रोडरोमियोंच्या टोंळक्यांवर भरोसा सेलची कारवाई! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 16, 2021

रोडरोमियोंच्या टोंळक्यांवर भरोसा सेलची कारवाई!

 रोडरोमियोंच्या टोंळक्यांवर भरोसा सेलची कारवाई!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेस परिसरात तसेच रस्त्यावर मुलींच्या आसपास वावरणारे व छेड काढणार्‍या 2 हजार 572 रोडरोमिओंवर गेल्या तीन वर्षांत निर्भया पथकाने कारवाई करत त्यांना कायद्याचा धाक दाखविला आहे. असल्याची माहिती भरोसा सेलच्या उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांनी दिली. नगर शहर व परिसरात कुणी मुलींची छेड काढत असेल तर निर्भया पथकाच्या 1091 अथवा 9370903143 या क्रमांकावर संपर्क करावा. गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
कोरोनामुळे शाळा, विद्यालये व खासगी क्लासेस बंद असल्याने गेल्या काही दिवसांत मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण कमी झाले असले तरी एकटी मुलगी पाहून छेडछाडीच्या घटना सुरूच आहेत. मुलींजवळ जाऊन जोराने मोटारसायकलीचा हॉर्न वाजविणे, शिट्या मारणे तर कधी थेट हात पकडून प्रेमाची मागणी करणे आदी प्रकार घडतात. शाळा, विद्यालये सुरू होताच मुलींना छेडछाडीला सामोरे जावे लागते व त्यामुळे मुलींना सुरक्षा देण्यासाठी निर्भया पथक कार्यरत आहे. हे पथक दिवसभर शाळा, विद्यालये, उद्याने तसेच शहरात विविध ठिकाणी गस्त घालते. या दरम्यान कुणी मुलींची छेड काढताना आढळून आला अथवा एखाद्या मुलीने तक्रार केली तर सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाते. मुलींना त्रास देणार्‍या मुलांच्या माता-पित्यांनाही सेलमध्ये बोलावून समज दिली जाते. घटना गंभीर असेल तर गुन्हाही दाखल केला जातो.
मुलींना सुरक्षा देण्यासाठी निर्भया पथक कार्यरत आहे. या पथकाच्या माध्यमातून शाळा, विद्यालयांमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधला जातो. त्यांना कुणी त्रास देत असेल तर तत्काळ कारवाई केली जाते. कोरोनाकाळात विद्यार्थिनी व शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधण्याचा उपक्रम सुरू आहे. तसेच नगर शहरातील 65 शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्यात आलेल्या आहेत. मुलींनी या पेटीत तक्रारी केल्या तरी कारवाई केली जाईल असेही पल्लवी उंबरहंडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment