गुन्हे दाखल करण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 31, 2021

गुन्हे दाखल करण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर.

 गुन्हे दाखल करण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर.

यावर्षी जिल्ह्यात 12 हजार 252 गुन्हे दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्‍या 401 टोळ्या असून यातील 16 टोळ्यांना मोक्का लावला असून यावर्षी जिल्ह्यात 12 हजार 252 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात गुन्हे दाखल करणार्‍या जिल्ह्यामध्ये नगर जिल्हा पहिल्या क्रमांकाचा ठरला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
2021 चा वर्षातील पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती देताना पोलीस अधीक्षक म्हणाले की, नगर जिह्यात 12,252 गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय अदखलपात्र गुन्हे, चौकशी अर्ज व अन्य मिळून 40 हजारांवर आणखी गुन्हे आहेत. त्याचा निपटारा करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असून, 1 जानेवारी ते आजपर्यंत जिह्यांमध्ये 51 हजार 721 गुह्यांचा निपटारा करण्यात आला आहे. जिह्यामध्ये मागील वर्षी दरोडयाचे 55 गुन्हे दाखल होते, त्यातील 51 उघड झाले. मात्र, यावर्षी 56 गुन्हे दाखल होऊन सर्व गुन्हे उघड झाले आहेत. घरफोडीचे मागील वर्षी 569 गुन्हे होते व त्यापैकी 120 उघड झाले. यावर्षी घरफोडीचे 796 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 121 गुन्हे उघड झाले आहेत. चोरीचे मागील वर्षी 2128 गुह्यांपैकी 727 गुन्हे उघड झाले व यावर्षी 3092 गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी 702 गुन्हे उघड झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. दारूबंदीचे 3004 गुन्हे दाखल झाले असून, 3459 आरोपींचा यात समावेश आहे. यावर्षी 43 गावठी कट्टे सापडले असून, 67 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
या वर्षात अमलीपदार्थांच्या संदर्भामध्ये 15,299 किलो मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, 35 आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणासंदर्भात 15 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तर अफू प्रकरणाचा एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, 50 किलो मुद्देमाल जप्त केला आहे, असेही पाटील यांनी सांगितले. मोक्काअंतर्गत जिह्यामध्ये 16 प्रस्ताव तयार करण्यात आले असून, 14 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये आरोपींची संख्या 83 आहे. अजूनही दोन प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, त्यात 15 आरोपी असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. एमपीडीएअंतर्गत आठ प्रस्ताव तयार करण्यात आले असून, ते प्रलंबित आहेत. हद्दपारीच्या कारवाईमध्ये आरोपींची संख्या 164 आहे, असेही पाटील म्हणाले.
गुन्हे दाखल करण्यामध्ये नगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे. आम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यांमध्ये अर्ज स्वीकारणार नाही व थेट गुन्हे दाखल करणार, अशा प्रकारचे निर्देश दिलेले होते. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले. या अगोदर जिह्यात स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये मागील वर्षी 5206 अर्ज दाखल करण्यात आले होते. यावर्षी फक्त 706 अर्ज दाखल झाल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. आगामी काळामध्ये अर्ज दाखल होण्याचे प्रमाण कमी होईल, असे ते म्हणाले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शहर पोलीस उपअधीक्षक कातकडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment