शहर स्वच्छतेसाठी देशातील पहिल्या 10 मध्ये फाईव्हस्टार मानांकन मिळवू - महापौर शेंडगे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 15, 2022

शहर स्वच्छतेसाठी देशातील पहिल्या 10 मध्ये फाईव्हस्टार मानांकन मिळवू - महापौर शेंडगे.

 शहर स्वच्छतेसाठी देशातील पहिल्या 10 मध्ये फाईव्हस्टार मानांकन मिळवू - महापौर शेंडगे.

हॉटेल, हॉस्पिटल, शाळा, शासकीय कार्यालय स्वच्छता स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान, अहमदनगर शहरात राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे नगर शहरात स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग दैनंदिनपणे वाढविण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नगर शहरातील हॉटेल , शाळा, हॉस्पीटल ,शासकीय कार्यालय यांची स्पर्धा घेण्यात आली.तसेच शालेय विद्यार्थ्यांचीही स्पर्धा घेण्यात आली आहे.   मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नगर शहराचा देशात 22 वा व राज्यात 5 वा क्रमांक आलेला आहे. हे सर्व श्रेय नागरिक व कर्मचा-यांचे विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे, स्वच्छता दूत, शाळा , महाविद्यालय आदीचा समावेश असून त्यामुळे देशामध्ये नगर शहराचे नांव उंचावले आहे. यावर्षी पहिल्या 10 क्रमांकामध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू असून नागरिकांच्या सहभागानेच हे सर्व शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन सहभाग दयावा व आपले शहर स्वच्छ व हरित करण्यासाठी कटिबध्द राहू या तसेच नगर शहरातील नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. हात वारंवार स्वच्छ धुवावेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी केले.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियान 2.0 नगर मध्ये राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये स्वच्छते बाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यातील स्वच्छ हॉटेल, हॉस्पीटल,शाळा, शासकीय कार्यालय या विभागातील स्वच्छतेबाबतची स्पर्धा संपन्न झाली असून त्याचा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे बोलत होत्या. यावेळी शहरातील नागरिकांनी दैनंदिन स्वच्छतेकरिता सक्रीय सहभाग दयावा. आणि यावेळी शहराला फाईव्ह स्टार मानांकन आणि देशामध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मा.महापौर सौ.राहिणीताई शेंडगे यांनी सांगितले.
नगरमध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत हॉटेल विभागात प्रथम क्रमांक राज पॅलेस, द्वितीय क्रमांक हॉटेल आयरिश, तृतीय क्रमांक हॉटेल संकेत. हॉस्पीटल विभागात प्रथम क्रमांक साईदिप हॉस्पीटल, द्वितीय क्रमांक सुरभि हॉस्पीटल, तृतीय क्रमांक आनंदऋषीजी हॉस्पीटल. शाळा विभागात प्रथम क्रमांक सेंट विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, द्वितीय क्रमांक रेशिडेन्शिल हायस्कूल,  तृतीय क्रमांक भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल.शासकीय कार्यालय विभागात प्रथम क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालय , द्वितीय क्रमांक जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, तृतीय क्रमांक सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पारितोषिक मिळविले असून मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती मा.सौ.पुष्पाताई बोरूडे, उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांच्या शुभहस्ते डॉ.सौ.ज्योती दिपक, डॉ.सौ.पायल धूत, श्री.दामूशेठ बठेजा, श्री.संजय दायमा, प्रा.गिता तांबे, श्रीमती गोदावरी किर्तने, श्री.अशोक दोडके आदी विजेत्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट सफाई कर्मचारी म्हणून 34 कर्मचा-यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आले.
यावेळी उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले यांनी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत नगर शहरात पाच हजार झाडे लावण्यात येणार असून शहर हरित करण्यासाठी लोकसहभाग वाढविणार तसेच स्वच्छता राखण्यासाठी पालिकेच्या कर्मचा-यांसमवेत नागरिकांनीही सहभाग घ्यावा असे आवाहन केले. यावेळी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती मा.सौ.पुष्पाताई बोरूडे म्हणाल्या की, हॉस्पीटल, शाळा, हॉटेल आणि शासकीय कार्यालय यामध्ये नागरिकांची वर्दळ मोठया प्रमाणात असते. त्यामुळे हा सर्व परिसर सदैव स्वच्छ ठेवावा. यावेळी घनकचरा विभाग प्रमुख श्री.शंकर शेडाळे, स्वच्छ सर्वेक्षण कक्ष प्रमुख श्री.परिक्षीत.बिडकर, स्वच्छता दूत श्री.सुरेश खामकर, श्री.राजेश लयचेट्टी, श्री.किशोर कानडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.अमोल बागुल यांनी केले.

No comments:

Post a Comment