शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय !

 शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय !

शिर्डी विमानतळाभोवती वसविणार नवे ‘आशा’ शहर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.
वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही 76 वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच आशा असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर - सिंह, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नितीन जावळे उपस्थित होते. याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे- वर्मा, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन, नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर विमला हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल, रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दींगत होईल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
उपयोगिता लक्षात घेवूनच विमानतळाचा विकास व्हावा केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करून त्याचा विकास करण्यात येवू नये तर जेथे औद्योगिक विकास होऊ शकेल, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशा भागात विमानतळ उभारणी आणि त्यांचा विकास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले. नागपूर मिहान मधील ज्या विविध कंपन्यांना जागा देण्यात आली आहे त्याचाही आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला व तेथे उत्पादन योग्य रीतीने सुरू ठेवण्याबाबतही निर्देश दिले. बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधा, विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a Comment