ऐन सणासुदीच्या काळात घरातली बत्ती होणार गुल? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

ऐन सणासुदीच्या काळात घरातली बत्ती होणार गुल?

 ऐन सणासुदीच्या काळात घरातली बत्ती होणार गुल?

कोळसासाठा कमी झाल्याने ऊर्जा निर्मितीवर परिणाम...

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वात आघाडीचे राज्य आहे. देशात निर्माण होणार्‍या एकूण विजेच्या 15 टक्के निर्मिती महाराष्ट्रात होते.परंतु तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने गेली काही वर्षे महाराष्ट्रातील जनतेला वीजटंचाईचा सामना करावा लागला आहे व आता कोळशाच्या अनुपलब्धतेमुळे सणासुदीच्या काळात वीज टंचाई निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात वीजनिर्मिती ही वेगवेगळ्या मार्गाने केली जाते त्यात प्रामुख्याने ऊर्जानिर्मितीसाठी दगडी कोळसा खनिज तेल व नैसर्गिक वायू जलविद्युत याचा वापर केला जातो वीजनिर्मिती करता वापरली जातात हे टर्बाइन्स फिरवण्यास करिता ज्या ऊर्जेचा वापर केला जातो त्यानुसार औष्णिक विद्युत जलविद्युत अनुविद्युत नैसर्गिक वायू विद्युत असे प्रकार पडतात. या प्रकल्पांखेरीज टाटा पॉवर ही कंपनी जलविद्युत प्रकल्पाद्वारे स्वतंत्र वीजनिर्मिती करत आहे ज्याचा पुरवठा मुंबईला होतो. तसेच पवनउर्जेपासुन व इतर अपारंपारिक स्त्रोतांनी उर्जा तयार होते. सद्य स्थितीत महाराष्ट्रात साधारणपणे 3 ते 4 हजार मेगावॅट इतके उर्जा उत्पादन कमी पडत आहे. याचे व्यवस्थापन होण्यासाठी महाराष्ट्रात सद्यस्थितीत बहुतेक सर्व जिल्ह्यात भारनियमन(लोडशेडींग) केले जात आहे. एन.टी.पी.सी कडून महाराष्ट्राला राष्ट्रीय कोट्यातून उर्जा मिळते आहे. पण ऐन सणासुदीच्या काळात वीज टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
देशातील प्रमुख औष्णिक उर्जा प्रकल्पांमध्ये सध्या काही दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प होऊन देशाच्या काही भागात वीज गायब होण्याची भीती निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यापासूनच एक भीती उर्जा क्षेत्रात व्यक्त होतेय की, देशात कोळशाचा साठा कमी आहे. आणि त्याचा परिणाम ऊर्जा निर्मितीवर होऊन जिल्ह्यात दसरा, दिवाळी या सणांच्या काळात आपल्या घरातील बत्ती गुल होण्याची शक्यता आहे.
आता तर सरकारी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांकडे फक्त चारच दिवस पुरले इतका कोळसा असल्याचं बोललं जातंय. देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इतकी वर्षं झाली तरी आपण वीज आणि इंधन म्हणून अजूनही कोळशावरच का अवलंबून आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे कोळसा नाही म्हणून ऐन दिवाळीच्या तोंडावर खऱंच आपल्या घरातली बत्ती गुल होणार का? याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे.
भारत हा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा कोळसा उत्पादक देश आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या देशात वीजेची जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त उर्जा निर्मितीची क्षमता आपण बाळगून आहोत. कोळसा मंत्रालयाच्या वेबसाईटवर आणि इतरही अनेक ठिकाणी सरकारकडून या गोष्टीचा अभिमानाने उल्लेख होतो. पण प्रत्यक्षात आपल्यावर कोळशा अभावी वीज निर्मितीच ठप्प पडण्याची वेळ आली आहे.
देशातली 52.4% वीजेची गरज कोळशावर आधारित प्रकल्प भागवतात. असं असताना देशातल्या 72 औष्णिक उर्जा प्रकल्पांमध्ये जवळजवळ काहीच साठा उरलेला नाही. तर 50 प्रकल्पांमध्ये जेमतेम 4 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे आणि 13 प्रकल्पांमध्ये 10 दिवस पुरेल इतकाच साठा आहे. या सगळ्या प्रकल्पांमध्ये मिळून वीज निर्मितीची क्षमता 380 गिगावॅट इतकी आहे. ही आकडेवारी 4 ऑक्टोबर 2021ची आहे. वीज निर्मिती थांबली तर नवरात्री आणि दिवाळी सारखे सण तोंडावर आलेले असताना काही भागात ब्लॅकआऊटही होऊ शकतो किंवा निदान लोडशेडिंगची वेळ तरी येऊ शकते.
सध्या कोळशाचा तुटवडा जाणवण्यामागे तीन महत्त्वाची कारणं आहेत. एप्रिल-मेमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ठप्प झालेले उद्योग पुन्हा सुरू होतायत आणि विजेची देशांतर्गत मागणी अचानक वाढलीय.जगभरातच इंधन म्हणून कोळशाची मागणी वाढल्यामुळे जागतिक स्तरावर कोळशाच्या किमती खूप वाढल्यात. भारतीय कोळशाला बाहेरही मागणी आहे. शिवाय भारतात झारखंड, छत्तीसगड, ओडिशा या राज्यात जिथे सर्वाधिक कोळशाच्या खाणी आहेत पाऊस पडल्यामुळे कोळशा काहीसा भिजलेला आहे.
केंद्रीय उर्जामंत्री राजकुमार सिंग यांनी औष्णिक प्रकल्पांना कोळसा कमी पडू देणार नाही अशी हमी वारंवार दिली आहे. पण, वीज निर्मितीचं खरं चित्र येणार्‍या दिवसांतच स्पष्ट होईल. जगभरात कार्बन उत्सर्जनाचे दुष्परिणाम जाणवत असताना शुद्ध उर्जा म्हणजे नैसर्गिक उर्जेकडे वळण्याचा मानस केंद्रसरकारने अनेकदा बोलून दाखवला आहे. खरंतर 2027 पर्यंत वीज निर्मिती शंभर टक्के शुद्ध उर्जा निर्मितीचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय. मग अजूनही आपण कोळशावरच इतके अवलंबून आहोत. भारत हा जवळ जवळ 1 अब्ज 40 कोटी लोकसंख्येचा देश आहे. अर्थातच आपली वीजेची गरज जगात सगळ्यांत मोठी आहे.
भारताची अतीप्रचंड लोकसंख्या आणि तितकीच मोठी अर्थव्यवस्था यामुळे आपल्याला वीज आणि त्यातही इंधन म्हणून कोळशाचा तुटवडा जाणवतोय. चीनमध्ये कोळसा आणि विजेअभावी मोठ्या मोठ्या शहरात बत्ती गुल होतेय. तर अलीकडेच चक्क लंडनसारख्या प्रगत शहरात पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध नाही अशा पाट्या लागल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनानंतरच्या जगासमोरची ही नवी समस्या आहे आणि तिचा मुकाबलाही सगळ्यांनी एकत्र येऊनच करणं योग्य आहे.

No comments:

Post a Comment