विस्कळीत पाणी प्रश्नावरून महासभेत रणकंदन! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

विस्कळीत पाणी प्रश्नावरून महासभेत रणकंदन!

 विस्कळीत पाणी प्रश्नावरून महासभेत रणकंदन!

प्रशासनाचा तीन पट करवाढीचा प्रस्ताव महापौरांनी फेटाळला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील मालमत्तांची जीआयएस मॅपिंगद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करणे व मालमत्ता करात तीनपट वाढ करणे या प्रशासनाने महासभेत सादर केलेल्या प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर महापौर रोहिणी शेंडगे यांनी हा प्रस्ताव फेटाळला. महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीद्वारे व प्रत्यक्ष सर्वेक्षण करून नवीन बांधकामांना कराची आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून महासभेत रणकंदन माजले.
नगर शहरातील मालमत्तांचे रिव्हिजन करून करवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने केलेला होता. या प्रस्तावाला सुरुवातीपासूनच विरोध होता मात्र मागील काही दिवसात या प्रस्तावावरून शहरात संभ्रम निर्माण झाला. काहींनी नगरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. महासभेने केवळ रिव्हिजन व सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. यात मालमत्तांचे सर्वेक्षण होऊन कर आकारणी योग्य आहे किंवा नाही हे तपासले जाईल. मालमत्तेची मोजमापे पडताळली जातील. मोजमापे घेण्यात आल्यानंतर जुन्या नोंदी पेक्षा अधिक वाढ झाली असेल तर जुन्या दरानुसार वाढीव मालमत्ता कर आकारणी केली जाणार आहे. कर वाढ करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. प्रशासनाचा करवाढीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
महापालिकेची महासभा महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक कुमार वाकळे, विनित पाऊलबुधे, गणेश कवडे, शाम नळकांडे, प्रकाश भागानगरे आदींनी शहराच्या विस्कळीत झालेल्या पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. शहरात गेल्या दोन अडीच महिन्यांपासून कमी दाबाने गढूळ तसेच मैल मिश्रित पाणी पुरवठा होत आहे. वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामध्ये सुधारणा का होत नाही की प्रशासन मुद्दामून यात खोडसाळपणा करत आहे. असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आह.े यात तातडीने सुधारणा करण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. सभेच्या सुरुवातीला सेनेचे नगरसेवक शाम नळकांडे व गणेश कवडे यांनी शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशा शब्दात कवडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. निर्मलनगर भागातील पाणीपुरवठा दीड महिन्यांपूर्वी सुरळीत होता.परंतु, गेल्या महिनाभरापासून विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा प्रशासनाकडून केला जात आहे, गंभीर आरोप विनीत पाऊलबुद्धे यांनी केला. त्यावर प्रशासनाकडून जलभियंता परिमल निकम यांनी खुलासा केला. परंतु, पाऊलबुद्धे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी थातूर-मातूर उत्तर देऊन सभागृहाची दिशाभूल करू नका. मागील दोन महिन्यांपासून पाणीपातळी चांगली होती. मग अचानक पाणीपातळी कमी कशी झाली. कर्मचार्‍यांकडे विचारणा केल्यास तुम्ही इकडे येऊ नका, असे सांगितले जाते. याचा अर्थ काही गडबड आहे. अधिकार्‍यांकडून लपवाछपवी सुरू आहे. औरंगाबादरोडवरील अनधिकृत नळकनेक्शन तोडण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु, दीड महिना उलटूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक होऊन निर्णय होत नसेल तर हा आमदारांचा अवमान आहे, असे पाऊलबुद्धे म्हणाले. अन्य सदस्यांनी उभे राहत जाणीवपूर्वक अधिकारी पाणीपुरवठा विस्कळीत करत असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत, रवींद्र बारस्कर, सभापती अविनाश घुले, अनिल शिंदे, कुमार वाकळे आदींनी सहभाग घेतला.
शहरातील अनेक भागात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवकांनी आयुक्त व उपायुक्त व पाणीपुरवठा विभाग प्रमुख यांची कोंडी केली .रस्त्याचे चुकीचे आराखडे, जलवाहिन्या व ड्रेनेज लाईन याचा चुकीचा उतारा यांकडे नगरसेवकांनी अंगुलिनिर्देश केला.
सध्या उड्डाणपुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना 112 नळकनेक्शन अनधिकृत असल्याची बाब सभापती अविनाश घुले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावरून शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेऊन पाणीपट्टी अकारणीची मागणी अनिल शिंदे यांनी केली. स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केडगाव येथील अनधिकृत इमारतधारकांना दिलेल्या नोटिसींचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. ग्रामपंचायत असताना पुणेरोडवर दुकाने बांधली गेली. त्यांना आता नोटिसा पाठविण्यात आल्या असून, दुकानदारांचे म्हणणे प्रशासन ऐकून घेत नाही, अशी तक्रार कोतकर यांनी केली. त्यावर उपमहापौर गणेश भोसले यांनी जुने परवाने नागरिकांकडे नाहीत. ते तुम्ही शोधून द्या त्यानंतर कारवाई करा, असा आदेश दिला.
या सभेत महापौरांनी नगरसेविकांना अधिकाधिक बोलण्याची संधी देण्यावर भर दिला नगरसेविकांनी प्रामुख्याने पाणी व मालमत्ता करवाढ या प्रश्ननावर अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. कुमार वाकळे यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर प्रश्न मांडला. यावर महापालिका आयुक्तांनी पाच नगरसेवक व अधिकारी समिती स्थापन करा, चांगली माणसे द्या, मी डिसेंबरपूर्वी शहरात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुतळे उभा करून देतो, असे सभागृहाला आश्वासन करताच, नगरसेवकांनी समिती तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment