अमित शहांच्या उपस्थितीत उद्या प्रवरानगरला सहकार परिषद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 17, 2021

अमित शहांच्या उपस्थितीत उद्या प्रवरानगरला सहकार परिषद.

 अमित शहांच्या उपस्थितीत उद्या प्रवरानगरला सहकार परिषद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशाचे गृहमंत्री व पहिलेच सहकार मंत्री उद्या नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून सकाळी 11 वाजता प्रवरानगर येथे होणार्‍या सहकार परिषदेत काय बोलणार या बद्दल राज्यातील महाविकास आघाडी सरकारचंही लक्ष लागलं आहे. या कार्यक्रमास साधारण 20 हजार लोक उपस्थित राहतील असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्या वतीने भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळ अहमदनगर येथूनच सुरु झाली. देशाचे सहकारमंत्री पद स्वीकारल्यानंतर अमित शाह हे पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे सहाजिकच शाह यांच्या दौर्‍याला राजकीय आणि सहकार क्षेत्रातूनही महत्त्व प्राप्त झाले आहे.
सहकारमंत्री या नात्याने अमित शाह कोणती मोठी घोषणा करणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण केंद्र सरकारने पाठीमागील काही दिवसांपासून संबंध देशभरातील सहकार क्षेत्राबाबत विशिष्ट धोरणे आखून तशी अंमलबजावणी सुरु केली आहे. प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका यांच्या बाबतीत केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. त्यामुळे केंद्रीय सहकार मंत्रालयावर सुरुवातीला अनेक शंका घेतल्या गेल्या. तसेच, टीकाही झाली. महाराष्ट्रातूनही या शंका उपस्थित झाल्या, टीकाही झाली. यावर अमित शाह काही उत्तर देतात की भाष्य करतात याबाबतही उत्सुकता आहे. दरम्यान, या कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अध्यक्ष म्हणून उपस्थिती दर्शवणार आहेत. तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, साखरसंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्यासह सहकारी चळवळीमध्ये काम करणारी मंडळीही उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment