शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, August 14, 2022

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन.

 शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन.


मुंबई -
मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन उभे करणारे, तीनवेळा आमदार आणि मंत्री राहिलेले शिवसंग्राम या संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचे आज सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील भीषण अपघातात दुर्देवी निधन झाले.  हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला.  पुढे जाणार्‍या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.  अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही.  अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने बीड जिल्ह्यासह त्यांच्या शिवसंग्राम संघटना व पक्षाच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली होती. अपघात इतका भीषण होता, की त्यांची फोर्ड गाडी अक्षरशः चक्काचूर झाली होती.
अपघाताचे नेमके कारण कळत नसले तरी, मेटे हे गंभीर जखमी असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता व मोठ्या प्रमाणात रक्तास्त्रावदेखील झाला होता. माजी आमदार राहिलेले विनायक मेटे हे बीडवरून आज सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मुंबईला येत होते.  परंतु, पनवेलनजीकच्या पहिल्याच बोगद्यात अपघाताचा हा भीषण प्रसंग गुदरला. महामार्ग पोलिसांनी त्यांना तातडीने एमजीएममध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मेटे यांचा शिवसंग्राम हा पक्ष भाजपचा सहयोगी पक्ष होता. या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भावंडांनीही तातडीने संपर्क साधत माहिती घेतली. मेटे हे भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. 2014 मध्ये त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यापूर्वी ते शरद पवार यांच्यासोबत होते व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राहिले होते. मराठा समाजासाठी त्यांनी आपले सर्वोच्च योगदान दिले. मराठा आरक्षणासाठी ते व त्यांचा पक्ष आक्रमकपणे रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे हे त्यांच्या फोर्ड या गाडीने मुंबईकडे निघाले होते. मुंबईकडे दुसर्‍या लेनने जात असताना कार चालकांचा त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून पुढे जाणार्‍या अज्ञात वाहनाला ठोकर मारली.  यामुळे हा अपघात झाला आहे.  या अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाले.  त्यांना आयआरबी म्बुलन्सने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले.  यावेळी दवाखान्यात डॉ.धर्मांग यांनी मेटे यांना तपासून मयत घोषित केले.  मेटे यांचे बॉडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकले होते.  हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, पहाटे पाच वाजता त्यांचा अपघात झाला.  मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  मेंदूला मार लागल्याने जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला.  त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment