के  सर्वसामान्य समावेशता. आनंदासाठी  सर्व सामावेशकता महत्त्वाची.सर समृद्ध आहातच ,उत्तम आरोग्य लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना. 

No comments:

Post a Comment