मोदी, फडणवीस यांचे नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य- खा. विखे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

मोदी, फडणवीस यांचे नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य- खा. विखे.

 मोदी, फडणवीस यांचे नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य- खा. विखे.

भाजपा सोडुन दुसरीकडे जाणार नाही...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्या तरुणांना काम करण्याची संधी मिळाली यातच आमचे भाग्य आहे. आम्हाला भाजप सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही. ज्या माणसांनी, ज्या पक्षांनी सिंचन क्षेत्रात घोटाळे करून राज्यातील शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आणली त्यांचे नेतृत्व मान्य करण्याइतका मी राजकारणात लाचार झालेलो नाही. दिवंगत मा.खा.बाळासाहेब विखे पाटील यांनी हेच तत्व सांभाळले होते आणि आम्हालाही तीच शिकवण दिली आहे.’ अशा शब्दांत खा. सुजय विखे यांनी आजोबांच्या स्वाभिमानी आठवणींना उजाळा दिला.
शेवगाव येथील एका रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचे वेळी बिनधास्त बोलण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या सुजय विखेंनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. डॉ. विखे यांनी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील खराब रस्त्यांच्या विषयावर भाष्य केले.
त्यावर भाष्य करताना डॉ. विखे आक्रमक झाले. विखे म्हणाले, ‘कोविड संसर्गामुळे केंद्र सरकारने बहुतांश निधी लसीकरण आणि अन्य उपाययोजनांच्या कामाकडे वळविला आहे. रस्त्यांच्या कामासाठी आता पैसाच नाही. त्यामुळे सध्या तरी टोल लावल्याशिवाय रस्त्यांची कामे होऊ शकणार नाहीत. अहमदनगर -शिर्डी रस्त्याचे काम सध्या ठप्प झाले. त्याला जबाबदार ठेकादार आहे. त्यांच्याविरूद्ध तक्रारी केल्या मात्र उपयोग होत नाही. खासदार म्हणून मी आणखी काय करू शकतो? काम सुरू झाले तर तेथे उभा राहून ते करून घेऊ शकतो. मात्र, तो ठेकेदार जर यायलाच तयार नसेल तर कसे करायचे. मी खासदार म्हणून पाठपुरावा करून थकलो आहे. आता तुम्हीच सांगा, त्याचे काय करायचे? धरून मारायचे का? की गुन्हा दाखल करायचा? काय करायचे ते आता तुम्हीच सांगा. त्यासाठी मी सोशल मीडियात मोहीम सुरू करणार आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना विखे पुढे म्हणाले की, सध्या राज्यातील राजकारण अस्थिर आहे. कोण कोणाला पळवतय, कोण कोणाबरोबर जातय, हे काहीच कळायला मार्ग नाही. आपल्याला मात्र भाजप सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही. विषय फक्त कोणाला सोबत घ्यायचा हा आहे. ज्या माणसांनी, ज्या पक्षांनी सिंचन क्षेत्रात घोटाळे करून राज्यातील शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आणली त्यांचे नेतृत्व मान्य करण्याइतका मी राजकारणात लाचार झालेलो नाही. स्वंतत्र निघेन परंतु दुसर्‍या कोणा चुकीच्या माणसाच्या पाया पडायचं पाप करणार नाही. असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपाच्या आ. मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले याही उपस्थित होत्या. यावेळी विखे यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर घुलेंसमोरच जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांचा मोर्चा वळ्ला तो राज्याच्या राजकारणाकडे.. सध्याच्या राजकीय अस्थिर परिस्थितीकडे आणि भविष्यातील परिस्थितीत काय होईल, हे सांगता येत नसल्याकडे लक्ष वेधतानाच अशा परिस्थितीत आपलीही भूमिका ठरवावी लागेल, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment