आ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 19, 2022

आ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील भ्रष्टाचार !

 आ. लंकेंनी कागदपत्रांसह उघड केला वनविभागातील  भ्रष्टाचार!

दोघा अधिकाऱ्यांकडील पदभार काढणार : आ. लंके विधानसभेत आवाज उठविणार


पारनेर -
जिल्हा स्तरीय बिगर आदीवासी योजनेअंतर्गत वनविभागामार्फत पारनेर तालुक्यात राबविण्यात आलेल्या मृद व जलसंधारणाच्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी प्रत्यक्ष कामावर जाऊन कागदपत्रांसह उघड केला. आ. लंके यांनी कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला आहे हे कागदपत्रांसह सिध्द करून दाखविल्यानंतर उपवनसंरक्षक स्वाती मानेही आवाक झाल्या. याप्रकरणी दोषी  असलेले सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे तसेच वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांच्याकडील पदभार तात्काळ काढून घेण्याचे त्यांनी मान्य केले. दरम्यान, या भ्रष्टाचाराप्रकरणी आपण विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे आ. लंके यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
वनविभागातील भ्रष्टाचारासंदर्भात आ. नीलेश लंके यांनी गेल्या आठवडयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते. डॉ. भोसले यांनी उपवनसंरक्षक स्वाती माने यांना आ. नीलेश लंके यांच्यासह प्रत्यक्ष कामावर जाऊन या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आ. नीलेश लंके यांच्यासह उपवनसंरक्षक स्वाती माने यांनी शनिवारी वाळवणे, रूईछत्रपती दरम्यानच्या कामांना भेटी देउन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेले  सहाय्यक उपवनसंरक्षक रमेश देवखिळे, वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांनी वेळकाढूपणाची उत्तरे देत सुरूवातीस दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाहणी करण्यात येत असताना सबंधित तक्रारीसंदर्भातील एकही दस्तऐवज देवखिळे तसेच प्रताप जगताप यांच्याकडे उपलब्ध नव्हता. कार्यालयाकडे मोबाईलवर ठराविक कागदपत्रे मागवा असे सांगण्यात आल्यानंतरही आज सुटी असल्यामुळे कार्यालय बंद असल्याचे उत्तरे ते देत होते. 
ही कामे प्रत्यक्ष केलेल्या मजुरांच्या नावांची यादी वनक्षेत्रपाल जगताप यांनी आ. लंके यांना सादर केली. तेथेच आ. लंके यांनी भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. या यादीमधील मजुर प्रत्यक्षात कामावर उपस्थित होते का अशी विचारणा आ. लंके यांनी केल्यानंतर महिला कर्मचारी वनरक्षक केंद्रे यांनी होय असे उत्तर दिले. या कर्मचाऱ्यांची मजुरी आदा करण्यासाठी तयार करण्यात आलेला 'लेखा रोखा' पाहण्यासाठी आ. लंके यांंनी मागितला असता तो देण्यास उपवनसंरक्षक माने, सहा. उपवनसंरक्षक देवखिळे, वनक्षेत्रपाल जगताप यांनी  अमर्थता दर्शविली. ठराविक रोखे मोबाईलवर मागवा असे सांगण्यात आल्यानंतर मागवितो असे सांगूनही जगताप यांनी ते मागविलेच नाहीत.
अखेर आ. लंके यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले लेखा रोखे अधिकाऱ्यांपुढे
सादर करताच सगळेच आवाक झाले. लेखा रोख्यांवर ज्यांना मजुरी आदा करण्यात आली आहे, त्यांची नावेच नव्हती. प्रत्यक्ष मजुर व लेखा रोख्यांवरील मजुरांची पतडताळणीच होऊ शकली नाही. त्यावर उपवनसंरक्षक माने, सहा. उपवनसंरक्षक  देवखिळे, वनक्षेत्रपाल जगताप निरूत्तर झाले. विशेष म्हणजे या कामांवर प्रत्यक्ष देखरेख करणारे वनपाल, वनरक्षक यांच्याही स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या, मात्र भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना दूर ठेवण्यात आले. 
यात दोषी असलेले देवखिळे तसेच जगताप यांचा पदभार तात्काळ काढून घेण्याच्या सुचना आ. लंके यांनी दिल्या. त्यास उपवनक्षेत्रपाल स्वाती माने यांनी मान्यता दिली. या भ्रष्टाचारासंदर्भात आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले. 

पूर्वीच्याच बंधाऱ्याचे दगड काढून नवा बंधारा ! 
  या पाहणीदरम्यान वनविभगामार्फत पूर्वी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे दगड काढून त्याच्यालगत दुसरा  बंधारा तयार करण्यात आल्याचेही उघड झाले. भ्रष्टाचाराच्या हेतूने शासनाचा पूर्वी खर्च झालेला असतानाही पहिला बंधाऱ्यालगत त्याचेच दगड वापरून दुसरा बंधारा तयार करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट झाले. दरम्यान, बंधाऱ्याचे काम १० मार्च रोजी पुर्ण झाले, त्याची बिले मात्र बोगस मजुरांच्या नावावर २८ फेब्रुवारी रोजी काढण्यात आल्याचे आ. लंके यांनी पुराव्यांसह दाखवून दिले. विशेष म्हणजे सबंधित मजुरांचे आधार कार्ड क्रमांकही बोगस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

देवखिळे यांची दहशत 
गेल्या तब्बल 16 वर्षांपासून रमेश देवखिळे हे नगर जिल्हयात कार्यरत आहेत. अधिकार्याच्या बदल्यांसदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला कायदा करण्यास भाग पाडले. त्यांच्याच नगर जिल्हयात देवखिळे हे वरीष्ठांची मर्जी संपादन करून १६ वर्षे ठाण मांडून आहेत. त्यांच्या मर्जीप्रमाणेच प्रत्येक अधिकारी तसेच कर्मचाऱ्याने काम केले पाहिजे. तसे न झाल्यास देवखिळे हे त्या अधिकाऱ्याची, कर्मचाऱ्याची बदली घडवून आणतात अशी माहीतीही यावेळी समजली. त्यांच्या या दहशतीमुळे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या मर्जीविरोधात काम करीत नाहीत. 

भाजपाच्या बडया नेत्याचे जगताप जावई 
पारनेरचा अतिरिक्त पदभार असलेले वनक्षेत्रपाल प्रताप जगताप हे भाजपाच्या बडया वजनदार नेत्याचे जावई आहेत. त्यामुळे आपल्याविरूध्दच्या तक्रारीवर काहीच होणार नाही, वरून एक फोन आला की आपली फाईल बंद होईल असे ते सांगत होते. आ. लंके यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्यानंतर मात्र हात जोडून ते पुढील कारवाई न करण्याबाबत गयावया करीत होते !

मंत्री, आमदारांविषयी आरेरावीची भाषा 
सहा. उपवनसंरक्षक रमेश देवखिळे हे जिल्हयातील मंत्री, आमदारांविषयी त्यांच्या अपरोक्ष आरेरावीची भाषा वापरत असल्याच्या तक्रारीही यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या. त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे आ. लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

ठेकेदारांकडून बिलाच्या ४० टक्के लाच ! 
वनविभागाची कामे घेतलेल्या ठेकेदारांनी एकूण बिलाच्या ४० टक्के लाच दिली तरच त्यांची बिले आदा केली जातात, अन्यथा ती रोखली जातात. सुरूवातीलाच ४० टक्के लाच देणाचा शब्द देणाऱ्या मजुरांनाच कामांचे वितरण केले. अशी लाच द्यावी लागलेल्या दोन ठेकेदारांच आमदार, अधिकारी यांच्या समक्ष पत्रकारांना ही माहिती दिली.

No comments:

Post a Comment