हिवाळी अधिवेशनात वाढला कोरोना संसर्ग.. कोरोनाचे लोण आमदारांमध्ये पसरणार? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 30, 2021

हिवाळी अधिवेशनात वाढला कोरोना संसर्ग.. कोरोनाचे लोण आमदारांमध्ये पसरणार?

 हिवाळी अधिवेशनात वाढला कोरोना संसर्ग.. कोरोनाचे लोण आमदारांमध्ये पसरणार?

आ. विखे पाटील, राज्यमंत्री तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात 53 अधिकारी व काही आमदार कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनाला उपस्थित असणार्‍या आमदारांना मास्क लावण्याचे आवाहन करूनही आमदारांनी मास्क लावणे बाबत उदासीनता दाखवली. या अधिवेशनास उपस्थित असणार्‍या नगर जिल्ह्यातील भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आज कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले असल्यामुळे आता आणखी काही आमदार, मंत्री येत्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर त्याबाबत आश्चर्य वाटणार नाही.
माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. प्राजक्त तनपुरे यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून जाहीर केली आहे. मंत्री तनपुरे यांनी म्हटले आहे की, आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत, अशी विनंतीही त्यांनी केलेली आहे. नुकत्याच 28 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यादेखील अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे कोरोनाचे हे लोण आता आमदारांमध्ये पसरते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे. कालच 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पती सदानंद सुळे व त्यांची दोन्ही मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. सुप्रिया सुळे यांनीही ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. आपली व कुटुंबियांची प्रकृती स्थिर असून संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मुंबईसह राज्यात वेगाने पसरणार्‍या कोरोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज केले. ते म्हणाले, ’सुप्रियाच्या तर सगळ्या घराला कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही अनेक लोक मास्क न घालता फिरतायत. बाबांनो माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मी सभागृहात आल्यापासून ते घरी जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलतानाही काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहेत. आपणच नियम पाळणार नाही तर नियम सांगण्याचा अधिकार मला नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत बाहेर न करता, घरातच करा.

No comments:

Post a Comment