महाराष्ट्रात सत्ता कोणाची..?शिवसेना कोणाची..? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 25, 2022

महाराष्ट्रात सत्ता कोणाची..?शिवसेना कोणाची..?

 महाराष्ट्रात सत्ता कोणाची..? शिवसेना कोणाची..?

हाविकासआघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे, असे सुचवत शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी  ३५ पेक्षा अधिक आमदारांच्या संख्याबळावर बंड केले.  शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आणि शिवसेना पक्षावर शिंदे यांनी दावा केला आहे.या पेचप्रसंगात एक पाऊल मागे घेत बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन समोरासमोर चर्चा करावी असे सुचवत शिवसेना महाविकासआघाडी तून बाहेर पडण्यास तयार आहे असे आश्वासक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.या वक्तव्याने शिवसेना युटर्न घेणार का ? असा सवाल उपस्थित होतो. एन सी पी आणि काँग्रेस पासून शिवसेना बाजूला होत भाजपाशी युती करेल का ? तसे झाल्यास मुख्यमंत्रीपदाचा पेच कसा सोडवला जाईल? एकनाथ शिंदे यांचे यात काय स्थान असेल? असे जर तर चे अनेक प्रश्‍न सध्या अनुत्तरित आहेत.
नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी ही आजची की अडीच वर्षापासूनची ? नाराजी एवढ्या टोकाला जात पक्ष नेतृत्वालाच आव्हान देत भाजपचे समर्थन करण्यापर्यंत ठाकरे - शिंदे यांच्यात नेमके काय घडले ? त्यामुळे सेनेत एवढी मोठी फूट पडली.शिवसेना आता नेमकी कोणाची ? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.विधिमंडळ गटप्रमुख नियुक्ती, कायदेशीर बाजू,शिस्तभंगाची कारवाई असे सत्र सध्या सुरू झाल्याने शिवसेनेतला तणाव दूर होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.  महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाला पक्षातीलच नेते आव्हान देत बंड करण्याची ही काही पहिली वेळ नाही.काँग्रेस पासून सेने पर्यंत सर्वांना याचा अनुभव आहे.  
हे सगळे आता इथे मांडण्याचे कारण म्हणजे आज २५ जून.याच दिवशी ४७ वर्षांपूर्वी देशात आणीबाणी लागू झाली होती.त्यावेळची परिस्थिती आणि आजची स्थिती यात अनेक गोष्टीत साम्य दिसते.  
१९७७ साली आणीबाणीच्या विरोधात रान उठवत इंदिरा गांधींची सत्ता हस्तगत करण्यात जनता पक्षाला यश मिळाले.केंद्रातील सत्ता जाताच काँग्रेस पक्षातही इंदिरा गांधींना फारसे  समर्थन मिळाले नव्हते.इंदिरा गांधीना अटक, त्यांची चिकमंगळूरची निवडणूक रद्द, अशा अनेक घटना घडत असल्याने इंदिरा गांधींचे नामोनिशाण नष्ट करण्याचा तर हा प्रयत्न नाही ? अशी शंका उपस्थित करत  इंदिरा गांधींच्या मागे निष्ठावान कार्यकर्त्यांचे पाठबळ सुरु होते म्हणून २८ महिन्यात पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या, काॅंग्रेस पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडेच आले होते.आमदार, खासदारांची संख्या घटली तर सत्ता हातून जाते पण कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली तर सत्ता असो वा नसो ...पक्षावर पूर्ण नियंत्रण कार्यकर्त्यांच्या बळावरच मिळवता येते.आजच्या राजकारणात शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहेत? त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.आज महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडत आहे त्यातून सत्ता कोणाची? कोणत्या पक्षाबरोबर कोणत्या पक्षाची? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.सत्ताधारी पक्षात फूट पाडून सत्ता बदल....  राजकारणातले बदल हे काय राज्याला नवीन नाही.तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव दादांना बाजूला करत शरद पवारांनी तत्कालीन जनता पक्षाचा पाठिंबा घेत पुरोगामी लोकशाही दल म्हणजे पुलोदची राज्यात सत्ता स्थापन केली होती.जनता पक्षाचे १०५ च्या दरम्यान आमदार होते तर पवारांचे अवघे ३० च्या दरम्यान आमदार होते.पवार साहेब स्वत: मुख्यमंत्री झाले तर साहेबांचे २५-ते २६ मंत्री आणि त्यानंतर जनता पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं.असं काही एकनाथ शिंदेंच्या बंडातून  अपेक्षित दिसत नाही.वास्तविक गत विधान सभा निवडणूकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात शिवसेना,राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस - अपक्षांसह सत्तेवर आले . महाविकास आघाडीची ही सत्ता.म वि आ ची जुळवाजवळ करताना मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी प्रथम एकनाथ शिंदे यांचे नाव चर्चेले गेले.उद्धव ठाकरेंची  तिच इच्छा होती.पण पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास भाग पाडले आणि एकनाथराव कॅबिनेट मंत्री झाले.त्यावेळी त्यांना हिंदुत्व ,भाजपची आठवण होती का? माविआ मान्य नव्हती तर मंत्रीपद न घेता शिंदे स्वतः सत्तेबाहेर का गेले नाहीत? याचे कारण काय ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  
पंतप्रधान राजीव गांधी सत्तेवर असताना शहाबानो प्रकरणा संबंधित ठराव संसदेत चर्चेला आला. त्या वेळी राजीव गांधींनी काँग्रेस सदस्यांना व्हीप बजावला होता.अरिफ मोहम्मद खान या काँग्रेस सदस्याने पक्षादेश पाळून मतदान केले,पण त्यापूर्वी त्यांनी या ठरावाला जाहिर  विरोधच केला होता. तत्व आणि निष्ठा अशी असावी लागते ती एकनाथरावांकडे आहे का?
छगन भुजबळ, राज ठाकरे शिवसेनिकांना बरोबर घेऊन शिवसेने बाहेर पडले तर नारायण राणे, गणेश नाईक यांनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान देत शिवसेना संपवण्याची भाषा केली होती.पण पुढे काय झाले? उद्धव ठाकरे एकमताने कार्याध्यक्ष पदी निवडले गेले होते.पण याच मुद्द्यावर राज ठाकरे सेने बाहेर गेले.भुजबळ - राज यांचे बंड आणि इतर नेत्यांचे बंड यातही फरक असेल.पण ,तरीही शिवसैनिकांनी बंडखोरांच्या हाती शिवसेना दिली का?  आज देतील का ? असाही सवाल उपस्थित होतो.
गत काळातील पुलोद सरकारची सर्व सूत्रे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या हाती होती.पण, मूळ काॅंग्रेस पक्षापासून ते दुरावलेच होते.एकनाथ शिंदे साहेब आज तुम्ही सेनेची सत्ता घालवू शकता? पण  सेनेत तुमचे स्थान काय असेल ? पक्ष प्रमुख की मुख्यमंत्री ?  हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.पक्ष आमदार, खासदार यांच्या संख्याबळावर विधीमंडळात सत्तेपुरता असेलही पण सभागृहाबाहेर पक्षाच   अस्तित्व कार्यकर्त्यांच्या संख्याबळावर ठरते....ठाकरे - शिंदे यांच्या सत्तासंघर्षात अजून काय घडते ? ते कळायला अजून अवधी आहे.
-  राजेश सटाणकर , नगर

No comments:

Post a Comment