केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा- किरण काळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 2, 2022

केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा- किरण काळे.

 केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा- किरण काळे.

मराठी भाषा दिनानिमित्त जयंत येलुलकरांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सुमारे नऊ वर्षांपूर्वीच राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा लिखित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सात वर्षांपूर्वी साहित्य अकादमीने एकमताने मराठी भाषेला हा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारला अहवाल पाठविला आहे. मात्र अद्यापही केंद्राने या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. केंद्र सरकारने लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात काळे बोलत होते. यावेळी काळे म्हणाले की, आजवर तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया या भाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला हा दर्जा मिळाला पाहिजे. भाषा ही माणसाला माणसाच्या जवळ आणते. मराठीमध्ये दर्जेदार साहित्य, काव्य यांची निर्मिती आजवर झाली असून मानवी मनाला अभिव्यक्त होण्यासाठी संपूर्ण क्षमता असणारी भाषा म्हणून मराठी भाषेकडे पाहिले जाते.
जयंत येलुलकर यांची महाराष्ट्र शासनाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल यावेळी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने सत्कार प्रा.डॉ. चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना येलुलकर म्हणाले की, मराठी भाषेला अडीच हजारांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त आपण दरवर्षी मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करतो. इतर भाषांना जसा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तसा दर्जा मराठीला देखिल मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रा.डॉ. चंदनशिवे यावेळी म्हणाले की, काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून नाटक, संगीत, नृत्य, चित्रपट, साहित्य आदी क्षेत्रांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक क्षेत्रातील काम करणार्‍यांना यामुळे मोठा आधार शहरामध्ये मिळाला आहे.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे नवनियुक्त सदस्य जयंत येलुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, माजी विरोधी पक्ष नेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, जितेंद्र तोरणे, राहुल सप्रे आदींसह साहित्य, काव्य, अभिनय, नाट्य, दिग्दर्शन आदी क्षेत्रातील विविध मान्यवर काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे हरिश बारस्कर, अविनाश मुधोळ, प्रफुल्ल निमसे, अरुण घोलप, वैभव दळवी, प्रशांत शिंदे, स्नेहल भालेराव, गजानन गारुळे, अरुण वाघमोडे, निखिल वाघमोडे आदींसह सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. चंदनशिवे यांनी केले. आभार दिगंबर रोकडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment