..तर लोकप्रतिनिधींच्या दारासमोर डांबर ओतू! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 4, 2022

..तर लोकप्रतिनिधींच्या दारासमोर डांबर ओतू!

..तर लोकप्रतिनिधींच्या दारासमोर डांबर ओतू!

शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय.. राष्ट्रीय सुरक्षा दिनी जागरूक नागरिक मंचचं अनोखं आंदोलन.

यशवंत.. गुणवंत ठेकेदारांनी केलेले बिना डांबराचे रस्ते या पावसाळ्यात वाहून जाणार.

अहमदनगर मध्ये प्रेमदान चौक, पत्रकार चौक, दिल्ली गेट आणि सक्कर चौक, या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते, परंतु त्या ठिकाणी कुठल्या तरी मंत्र्याच्या भेटी व्यतिरिक्त इतर वेळेस ट्रॅफिक पोलीस चे दर्शन होतच नाही. नेहमीप्रमाणे पोलिस प्रशासनाकडून उत्तर दिले जाते की त्यांचेकडे अपुरं मनुष्यबळ आहे. ते खरेच आहे. परंतु जेव्हा दंड वसुली करायचे असते तेव्हा मात्र दहा दहा पोलीस हातात दंडुके घेऊन आयुर्वेद चौकांमध्ये उभे असलेले कसे काय दिसतात ? त्यावेळेस मनुष्यबळ कसे उपलब्ध होते? हे एक न उलगडणारे रहस्य आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही सर्वात मोठा जिल्हा असूनही या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पोलिस बळ तैनात केलेले आहे. याबाबत राज्याच्या गृहमंत्रींना नगर जिल्हा पोलिस बळाची तातडीने पुनर्बांधणी करावी अशी मागणी आजच्या सुरक्षा दिनानिमित्त करण्यात आली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील रस्त्यांची अवस्था प्रचंड दयनीय आहे. अवघ्या दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपलेला असतानाही अद्याप रस्ता दुरुस्तीचे काम सुरु नाहीये. कामाची वर्क ऑर्डर निघूनही एक महिना झाला आहे, तरीदेखील अजूनही काम सुरू नाही. म्हणजे ऐन पावसाळ्यात हे रस्त्याचे काम सुरू करणार आणि दुसर्‍या दिवशी पावसात आपल्या नेहमीच्या यशवंत गुणवंत डांबरट ठेकेदारांनी केलेले बिनडांबराचे रस्ते वाहून जाणार. हा  ऐतिहासिक नगरचा  ऐतिहासिक इतिहास मागच्या पानावरून पुढे चालू राहणार. हे रस्ते तातडीने सुरू करून जर मे महिन्याच्या आत पूर्ण नाही केले तर जागरूक नागरिक मंच तर्फे शहरातील लोकप्रतिनिधींच्या दारासमोर डांबर ओतून तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी दिला आहे.
रस्ते, वाहतूक आणि सुरक्षे बाबत नगर शहरापेक्षा उदासीन शहर जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांची मनोवृत्ती दोन्ही कारणीभूत असले तरी प्रशासनाकडून कुठलीही ठोस कार्यवाही व कठोर प्रयत्न करताना दिसून येत नसल्याच्या निषेधार्थ नगरच्या जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली गेट येथे राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त अनोखे आंदोलन करण्यात आले. वाहतुकीच्या नियंत्रणासाठी शहरातील एकही रस्त्यावर वहातुक पोलीस उभे नसतो. त्यामुळे आज दिव्यांग व्यक्तीच्या हस्ते ट्रॅफिक पोलीसाचे पूर्णाकृती चित्राचा बोर्ड दिल्लीगेट या गर्दीच्या चौकामध्ये लावला. त्यावर असे लिहिले होते की... आम्ही येथे कधीच नसतो, तरी तुम्ही स्वतःच  तुमची काळजी घ्या. या आंदोलना वेळी चित्रातील ट्रॅफिक पोलिसाच्या कपाळावर रक्ताचा टिळा लावून वाहतूक शाखेचा निषेध केला.
यावेळी बोलताना सुहास मुळे म्हणाले,  बेशिस्त व नियम न पळणार्‍या वाहतुकी मुळे मागील एकट्या जानेवारी महिन्यामध्ये नगर मध्ये 157 रस्ते अपघात झाले, त्यामध्ये 37 जणांना जीव गमवावा लागला आणि 77 जण गंभीर जखमी झाले ही आकडेवारी एखाद्या महायुद्धा पेक्षाही भयानक आहे. देशात सर्वत्र 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून पाळला जातो. वाहतुकी विषयी, रस्त्यावर आणि कामकाजाच्या ठिकाणी स्वतःची सुरक्षा नागरिकांनी कशी करावी? यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी खरे म्हणजे हा दिवस पाळण्यात येतो. मात्र रस्त्याची झालेली दुरावस्था, बेशिस्त वाहतूक व रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे कोठेही नागरिकांचा जीव सुरक्षित नाहीये. पूर्ण शहरात उघडलेल्या रस्त्यांमुळे सध्या नगर शहराची अवस्था नांगरलेल्या शेता प्रमाणे झाली आहे. नागरिकांनी स्वतःची सुरक्षा कशी करावी हा गहन प्रश्न तिसर्‍या महायुद्ध पेक्षाही अवघड झालेला आहे.  त्यात भरीस भर म्हणजे मायबाप सरकार फक्त दंड वसुली कायदे बनवण्यामध्ये धन्यता मानत आहे. अगदी नऊ महिन्याच्या बाळाला सुद्धा हेल्मेट घालण्याची सक्तीचा कायदा करून, बिनडोक तुघलकी कारभार कसा केला जातो? याचे उदाहरण घालून दिले आहे. आपले रस्ते म्हणजे नांगरलेलं शेत आणि त्यात उडत असलेला प्रचंड धुराळा या पार्श्वभूमीवर जर नगर शहरात नागरिकांनी जर खरच हेल्मेट घातले तर करोनामुळे जे मेले नाहीत, ते सुध्दा निश्चितच गुदमरून मरून पडतील, यात शंकाच नाही.
दिल्लीगेट येथे झालेल्या आंदोलनास जागरूक नागरिक मंचाचे सचिव कैलास दळवी, दत्ता गायकवाड, योगेश गणगले, बाळासाहेब कुलकर्णी, दत्तराम गायकवाड, अभय गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, जय मुनोत, प्रकाश शिंदे, कसबे सर, उल्लास ढोरे, प्रसाद कुकडे, छावा संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा सांगळे, स्वच्छता दुत शारदा होशिंग, श्यामा साठे, मयुरी मुळे, करुणा कुकडे आदी सदस्य सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment