भाजपचे बावनकुळे, खंडेलवाल विजयी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 14, 2021

भाजपचे बावनकुळे, खंडेलवाल विजयी.

 भाजपचे बावनकुळे, खंडेलवाल विजयी.

विधान परिषद निवडणूक आघाडीला धक्का.



मुंबई -
विधान परिषद निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल विजयी ठरले आहेत. बावनकुळे यांचा विजय ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. नागपूर तसंच अकोल्यात भाजप उमेदवारांचा विजय हा महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. नागपुरात काँग्रेसला आयत्यावेळी उमेदवार मागे घ्यावा लागला. अकोल्यात शिवसेनेच्या आमदाराचा पराभव झाला.
विधानपरिषदेच्या एकूण 6 जागांवर निवडणुका आयोगानं जाहीर केल्या होत्या. त्यातील मुंबईतल्या दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या चार जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या, तर अकोला-वाशिम बुलडाणा आणि नागपूरमध्ये मतदान झालं. अकोला-वाशिम-बुलडाण्यात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया विरूद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल असा सामना रंगला आहे, तर नागपुरात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंसमोर काँग्रेसचा उमेदवार होता. मात्र आयत्यावेळी समीकरण बदललं. नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाला पसंती दिली.  विधानसभा निवडणुकीवेळी मंत्री राहिलेल्या बावनकुळे यांना तिकीट नाकारल्याची बरीच चर्चा झाली होती. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना पक्षाने तिकीट दिलं. काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या गोंधळाचा फायदा उठवत बावनकुळे यांनी बाजी मारली. बावनकुळे यांना 362 मतं मिळाली. मंगेश देशमुख यांना 186 मतं मिळाली. छोटू भोयर यांना अवघं एक मत मिळालं. 5 मत अवैध ठरली.
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यामध्ये भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी झाले. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरी समर्थक आहेत. गोपिकिशन बाजोरिया गेली तीन टर्म आमदार होते. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी आणि पर्यायाने महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. खंडेलवाल यांना 443 तर बाजोरिया यांना 334 मतं मिळाली. 31 मतं बाद झाली. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर चित्र स्पष्ट झालं आहे.

No comments:

Post a Comment