ड्रीमसिटीचे पाणी कनेक्शन तोडा अन्यथा आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 30, 2022

ड्रीमसिटीचे पाणी कनेक्शन तोडा अन्यथा आंदोलन.

 ड्रीमसिटीचे पाणी कनेक्शन तोडा अन्यथा आंदोलन.

शिवसेना नगरसेवकांचा इशारा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर कल्याण रोड वरील ड्रीमसिटी या प्रकल्पाला फेज - 2 योजनेतून 1 इंचाचे कनेक्शन द्यावे असा ठराव असताना केडगाव ला जाणार्‍या जलवाहिनीतून पाणी कसे काय दिले? असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे व अमोल येवले यांनी मनपाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित करत येत्या आठ दिवसात ड्रीमसिटीला केडगाव जलवाहिनीतून दिले जाणारे कनेक्शन बंद करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
अहमदनगर महानगरपालिकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि. 29 मार्च 2022 रोजी संपन्न झाली. या सभेमध्ये केडगावचा पाणीप्रश्न चांगलाच गाजला. केडगावचे शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे व अमोल येवले यांनी केडगावचे हक्काचे पाणी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित करून केडगावला दिले जाणारे पाणी नगर-कल्याण रोडवरील ड्रिम सिटी या अपार्टमेंटला दिले गेल्याचे निदर्शनास आणून देत हा केडगावकरांवर अन्याय असल्याचे सांगितले.
हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर केडगावमधील भाजपचे नगरसेवकांनी चुप्पीचे धोरण स्वीकारल्याचे पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. केडगावला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बायपास रोडवरून जाते. या रोडवरच ड्रिम सिटी हा बांधकाम प्रकल्प असून, तेथे मोठ्या संख्येने कुटुंबे वास्तव्यास आहेत. केडगावला पाण्यापासून वंचित ठेवून या सर्वांची पाण्याची गरज भागविण्याचे काम केले जात आहे. केडगावचे हक्काचे पाणी दुसर्यांना देण्याचा अधिकार कोणी दिला. मनपाचे आजी-माजी अधिकारी व पदाधिकारी यांनी आर्थिक हित जोपासून हे पाणी देण्याचा प्रताप केल्याचे सर्वांना ज्ञात आहे.
सभेत केडगावच्या पाण्याचा प्रश्न शिवसेना नगरसेवक विजय पठारे यांनी उपस्थित केल्यानंतर अभियंता सातपुते म्हणाले की, ड्रिम सिटीला मीटरप्रमाणे 1 इंची जलवाहिनीद्वारे पाणी दिले जात आहे. यावर श्री. पठारे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ड्रिम सिटीला जर पालिकेने 1 इंची जलवाहिनीद्वारे पाणी दिले, तर केडगावकरांना पाणी कसे काय कमी पडत आहे. ड्रिम सिटीला पाणी देण्याअगोदर केडगावला पाणी कमी पडत नव्हते. मात्र, ड्रिम सिटीला पाणी देण्यास सुरुवात केली आणि केडगावला पाण्याची चणचण भासू लागली. पाणी कमी पडू लागले. वास्तविक, शिवसेना नगरसेवकांनी ड्रिम सिटीचा पाण्याबाबतचा ठराव पाहिला असता, फेज-2 योजनेतून 1 इंचाचे कनेक्शन द्यावे, असे असताना त्यांना केडगावला जाणार्या जलवाहिनीतून कसे काय पाणी दिले गेले. याबाबत मनपाने तातडीने दखल घेत केडगावचे पाणी पूर्ववत करावे, अशी मागणी करीत शिवसेना नगरसेवकांनी ड्रिम सिटीला दिल्या जाणार्या जलवाहिनीची पाहणी केली. येथे मनपा अधिकारी पाहणी करणार आहेत. मात्र, पठारे, येवले, कोतकर व नागरिकांनी केलेल्या पाहणीत ड्रिम सिटीला व्हॉल्व्ह बंद असताना केडगावच्या लाईनमधून 24 तास पाणी चालू असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. येत्या आठ दिवसांत ड्रिम सिटीला केडगाव जलवाहिनीतून दिले जाणारे कनेक्शन बंद करावे, अन्यथा नागरिकांसमवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, संग्राम कोतकर यांनी दिला आहे.
केडगावचे हक्काचे पाणी नगर-कल्याण रोडवरील ड्रिम सिटीला देण्यात आले असून, याबाबत मनपा सभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, संग्राम कोतकर व नागरिकांनी पाहणी केली. यावेळी केडगावला हक्काचे पाणी पूर्ववत न मिळाल्यास शिवसेना नागरिकांसमवेत तीव्र आंदोलन करील, असा इशारा देण्यात आला.

No comments:

Post a Comment