जिल्ह्यात धावू लागली लालपरी. विलगीकरण अशक्य हे एसटी कामगारांनी ओळखलं. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 27, 2021

जिल्ह्यात धावू लागली लालपरी. विलगीकरण अशक्य हे एसटी कामगारांनी ओळखलं.

 जिल्ह्यात धावू लागली लालपरी.विलगीकरण अशक्य हे एसटी कामगारांनी ओळखलं.

तारकपूर आगारातून बसच्या फेर्‍या सुरू, आंदोलकांनी धरली परतीची वाट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एसटी कामगारांनी विलगीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 50 वा दिवस आहे. वार्षिक 1400 कोटींचा बोजा उचलण्याशिवाय विलगीकरण करणे राज्याला शक्य नसल्याचे ओळखून नगर जिल्ह्यातील बहुतांशी कामगार आता कामगार कामावर परतू लागले आहेत. तारकपूर आगारातून बसच्या फेर्‍या सुरू झाल्या आहेत. संप सुरू झाल्यापासून सुरू झालेली आर्थिक अडचण अधिक वाढल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी आता परतीची वाट धरली आहे.
गावोगावी लगीन घाई सुरू असताना जिल्ह्यातील बहुतांश भागात एसटी सेवा बंद होती.त्यामुळे लोकांची मोठी कोंडी होऊन बसली. त्यामुळे जो लग्नाची निमंत्रण पत्रिका द्यायला जातो, त्याला आमच्या प्रवासाची खासगी गाडीतून सोय करा तरच आम्हाला लग्नाला येता येईल, कारण सध्या एसटी बंद आहे, असे सांगितले जात होते. त्यामुळे यजमान मंडळींना वेगळा खर्च करावा लागला आहे. या सगळ्याचा एसटी कर्मचार्‍यांनी विचार करण्याची गरज आहे. एसटी महामंडळ तोट्यात असताना. कामगारांच्या संपाचा भार त्या यंत्रणेवर पडला आणि ती रोजगार देणारी व्यवस्था मोडून पडली, त्यात कामगारांचा होता तो रोजगार गेला. सरकारने संपकरी कर्मचार्‍यांना काढून नवी भरती सुरू केली, तर त्यांच्या हातातील रोजगार जाईल याचा विचार कर्मचार्‍यांनी केला असुन जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यात आता लालपरी धावू लागली आहे.
एसटी हे गावाखेड्यातील अतिशय सामान्य आणि गरीब माणसांचे वाहतुकीचे साधन आहे. सध्या जिल्ह्यातील भागामध्ये गावोगावची एसटी सेवा बंद असल्यामुळे लोकांचे अतोनात हाल झाले. रिक्षा सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही, तसेच जिथे आहेत, तेथील भाडे गोरगरीबांना परवडणारे नाही. त्यामुळे एकेकाळी गावखेड्यातील लोकांच्या मनात एसटीच्या वाहक आणि चालकाविषयी जी आपुलकी आणि आपलेपणा होता, तो आता कमी होत चालला आहे. गावाकडे सध्या लग्नसराई सुरू आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे अनेकांचे विवाह रखडले होते, इतकेच नव्हे तर ओमायक्रॉन विषाणूचा प्रभाव वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू होण्याची भीती आहे.
राज्यातील मराठी तरुणांना रोजगार देणारा एसटी हा राज्य सरकारचा एकमेव उपक्रम आहे. या उपक्रमात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. याचा मोबदला अप्रत्यक्ष फायद्यात सरकारला आणि प्रत्यक्ष फायद्यात प्रवाशांना होत असतो. या फायद्यातून अपेक्षित असे वेतन आपल्याला मिळाले पाहिजे, अशी रास्त मागणी तिथल्या कर्मचार्यांची आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या काही महामंडळांमध्ये एसटी महामंडळाचा समावेश होतो. आज कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हे महामंडळाचे अग्रस्थान आहे. हे आता एसटी कर्मचार्‍यांनी जाणून घेणं महत्वाचं आहे.
याशिवाय राज्य सरकारची मोठी मालमत्ता या महामंडळाकडे आहे. मालमत्तेचा मोबदला जर खासगीकरणातून व बीओटी तत्वावर घ्यायचा ठरवला तर महामंडळ फायद्यात येऊ शकतं. मात्र ते करायला इच्छा शक्ती असायला हवी. ती असती तर यासंदर्भात आजवरच्या सरकारांनी आणि महामंडळातील पदाधिकार्यांनी निर्णय घेतले असते. मात्र या दोन्हीकडील मंत्री, अधिकारी आणि पदाधिकार्यांनी अपेक्षित असे लक्ष दिले नाही. हे सातत्याने होत असल्याने अखेर कर्मचारी संपावर गेला. कर्मचार्यांचा संप हा न्यायाच्या मार्गात असेस्तोवर जनतेची त्याला सहानुभूती होती. परंतु हे कर्मचारी अडेलपणा करू लागल्याचं दिसताच जनतेची सहानुभूती लोप पावली आहे.
अशावेळी विलीनीकरण झाले तर त्याचा बोजा पुन्हा प्रवाशांवर टाकण्याशिवाय पर्याय नाही. आजच्या महागाईत इतका बोजा टाकून कोणीही लोकांचा रोष ओढवून घेणार नाही. एसटीप्रमाणे महत्वाच्या 18 महामंडळातील विलीनीकरण हाती घ्यावं लागेल. ते या परिस्थितीत आवाक्याबाहेरचं आहे.त्यामुळे जिल्ह्यातील एसटी कामगारांनी आंदोलनातुन माघार घेवून परतीची वाट धरली याबद्दल प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे

No comments:

Post a Comment