गोष्ट माणुसकी विखूरलेल्या जगातील एका निष्ठावंत कर्मयोग्याची. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 4, 2021

गोष्ट माणुसकी विखूरलेल्या जगातील एका निष्ठावंत कर्मयोग्याची.

 गोष्ट माणुसकी विखूरलेल्या जगातील एका निष्ठावंत कर्मयोग्याची.

(शरदराव तोडमल पाटील- एक निष्ठावंत कर्मयोगी)


18
ऑगस्टची पहाट होती, चुलते आबासाहेब तोडमल यांना हॉस्पिटलमधून फोन आला आणि कोणाला काहीही न सांगता तातडीने ते हॉस्पिटलला पोहचले. आम्हा सर्वांना वाटले बाबांच्या प्रकृतीत थोडीशी बिघाड झाली असेल त्यामुळे घाईघाईत गेले असतील. आम्हीही उठून मळ्यात गेलो, सर्व कामे आटोपली आणि गावातच जाण्याच्या तयारीत होतो तेवढ्यात दीदीचा मेसेज आला, आवरलं का? काय करतो तू? अशी चर्चा सुरु असतानाच ती म्हणली बाबा गेले... हे ऐकल्यावर एक क्षण असं वाटलं कि ती मुद्दाम चेष्टा करत असेल.पण जाता-येता लोक मुखाकडे पाहायला लागले आणि आपोआप डोळे पाणावले.  दीदीला परत विचारलं, तू मस्करी तर नाही करत ना? आणि ती उत्तरली, कोणालाही सांगू नको..तू सगळ्यांना घेऊन गावात ये.  तो क्षण ज्यावेळी हे शब्द ऐकले आणि बाबांचा चेहरा समोर आला आणि जणूकही हृदय तुटल्यासारखं वाटलं.
               एकेकाळचा मातब्बर पुढारी, कार्यकुशल नेता आणि अनेकांचा मार्गदर्शक, कोणाचा मित्र तर कोणाचा आधार त्या दिवशी निपचित पडून होता. कसलाही मोह न बाळगता तो आम्हा सर्वांना सोडून खूप दूर निघून गेलेला होता. ही गोष्ट संपूर्ण गावाला आणि तालुक्याला माहित झाली, अपवाद ठरल मात्र आमच घर. घरातही हळूहळू सगळ्यांना समजलं परंतु त्यांच्या पत्नी शकुंतला ताई तोडमल यांना काहीही समजू नये ह्या गोष्टीचा सर्वजण प्रयत्न करत होते. कोणाचीही हिम्मत होईना त्यांच्या समोर जाऊन मोकळेपणाने बोलण्याची. 11 वाजले आणि संपूर्ण गाव ओस पडलं. सर्व दुकाने बंद, पशु-पक्ष्यांचा किलकीलाट देखील अजिबात नव्हता, तो प्रकृतीने दिलेला एक प्रकारचा इशाराच होता कि, ज्याने संपूर्ण गावाला तारलं, सुख-दुःखात सदैव पाठीशी आधार बनून उभा राहिला तो इसम आज आपल्यात नाही. परिस्थिती इतकी बिकट होती कि सर्वजण लांबूनच चेहर्‍याकडे पाहायचे आणि माना खाली घालून घ्यायचे. वाकोडी गावचा तो तेजस्वी सूर्य त्या दिवशी कायमचा मावळला होता. एक राजकारणी, समाजकारणी, धार्मिक आणि शिक्षणमहर्षी व्यक्तिमत्वाचा शेवट त्या दिवशी झाला. हळहळीने संपूर्ण गाव होरपळून निघालं. कोणालाही विश्वास बसेना ह्या अविश्वसनीय दुःखद घटनेवर..
शरदराव तोडमल पाटील ह्या व्यक्तीरेखेबद्दल लिहायचं ठरल तर एकाचवेळी सर्व काही लिहणे हे अवघडच नाही तर अशक्य आहे कारण एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख ही कधीच एकावेळी होत नसते ती टप्याटप्याने समजून घ्यावी लागते. चला तर मग एका छोट्याशा लेखणीतून आदरणीय शरद भाऊंचा अनुभव करू.
18 जानेवारी 1950 च्या दिवशी माता पार्वतीबाई आणि पिता मुरलीधर पाटील तोडमल यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले. शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी येथे शरदरावांचा जन्म झाला. लाला पाटील दादा पाटील फलके हे त्यांचे मामा होत. बालपण मामाच्या गावी हसत-खेळत घालवलं. मामाचा सर्वांत लाडका भाचा म्हणून गावच्या परिसरात त्यांची ख्याती होती. पुढे जसेजसे वय वाढत गेलं तसतसे शरदरावांची विचार करण्याची शक्ती आणि समाजाबद्दल असणारी ओढ व आपुलकी वाढत गेली. तेव्हाच्या काळी दहावीला मॅट्रिक म्हणत असत आणि जो कोणी ती परीक्षा उत्तीर्ण होत असे त्याला समाजात सुशिक्षित असल्याचा दर्जा प्राप्त होत असे. अशा जेमतेमीच्या परिस्थितीत शरदराव मॅट्रिक उत्तीर्ण झाले. पुढे मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आपला कल राजकारणाच्या बाजूने मांडला. त्यांची महत्वकांक्षा, जिद्द आणि माणसे जोडण्याची आगळीवेगळी पद्धत त्यांना राजकारणाकडे खेचू लागली आणि मग काय वाकोडी गावाच्या इतिहासाचे एक नवीन पर्व सुरु झाले. त्यांच्या रूपाने गावाला, समाजाला आणि तालुक्याला एक समजूतदार आणि संघटनशील व्यक्तिमत्व प्राप्त झाले. उगवला तो राजकारणातील एक महान आणि कर्तबगार मनुष्य ज्याने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने राजकारणाची खरी व्याख्या संपूर्ण जगाला सांगितली.  असा पुरुष जो कधीकाळी गावच्या गल्यांमधून भरकटत असायचा, राणावनांतून फिरत असायचा आणि समाजात रमायचा तोच पुरुष कधी कोणी विचार करू शकलं नाही त्या मार्गावर मार्गस्थ होऊन लोकांची एका पाठोपाठ एक मन जिंकत गेला आणि एक ऐतिहासिक ठसा संपूर्ण नगर जिल्ह्यात उमटवला, तस पाहायला गेलं तर वय जास्त नव्हतं परंतु संघटन क्षमता गगनभेदी होती, जवळ कधी राजवैभव किंवा वडिलोपार्जित साठवलेली मालमत्ता किंवा अफाट असा पैसा देखील नव्हता परंतु स्वबळावर स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची धमक होती. गरिबीची लाज नव्हती सोबतच श्रीमंतीचा माजदेखील नव्हता, जवळ होत ते फक्त कार्यकुशल नेतृत्व, यशप्राप्तीची जिद्द आणि माणुसकीची महत्वकांक्षा आणि असे अगणित अष्टपैलू गुणधर्म घेऊन शरदराव मुरलीधर तोडमल पाटील राजकारणाच्या दुनियेत उतरले.
          काळ बदलत गेला आणि त्याचबरोबर नगरच्या राजकारणाची समीकरणे देखील बदलत गेली. तेव्हाच्या काळी  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष जगातील एक बलशाली आणि वैवीध्यपूर्ण पक्ष होता आणि तो सत्तेत देखील होता. पक्षाबद्दल असणार आकर्षण निरखून तारुण्यातच शरदरावांनी काँग्रेस पक्षाची पताका आपल्या हाती धरली आणि राजकीय कार्य सुरु केले. त्यावेळी मारुती देवराम शेळके पाटील उर्फ दादा पाटील शेळके या काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्याशी भाऊंचा संपर्क आला आणि तिथून पुढे ह्या दोन अष्टपैलू नेत्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण इतिहासमय बनवून ठेवलं. दादा पाटील शेळकेंचा उजवा हात, विश्वासू खांदा, हुकमी एक्का अशा बर्‍याचशा नावाने शरदरावांना संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात ख्याती मिळाली. दादा पाटील शेळके म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील एक असा मातब्बर नेता ज्याने आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शून्यातून केली आणि अल्पावधितच संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त केला. अशा कर्तृत्वान नेत्याशी संलग्नता वाढवून आदरणीय भाऊंनी संपूर्ण नगर जिल्हा पिंजून काढला.
                     सध्याच्या राजकारणात फक्त पैसा, नाव, इज्जत आणि ओळख ह्या गोष्टी लक्षात घेऊन सर्व कार्ये केली जातात म्हणजे एकंदरीत स्वतःचा फायदा झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून राजकारणाकडे बघितलं जात परंतु शरदभाऊंच मात्र तस नव्हतं. दादा पाटील शेळके यांच्याशी त्यांची इतकी जवळीक होती जणू दादा पाटिलांनी त्यांना आपले कौटुंबिक सदस्यच मानलं होत मग विचार करण्याची बाब आहे कि एवढी मोठी संधी असतानादेखील गद्दारी, धोका ह्या सर्व भ्रष्ठ संकल्पनेचा उगम देखील शरदरावांच्या मनात कधी झाला नाही आणि त्यांच्या ह्याच प्रामाणिकतेमुळे आज त्यांचे नाव सगळीकडे आदराने घेतले जाते. खुद्द हे वाकोडी गाव आणि गावातील लोक देखील त्यांच्या राजकारणापासून वंचित राहिले नाही कारण तब्बल पंचवीस वर्षे भाऊ यांनी सरपंच म्हणून ह्या गावचा कारभार योग्य रित्या पार पाडला आहे. यावरून लक्षात येते कि त्यांची काम करण्याची प्रभावी वृत्ती आणि राजकारणाविषयी असणारे ज्ञान किती अफाट होते. सर्व लोकांना सोबत पुढे घेऊन जाणारे भाऊ कधी राजकीय मोहाला बळी पडले नाही. अगोदर जनता, लोक आणि मग आपण हिच संकल्पना त्यांनी कायम मनात ठेवली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आणि प्रवासात त्यांचा देशातील आणि राज्यातील राजकारण गाजवणार्‍या महत्वपूर्ण नेत्यांशी त्यांचा संपर्क आला त्यात मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब असतील. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांना वाकोडी गावी भोजनासाठी भाऊंनी आमंत्रित केले होते तो क्षण आजही गावातील रहिवासी अभिमानाने सांगतात. यानंतर माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब असतील, दादा पाटील शेळके हे तर सर्वांनाच परिचित आहेत. राज्याचे माजी मंत्री मधुकर पिचड साहेब तसेच जेष्ठ नेते शंकरराव कोल्हे साहेब यांसारख्या दिग्गज प्रतिनिधिंशी त्यांची गाठ पडली. हे सर्व देश आणि राज्य पातळीवरील महत्वपूर्ण नेतेमंडळी होती.
       शरदभाउंच्या राजकारणाचा वेगळेपणा यामुळे वाटतो कि एवढी मोठी ख्याती आणि प्रचिती असतानादेखील त्यांनी आपल्या मातृभूमीशी आणि लोकांशी असणारा ईमान मात्र कधी सोडला नाही. कोणी विचारही करू शकणार नाही कि वाकोडी एवढ्या छोट्याशा गावातील एक इसम एवढी मोठी राजकीय कारकीर्द घडवेल. ते म्हणतात ना, सुरुवात शून्यातूनच होत असते आणि नंतर तीच सुरुवात तुमची ओळख बनवत असते.  तसाच काहीतरी प्रकार शरदरावांच्या रूपाने वाकोडीच्या इतिहासात घडला. एक विलक्षण बाब भाऊंच्या राजकारणाची अशी होती कि त्यांनी राजकारण हे फक्त राजकीय दृष्टिकोनातून कधीच नाही पाहिलं त्याच्या मदतीने त्यांनी समाजकारणाचं बीज रोवलं. जात-धर्म आणि पंथ असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. मनुष्याला जीवन हे एकदाच भेटत असत आणि ते एक विशिष्ट हेतू पूर्ण करण्यासाठी मिळत असते असं महान लोक सांगून गेली आहेत आणि हे बर्‍याच अंशी बरोबर देखील आहे कारण प्रत्येक मनुष्याकडे बुद्धीचातुर्य हे वेगवेगळे असते, त्यामुळे भाऊ नेहमी सर्वांना सांगत असे कि, कधीही कोणालाच कमी लेखू नये, आहे त्यात समाधानी राहायला शिकल पाहिजे.  हेच तत्व त्यांनी त्यांच्या मनाशी कायम बांधून ठेवलं आणि आज आपल्यात हजर नसताना देखील कुठेतरी जवळच असतील असा भास निर्माण करून निघून गेले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी राजकारणाबरोबर समाजकारणदेखील घडवून आणलं. त्यांच्या सर्व कार्यांचा आणि कामांचा आराखडा यांचा उल्लेख करणं अशक्य आहे परंतु जे पुरावे आपल्या हाती लागले त्यांच्या आधारे आपण ती कामे आणि कार्ये आपण सर्वजण नक्कीच वाचू शकतो.
         गोष्ट आहे 7/2/1984 ची. या दिवशी वाकोडी नळपाणी योजनेचे भूमिपूजन तत्कालीन आमदार दादा पाटील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि नामदार प्रा. एस. एम आय. असीर सर यांच्या शुभहस्ते पार पडले. त्यावेळी वाकोडी गावचे तत्कालीन सरपंच बाबासाहेब मोढवे, सोसायटीचे चेअरमन कुंडलिक मोढवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य टी. पी. गवळी आणि स्पेशल एक्झिकुटिव्ह मजिस्ट्रेट शरदराव तोडमल पाटील (भाऊ) हे उपस्थित होते. त्यानंतर 16/9/1984 रोजी सोलापूर रोड ते वाकोडी ऍप्रो रस्त्याच्या डांबरीकरणास मा. आमदार दादा पाटील शेळके यांच्या शुभहस्ते आणि ज्ञानदेव पाटील कासार (मा. उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अहमदनगर) यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. या कार्यक्रमाप्रसंगी तत्कालीन वाकोडी गावचे सरपंच शरदभाऊ तोडमल तसेच उपसरपंच शिवाजी सीताराम गवळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतरची गोष्ट आहे ती 17/10/1991 ची मा. आमदार नंदकुमार झावरे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच ज्ञानदेव पठारे (व्हाईस चेअरमन, पारनेर सहकारी साखर कारखाना) यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हा दूध व्यावसायिक संघ लि. यांच्या अंतर्गत दूध शीतकरण केंद्र, ता. सुपा याचे भूमिपूजन पार पडले. यावेळी संघाचे चेअरमन तथा व्हाईस चेअरमन सोबतच संचालक शरदराव तोडमल आणि संघटक देखील उपस्थित होते. याच दिवशी अहमदनगर येथील मार्केट यार्ड परिसरात एमिनिटी बिल्डिंग चे भूमिपूजन मा. आमदार दादा पाटील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली व गोपाळराव सोले यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी संघाचे चेअरमन श्रीरंग पाटील कदम तसेच व्हाईस चेअरमन दादाभाऊ निमसे आणि संचालक शरदराव मुरलीधर तोडमल सोबत अन्य संचालक मंडळ आणि संघाचे कर्मचारी देखील उपस्थित होते. पुढे 8/6/1993 रोजी अहमदनगर तालुक्यातील नगर-सोलापूर रस्त्यावरील सीना नदी पात्राजवळ वाळुंज येथे कोल्हापूर पद्धतीच्या बांधार्‍याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन आदिवासी विकास व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हा संपर्कमंत्री मधुकरराव पिचड यांच्या शुभहस्ते आणि तत्कालीन नगर जिल्ह्याचे खासदार यशवंतराव गडाख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी मा. आमदार दादा पाटील शेळके तसेच नगर तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि काँग्रेसचे नेते शरदराव तोडमल हे देखील उपस्थित होते. पुढे 17/7/1993 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रेरणेने, नगर तालुका सहकारी साखर कारखाना द्वारा कृषी उत्पन्न बाजार समिती अ. नगर शेअर्स विक्रीचा शुभारंभाचा कार्यक्रम मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांच्या शुभहस्ते आणि खासदार यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आमदार दादा पाटील शेळके तसेच नगर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अजितराव देवकर आणि व्हाईस चेअरमन शरदराव तोडमल पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांना माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.
   यांसारखी अनेक अगणित विकास कामे आणि सामाजिक उपक्रम आदरणीय भाऊ यांच्या हातून घडले. ही तर मोजकीच कामे आहेत जी शोधून हाती लागली परंतु जी कामे नगर तालुक्याच्या आणि वाकोडी गावच्या लोकांनी स्वतःच्या साक्षीने पाहिली जी सामाजिक कर्तव्ये स्वतःच्या डोळ्यांनी अधोरेखित केली ती कुठेही लिहून ठेवलेली नसतात ती लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात आणि संपूर्ण जनता त्याची साक्षीदार असते.
       भाऊंच्या राजकारणाचा एक प्रमुख गुणधर्म असा होता कि त्यांनी कधीही दबावाचे किंवा कोणाला ठरवून डावलण्याचे राजकारण केले नाही. असं नाही कि, हा आपला राजकीय शत्रू आहे ह्याला मुद्दाम ठरवून दबावाखाली ठेवायच. हे कृत्य किंवा अशा प्रकारचे राजकारण त्यांनी आयुष्यात कधी केले नाही. नेहमी हसत-खेळत आणि खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी राजकारण केल. नगर तालुक्याच्या इतिहासात घडलेला हा एक अभूतपूर्व नेता होता जो कधी मोहाला बळी पडला नाही आणि लाचारतेचा कधी धनी झाला नाही. होतील इथून पुढे अनेक राजकीय नेते या भूमीवर पण आपल्या कर्तव्याशी, मातृभूमीशी आणि लोकांशी सदैव संलग्न राहणारा तो शरदभाऊ तोडमल पुन्हा होणे नाही. भविष्यात यदाकदाचित कधी वाकोडी गावचा किंवा नगर तालुक्याचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी शरदराव तोडमल पाटील हे एक सोन्याचे पान कायम प्रामाणिकतेचे आणि निष्ठावंत कर्मयोगीचे उदाहरण म्हणून अग्रस्थानी असेल. त्यांची बहुमोल कार्ये आणि साधी सरळ राजकीय भाषा ही सर्वांच्या कायम लक्षात राहील.
     प्रख्यात व्यक्तीरेखा आणि समाजात असणारे अग्रगण्य स्थान ह्या सर्व बाबींमुळे कोणतीही व्यक्ती ही गहिवरून जातेच आणि आपल्या मस्तकावर गर्व धारण करते परंतु याला अपवाद ठरले आदरणीय शरदराव तोडमल पाटील. लोकांनी दिलेला मान सन्मान आणि राजकारणातील प्रखर वर्चस्व असूनदेखील राहणीमान आणि वागण्याची पद्धत ही एका सामान्य मनुष्यप्रमाणेच होती. आपण सर्वजण पाहतो आजचे सर्व नेते मंडळी आणि पुढारी लोक हे आलिशान बंगला आणि महागड्या गाड्यांचे किंवा वाहणांचे धनी आहेत परंतु शरदरावांच्या बाबतीत तसा विचार करणे योग्य नाही. आजही पंचक्रोशीत वयोवृद्ध लोकांना शरदभाऊंची राहण्याची आणि वागण्याची पद्धत या सर्व गोष्टींची सदैव आठवण होत असते. यावरून आपण अंदाज लावू शकतो कि त्यांच व्यक्तिमत्व कस असेल आणि कर्तृत्वाची असणारी ख्याती यापासून तालुक्यात आणि गावात कोणीही अपरिचित नसेल. आजही नगर तालुक्यातील जे कोणी मोठे नेते मंडळी असतील ते भाऊंच नाव नेहमी सन्मानाने घेतात आणि त्यांच्या जुन्या आठवनींना उजाळा देतात. अंगावर शुभ्र पांढर्‍या रंगाचा शर्ट आणि खाली शुभ्र पायजमा व डोक्यावर शुभ्र पांढरी टोपी हाच साधा पोशाख त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या व्यक्तिमत्वाचा गुणधर्म म्हणून जोपासला. त्यांच्या ह्याच साध्या पोशाखावरून त्यांना सर्वसामान्यांतील राजहंस ही उपमा शोभून दिसते हे तर झालं राहणीमान. आता वागण्याची पद्धत याविषयी बोलायच ठरल तर विरोधक देखील त्यांचा उल्लेख आदराने करत असतं. यावरून लक्षात येते कि त्यांनी आपल्या वागण्याने देखील जनतेला प्रभावित केले आणि विरोधकांसाठी आकर्षणाचा नमुना म्हणून नावारूपाला आले. कधीही कोणाला अपशब्द किंवा मर्यादा सोडून बोलणे हे त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीच केले नाही. थोरामोठ्यांचा मान राखणे आणि सोबती तसेच वयाने लहान असणारी माणसे यांना सल्ला आणि मार्गदर्शन देणे हिच माणुसकीची भावना त्यांनी अंगीकारली त्यांच्या ह्याच साध्या आणि सरळ स्वभावामुळे आजही लोक त्यांची आठवण काढत असताना खरंच पुढारी होता पण कधी त्याचा घमंड नव्हता, असा माणूस परत होणे नाही.  हे शब्द उच्चारतात. यावरून एकंदरीत लक्षात येत कि साधी राहणीमान आणि योग्यरीतीने वागण्याची पद्धत यांद्वारे त्यांनी समाजात आणि लोकांच्या मनात आपलं स्थान कायम उंचावर ठेवलं.
        सर्वसाधारण पुरुष ते असाधारण व्यक्तिमत्व हा प्रवास म्हणजे शरदराव तोडमल पाटिलांच संपूर्ण जीवन. राजकारणच नवे तर बाकीच्या क्षेत्रातही त्यांनी नावीन्यपूर्ण यश संपादित केले होते. त्यात शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक यांसारखी अनेक क्षेत्रे आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानबद्दल बोलायच ठरल तर पूर्वी वाकोडी गावातील सर्व मुले-मुली सायकलद्वारे किंवा पायी चालत नगरला शिक्षणासाठी जात असे. त्यावेळी, त्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे त्या कष्टाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. गावातील मुलांची होणारी हेळसांड आणि तारांबळ पाहून 15/6/1992 रोजी शरदभाऊंनी न्यू इंग्लिश स्कूल वाकोडी या विद्यालयाची स्थापना केली.ते म्हणतात ना, सुरुवात जरी लहान असली तरी त्या सुरुवातीचा कालांतराने वटवृक्ष होतो.  आणि अगदी असंच काहीतरी भाऊंनी सुरु केलेल्या या विद्यालयाच्या बाबतीत घडलं. सुरुवातीच्या काळात विद्यार्थी संख्या अल्प प्रमाणात होती आणि कालांतराने ती वाढतच गेली आणि आजच्या घडीला आपण पाहू शकतो कि न्यू इंग्लिश स्कूल हे नगर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक उत्तम उदाहरण आहे. आजवर या शाळेत अनेक विद्यार्थी शिकले जी आज डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक, व्यावसायिक यांसारख्या नामांकित पदावर कार्यरत आहेत. गावातील तरुणांच्या यशामागील दडलेलं गूढ म्हणजे हे न्यू इंग्लिश स्कूल वाकोडी होय. ह्या विद्यालयात फक्त पाठयपुस्तकीय ज्ञानच नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालनादेखील मिळते. ह्या ज्ञानमंदिरात मुले त्यांचा व्यक्तिगत विकास घडवत असतात. या विद्यालयातील शिक्षकवृंद म्हणजे ज्वलंत असणारा ज्ञानाचा झरा आहे जो मुलांच्या दोषांना सोबत वाहून नेतो आणि सदगुणांना जोपासून देशाचे उज्वल भविष्य निश्चित करत असतो. ह्या सर्व गोष्टी भाऊंनी आपल्या कर्तव्यदक्षतेने अशाप्रकारे सांभाळल्या कि येथे शिकणार्‍या प्रत्येक मुलाच्या मनात गावाकडची ओढ, थोरामोठ्यांचा मान व सन्मान तसेच त्यांचा आशीर्वाद आणि मतृभूमीशी असणारी संलग्नता कायम जोपासली गेली पाहिजे. हे विद्यालय सुरु करून भाऊंनी ह्या गावातील तसेच आसपासच्या वस्तीवरील तरुणांना एक नवी दिशा उपलब्ध करून दिली आणि सोबतच ज्ञानाचे अखंड भांडार उघडे करून दिले. ह्या सर्व बाबतीत एक विलक्षण गोष्ट म्हणजे भाऊंनी ह्या विद्यालयात सर्वसामान्य खेड्यांमधून आणि परिस्थितीची जाण असणारे गुरुवर्य बसवले ज्यांच्यामुळे ह्या ज्ञानाच्या प्रवाहात विविधता घडून आली आणि विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी आणि एकाग्रता निर्माण होण्यास मदत झाली. आजही या विद्यालयात गुरुजन वर्ग त्यांची कर्तव्ये अविरतपणे पार पाडत आहेत परंतु भाऊंची उणीव आणि मार्गदर्शनाची कमतरता येथेही प्रत्येकाला भासवत आहे.
    भाऊंच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणे म्हणजे एखाद्या देवमाणसाचे वर्णन करण्यासारखे आहे. भाऊ ज्या प्रकारे राजकारणाचे डावपेच ओळखून होते त्याच प्रमाणे ते भगवंताच्या नामस्मरणात देखील तितकेच तल्लीन राहिले. पहाटे लवकर उठून सर्व कामे उरकून गावाच्या दिशेने चालायचे आणि मग वाटेत कितीही मंदिरे येऊ, शांतपणे थांबून नमन करूनच पुढे चालायचे. गावातही प्रत्येक मंदिराच्या दाराशी रोज सकाळी आपला माथा टेकवूनच पुढील कार्यप्रणालीला सुरुवात करायचे. वै. प. पु. राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांचा आदर्श पुढे ठेऊन आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंनी भगवंताच चिंतन आणि नामस्मरण केले. दारात आलेल्याला कधीही रिकाम्या हाताने माघारी पाठवले नाही. दानासारखे पवित्र कार्य त्यांनी आयुष्याच्या शेवपर्यंत केले. एक उदार व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्याने आपल्यातून हरपले. आजही लोक त्यांचे पायी दिंडी चे किस्से सांगत असतात, काही मजेशीर असतात तर काही डोळ्यात अश्रू आणणारे. आयुष्य कशा प्रकारे जगायचं आणि कशा प्रकारे अनुभवायच ही गोष्ट भाऊ शिकवून गेले. जीवन आणि मरण हे प्रत्येकाच्या नशिबात असतंच यात काही शंका नाही परंतु ते कशा रीतीने जगायचं आणि कशा पद्धतीने मरायच एवढं मात्र नक्कीच मनुष्याच्या हातामध्ये असते. तो हसरा चेहरा आणि निरागस स्मितहास्य नेहमी लक्षात राहील. या क्षणभंगूर आयुष्यातून भाऊ नक्कीच मुक्त झाले परंतु त्यांच्या उर्वरित कार्याची जबाबदारी अगणित वेळी मागे सोडून गेले. कोणी स्वप्नांत देखील विचार केला नव्हता अगोदरच्या दिवशी ठणठणीत बोलणारा माणूस उद्या आपल्याला पोरक करून निघून जाईल. ही घटना गावच्या आणि तालुक्याच्या इतिहासात घडलेली एक अत्यंत वाईट घटना होती ज्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार झालो. 18/1/1950 ला उगवलेला सूर्य शांतपणे मावळून स्वर्गाकडे मार्गस्थ झाला. शरीररूपाने भाऊंनी तेव्हा आपली साथ पूर्णपणे सोडून दिली परंतु वैचारिकदृष्ट्या आणि माणुसकीच्या रूपाने ते आजही आपल्यात वावरत आहेत. त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्वाचे गुणधर्म ते आजही जिवंत असल्याची ग्वाही देतात. अवघ्या 70 वर्षाच्या आयुष्यात हा मनुष्य जगाला माणुसकीचा अप्रतिम धडा शिकवून गेला. शरीररूपाने जरी तो आपल्यातून निघून गेला असला तरी विचाराने तो चिरंतर राहील. एका गोष्टीची मात्र नेहमी खंत राहील कि स्वतः बद्दल आज सर्वत्र कौतुक होत आहे हे पाहण्यासाठी ते आज जगात नाहीत.अशा या माणुसकीच्या दैवतला शतशः नमन. आशा असेल ह्या छोट्याशा लेखणीमधून तुम्हाला शरदराव तोडमल पाटील यांच्या आयुष्याबद्दल आणि कामगिरीबद्दल नक्कीच माहिती मिळाली असेल.
             -तोडमल पृथ्वीराज सचिन

No comments:

Post a Comment