अनाथांची मातृदेवता हरपली.. सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

अनाथांची मातृदेवता हरपली.. सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

 अनाथांची मातृदेवता हरपली.. सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

अनाथांची माय, सिंधुताई यांना अखेरची सलामी !


पुणे :
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी 12 वाजता ठोसर पागेत दफनविधी करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात अखेरची सलामी देण्यात आली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
सिंधुताई महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने त्यांचं पार्थिव दफन करण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव अत्यंदर्शनासाठी सन्मती बाल निकेतन संस्था इथे ठेवण्यात आले होते.
ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंच्या निधनाने अनेकजण पोरके झाले. संपूर्ण महाराष्ट्राने सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण इ. नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे समाजसेवेतील योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी त्या सदैव स्मरणात राहतील. अनेक अनाथ मुलांच्या त्या आधार बनल्या. त्यांना सन्मार्ग दाखवला. त्यांचे आयुष्य घडवले. उपेक्षित समाजासाठीही त्यांनी भरीव असे काम केले. त्यांच्या निधनाने मला व्यक्तीश: अतीव दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तो फोटोही पंतप्रधानांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.
प्रत्येकला ’बाळा’ म्हणून हाक मारणार्‍या सिंधुताई अनेकांची माय होत्या. जन्म न देता त्यांनी अनेक अनाथ बालकांना त्यांनी आईची माया दिली. म्हणून त्या सगळ्यांच्या माई” होत्या. माईंना अखेरच्या क्षणी कोणाची काळजी होती. तर ती म्हणजे आपल्या पिल्लांची. ’माझी मुले कशी आहेत. माझ्या मुलांची काळजी घ्या,’हे होते सिंधुताई सपकाळ यांचे अखेरचे शब्द. शेवटच्या क्षणी देखील मुलांचीच काळजी सिंधुताई सपकाळ यांना होती.
त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. गेल्यावर्षी सिंधूताईंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी सिंधूताईंनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांच्या आयुष्यातील माईचा प्रपंच कसा सुरु झाला याची कहाणी सांगितली होती. सिंधूताईंनी सांगितलं की, ‘पोटात असलेली भूक ही माझी प्रेरणा होती. कधी भूक इतकी अनावर व्हायची की रस्त्यावरील दगड चावून खावेसे वाटायचे’ माझ्याप्रमाणेच अवतीभवती बरीच लोकं भूकेने व्याकूळ असलेलं लक्षात आलं. यानंतर मी त्यांना माझ्यातला घासातला घास दिला आणि त्याचं क्षणी माईचा प्रपंच सुरू झाला. यामधून मी हजारो अनाथांची माय झाले, असंही सिंधूताई पुढे म्हणाल्या होत्या.
सिंधुताई यांना प्रकृती ठीक नसल्याने 24 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 25 डिसेंबरला शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कमी अधिक सुधारणा होत होती. त्यांनतर गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, काल रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment